पुणे : लोकसभा, विधानसभा आणि माळेगाव सहकारी साखर कारखाना या तीन निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)पक्षात समोरासमोर लढत झाल्यानंतर आता नव्याने तयार करण्यात आलेल्या बारामतीतील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीच्या माध्यमातून चौथ्यांदा ‘कौटुंबिक’ लढाई होणार आहे.

विधानसभा आणि माळेगाव कारखान्यानंतर नगरपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळवून राज्याचे उपमुख्यमंंत्री अजित पवार हे ‘हॅटट्रिक’ साधणार की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या या नगरपंचायतीच्या हद्दीतील मतदार भावनिक होऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला साथ देणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.बारामतीतील माळेगाव बुद्रुक ही ग्रामपंचायत होती. २०२१ मध्ये ग्रामपंचायतीचे रुपांतर हे नगरपंचायतीमध्ये करण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच या नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यानिमित्ताने पवार कुटुंबात चौथ्यांदा लढत होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यावर पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्ष समोरासमोर आले. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. पराभवानंतरही सुनेत्रा पवार यांची वर्णी राज्यसभेवर करण्यात आली. या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत झाली. त्यामध्ये अजित पवार यांनी विजय साकारला. त्यानंतर अजित पवार यांनी बारामतीतील सूत्रे आपल्या हाती ठेवण्यास सुरुवात केली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही त्यांनी प्रतिष्ठेची केली. उपमुख्यमंत्री पद असतानाही त्यांनी या कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी स्वत:चे नाव घोषित केले. त्यानंतर या निवडणुकीत रंगत आली. एकमेकांवर आरोपही करण्यात आले. मात्र, या निवडणुकीत अजित पवार यांचे पॅनेल सहजपणे निवडून आले.

विधानसभा आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यानंतर माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच या नगरपंचायतीचीनिवडणूक होणार आहे. त्यानिमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस असून, अजित पवार हे ‘हॅटट्रिक’ साधण्याच्या तयारीत असणार आहेत. पुणे जिल्हयातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये माळेगाव नगरपंचायतीचा समावेश आहे. नगराध्यक्ष पद हे इतर मागास वर्ग महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या नगरपंचायतीमध्ये १७ प्रभाग असून, नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

भावनिकतेची किनार

या नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी या भागाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या कारखान्याच्या सभासदांसह २१ हजार २८४ मतदार हे नगरपंचायतीसाठी मतदान करणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बारामतीतील निवासस्थान हे या नगरपंचायतीच्या हद्दीत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये भावनिकतेची किनार आहे. मतदार भावनिक होऊन मतदान करणार की नाही, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.