दिगंबर शिंदे

सांगली : जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्याबाबतची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता अनेक नेत्यांनी त्यांच्या पालिका हद्दीत जनतेशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या गटाला इस्लामपूर नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष निवडीत गेल्या खेपेस धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता; या पार्श्वभूमीवर यंदा त्यांनी गल्ली- कोपरा सभांचा धडाका लावला आहे. ओबीसी आरक्षणामुळे लांबलेला निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच मतदारांशी थेट संपर्क साधून अडीअडचणींची माहिती घेतली जात असून या निमित्ताने संभाव्य उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे.

राज्यात भाजप-शिवसेना यांची सत्ता असताना पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांच्या सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजप पुरस्कृत विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये भाजपचे निशिकांत भोसले-पाटील यांनी राष्ट्रवादीचे विजयभाऊ पाटील यांचा पराभव करत नगरसेवकांची संख्याही बरोबरीत पटकावली होती. अपक्ष म्हणून निवडून आलेले दादासाहेब पाटील राष्ट्रवादीच्या तंबूत गेल्याने त्यांना उपनगराध्यक्ष करून राष्ट्रवादीचा सत्तेत सहभाग निदान दिखाव्यापुरता तरी राहिला होता. थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये राष्ट्रवादी उमेदवाराचा झालेला पराभव म्हणजे विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना आव्हानच असे मानले जात होते. भाजपनेही निशिकांत पाटील यांना त्यावेळेस ताकद देण्याचा प्रयत्न केला होता.

Maharashtra News Live : बीडमध्ये पुन्हा अवैध गर्भपात गर्भलिंगनिदान; पती सासूसह चौघांवर गुन्हा दाखल, राज्यातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

आताही राज्यात सत्ताबदल झाल्याने पुन्हा एकदा भाजप पुरस्कृत विकास आघाडी स्थापन केली जात असून यामध्ये राष्ट्रवादी वगळता सर्वच राजकीय पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. विकास आघाडीत सहभागी असलेले शिवसेनेचे आनंद पवार यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यांचीही भूमिका विकास आघाडीला पोषकच असणार, असे मानले जात आहे. जयंत पाटील विरुद्ध अन्य पक्ष, गट असाच सामना इस्लामपूर नगरपालिका निवडणूक प्रसंगी पाहण्यास मिळण्याची चिन्हे आहेत.

या बदलत्या राजकीय स्थितीमुळे आमदार पाटील हेही सावध झाले आहेत. त्यांनीही अधिक सतर्क होत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षात विरोधकांच्या हाती सत्ता देऊनही रस्ते, पाणी, गटारे या मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयश आल्याचे सांगून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळालेल्या निधीतून शहरातील रस्ते, गटारांची कामे हाती घेतल्याचे सांगत वाघवाडी, कारखाना आणि बहे या जोडरस्त्याची कामे दर्जेदार पद्धतीने सुरू असून विकासासाठीच राष्ट्रवादीला साथ द्या असे आवाहन पक्षातर्फे केले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्लामपूरचा बालेकिल्ला आपल्याच गटाच्या ताब्यात राहिला पाहिजे यासाठी गल्ली बोळात, प्रत्येक प्रभागात जयंत पाटील यांच्या संपर्क सभा, बैठका होत आहेत. गेल्या चार दिवसांत त्यांच्या तब्बल ३४ कोपरा सभा झाल्या असून या निमित्ताने मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. अडीअडचणीची माहिती घेऊन सोडविण्याचे आश्वासन देत असतानाच आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे. कोणत्याही स्थितीत राज्यातील सत्ताबदलाचा इस्लामपूरवर परिणाम होणार नाही आणि गत वेळचा गाफीलपणा राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.