राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २३ वर्षे पूर्ण होत असताना हा पक्ष साडेसतरा वर्षे सत्तेत होता. राष्ट्रवादीचे शिर्डी येथे ४ व ५ नोव्हेंबर रेाजी चिंतन शिबीर होणार आहे. पण स्वबळावर निवडणुका लढता येतील का, या प्रश्नाचे उत्तर लातूर जिल्ह्यात नकारार्थीच आहे. पण असे स्पष्ट बोलण्याची हिंमत फार कमी नेत्यांमध्ये असते. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी ही बाब लातूर येथे पत्रकार बैठकीत मान्य केली. तेव्हा राष्ट्रवादीतील कार्यकर्तेही म्हणाले, बरे झाले बाबासाहेब पाटील बोलले.

हेही वाचा- जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे गटातील आमदारांमध्ये धुसफूस

आमदार बाबासाहेब पाटील यांना पत्रकार बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढणार आहे का, असा थेट प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले,‘ धोरणात्मक निर्णय अद्याप झालेला नाही मात्र आमच्याकडे महाविकास आघाडीने सर्वांनी एकत्र मिळून लढले पाहिजे असा सूर आहे. कारण कोणा एकाची ताकद, केंद्रात व राज्यात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याशी थेट भिडण्याची नाही. महाविकास आघाडीमध्ये देखील प्रत्येक पक्षाला ठराविक जागा देऊन निवडणूक लढणे सोयीचे नाही तर जो निवडून येईल त्याला अन्य पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे. असाच निकष ठेवला तरच निवडणूक लढवणे सोपे जाणार आहे.’

आमदार बाबासाहेब पाटील हे स्पष्ट बोलणारे म्हणून परिचित आहेत. आडपडदा न ठेवता, आढेवेढे न घेता जे वास्तव आहे, तेवढेच ते बोलतात .
त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण ताकद ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची नाही, काही ठिकाणी आमची ताकद आहे. मात्र सर्वांना सोबत घेऊन लढलो तरच आम्ही लढा देऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे .लातूर जिल्ह्यात अहमदपूर व उदगीर या दोन ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. उर्वरित चार विधानसभा मतदारसंघांपैकी औसा शहर नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. मात्र ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकद नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कोणा एकाला स्वतंत्र निवडणूक लढवावी असे वाटत असले तरी परिस्थिती तशी नाही आणि तशी शक्ती पण नाही अशी थेट कबुली बाबासाहेब पाटील यांनी दिली. हे सत्य त्यांनी कबूल केले आहे.

हेही वाचा- नगरच्या राजकीय आखाड्यात पाणी योजना मंजुरीच्या श्रेयवादाचे शड्डू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विचारांची पेरणी करून, दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केलेली मशागत यामुळे हा पक्ष राज्यात अग्रेसर आहे. आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना कार्यकर्त्यांची मनोभूमिका अधिक बळकट करण्यासाठीचे हे शिबिर आहे. केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग करून विरोधकांना दहशतीखाली ठेवण्यात येत आहे .केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने अडीच वर्ष राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले .केंद्रीय यंत्रणाची दहशत वापरूनच फोडाफोडी करून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. समाज माध्यमांतून पगारी ट्रोलच्या टोळ्या पोसून पत्रकारांपासून, कलावंतापर्यंत विविध घटकाचा छळवाद मांडला जात आहे .रुपयाच्या अभूतपूर्व घसरणीचे ही लंगडे समर्थन सत्ताधारी मंडळी करू लागले आहेत. इतिहासाचे विकृतीकरण करून खोटा इतिहास थोपवण्याचे प्रयत्न सत्तेच्या माध्यमातून सुरू आहे .अनेक पातळ्यावरचे अपयश लपवण्यासाठी धार्मिक मुद्द्याच्या आड लपण्याचा प्रयत्न केला जातो आहे,यासह या शिबिरात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. पण जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद मात्र कमी पडते आहे, हे बाबासाहेब पाटील यांनी मान्य केले.