-सतिश कामत

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी असून भविष्यातील निवडणुकीतही आम्ही मूळ शिवसेनेसोबत राहणार आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बशीर मुर्तूझा यांनी जाहीर केली. मात्र शिवसेनेलाच आघाडी नको असेल तर स्थानिक पातळीवर रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्व जागा लढवण्याची आमची तयारी आहे, असेही मुर्तुझा यांनी स्पष्ट केले.

वरिष्ठ नेत्यांकडून या संदर्भात आदेश येतील त्याप्रमाणे पावले उचलण्यात येणार अहेत. राज्यात महाविकास आघाडी असल्याने स्थानिक नगर परिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये एकत्र लढण्याची तयारी ठेवलेली आहे. शहरातील रस्ते व अन्य विकास कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. रस्त्याची अवस्था बिकट होत चालली आहे. नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे रस्ते केले गेले. राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मिलींद कीर व सहकार्‍यांनी याबाबत वेळोवेळी आवाज उठवला आहे. मविआ सरकार पडल्याचे परिणाम ग्रामीण भागापर्यंत दिसणार आहेत, असे मुर्तुझा यांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंडखोरांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जबाबदार धरले; मात्र त्यात तथ्य नाही, असा दावा करून मुर्तुझा म्हणाले की, मविआ सरकारने ठरवल्याप्रमाणे स्थानिक आमदारांच्या पत्राशिवाय मतदार संघात कोणतीही विकास कामे होत नव्हती. आम्ही काही कामे तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्यांनी आपल्याला स्थानिक आमदारांचे पत्र घेऊन या, असे सांगितले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात काही महिन्यांपूर्वीच सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा निधी अजितदादांनी दिला आहे. कोणत्याही पक्षाच्या आमदारांना त्यांनी नाराज केले नव्हते. आम्ही राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहोत, यांचा पुनरुच्चार त्यांनी केला.