सांगली : क्या बडा, तो सबसे दम बडा. आपलं नाव ऐकलं नाय असा याक गाव नाय आणि सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाय अशा शब्दात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण प्रतिष्ठेच्या करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जेष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये झालेल्या दिलखुलास गप्पामध्ये पुढील कार्यक्रम स्पष्ट केला. विशेषत: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या जहरी टीकेनंतर आमदार पाटील यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मनात सुरू असलेली घालमेल चेहर्यावर दिसणार नाही याची दक्षता ते घेत होते. मात्र घरच्या मैदानावर त्यांनी आपल्या मनातील सल बोलून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही आपल्या टीकेचे लक्ष्य केल्याचे दिसून आले.
आमदार पाटील हे चेहर्यावर कधीच प्रतिक्रिया दिसणार नाही, याची दक्षता घेत असतात. टीका झालीच तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांचे निकटचे सहकारी पुढे येतात. मात्र, ते टीकाकारावर वावगा शब्द वाया घालवत नाहीत हा आजपर्यंतचा इतिहास आहे. मात्र, यावेळी आमदार पडळकर यांनी त्यांच्यावर जहरी टीका करत असताना राजकीय सभ्यतेचे उल्लंघन तर केलेच पण जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीत न बसणार्या शब्दांचा वापर केला. ही टीका फारसी कुणाला रूचलीच नाही. यातूनच संस्कृती बचाव मोर्चा काढून सांगलीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांनी खरपूस समाचार घेताना वाचाळवीरांना संरक्षण कुणाचे असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
आमदार पाटील यांच्या समर्थनार्थ सांगलीत झालेल्या मोर्चामध्ये व सभेमध्ये खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे या राज्यस्तरिय नेत्याबरोबरच आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनीही आमदार पडळकर यांच्या वक्तव्याची समाचार घेत असभ्य, असंसदीय भाषेचा वापर करण्यावर आक्षेप नोंदवला. या सभेमध्ये जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील यांनी मात्र पातळी सोडून पडळकर यांच्याबरोबरच आमदार सदाभाउ खोत यांच्यावरही टीका केली. या सभेमुळे वातावरण अधिकच चिघळले. मूळ विषय जतमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार याच्या आत्महत्येस कारणीभूत कोण हा होता. मात्र, टीका टिपणीनंतर हा विषय बाजूलाच राहिला. तो वैयक्तिक टीका टिपणीवर पोहचला.
या सभेनंतर पालकमंत्री पाटील यांच्या पुढाकाराने रावण दहनाच्या निमित्ताने इशारा सभा झाली. या सभेत त्यांनी जिल्हा बॅकेचा कारभार, लॉटरी घोटाळा, वाशीमधील बाजार समितीचा कारभार, ठाणे येथील बांधकाम विकसकाची आत्महत्या हे विषय चर्चेत आणून विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न झाला. तरीही आमदार जयंत पाटील यांनी आपले मौनव्रत कायम ठेवत दुर्लक्ष केले होते. मात्र, प्रत्युत्तर देण्यासाठी वेळेची प्रतिक्षा ते करत होते. ही वेळ आली ती घरच्या मैदानात फोक आख्यानच्या निमित्ताने, मुलाखतीची वेळ साधली आणि टीका करणार्यांना इशारा दिला.
माझी कुठलीही चौकशी होउ दे मी तयार आहे असे सांगत असतानाच आपण टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतो याची आठवण त्यांनी करून दिली. ही आठवण करून देतांना त्यानी यावेळी माझे कुणाशीही वाद राहिलेले नाहीत असे सांगत असतानाच खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पाटील यांच्यासोबतच आमदार विश्वजित कदम यांच्याशीही आपला सुसंवाद असल्याचे आवर्जून सांगितले. यामुळे येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार पाटील हे काँग्रेसच्या सोबतीने करेक्ट कार्यक्रम करण्याच्या मनस्थितीत असल्याचेच स्पष्ट होते. आता हा करेक्ट कार्यक्रम कोणाचा हे लवकरच समोर येईल.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बारा परसाच्या खड्ड्यात नाय गाडला तर गोपीचंद माझं नाव नाय असे प्रत्युत्तर देत हा शाब्दिक संघर्ष अद्याप मिटलेला नाही असेच सूचित केले.