मुंबई : विधिमंडळ कामकाजात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधी बाकावरच्या सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यातून काही सदस्य असंसदीय शब्दाचा वापर करतात. असे शब्द सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याचे आदेश सभापती, उपसभापती देत असतात. सोमवारी विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांना स्वत:चे शब्द कामकाजातून वगळण्याची नामुष्की ओढावली.

शुक्रवारी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलत होते. यावेळी सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यापैकी कोणी उपस्थित नव्हते. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अनिल परब यांनी आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते अर्थसंकल्पावर बोलत असताना अर्थमंत्री किंवा सभागृह नेत्याची उपस्थिती असणे आवश्यक आहे. मंत्री येईपर्यंत कामकाज थांबवावे, अशी मागणी परब यांनी केली. त्यावरून परब आणि उपसभापती गोऱ्हे यांच्यात खडाजंगी झाली होती. कामकाजात व्यत्यय आणने हे तुमचे नित्याचे झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखविण्यासाठी तुमचा हा खटाटोप सुरू आहे, अशी कानउघडणी गोऱ्हे यांनी केली होती.

हेही वाचा >>> विधान परिषद सभापतीपदाची निवडणूक याच अधिवेशनात?

यासंदर्भात सोमवारी अनिल परब यांनी हरकतीचा मुद्दा मांडून तीव्र नाराजी व्यक्त केली. मी काय काम करतो हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे. त्यामुळेच मी चौथ्या वेळा आमदार झालो आहे. आता मी तुम्हाला असे म्हणायचे का, तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दाखवण्यासाठी विरोधकांना बोलू देत नाहीत. मी असे बोललो तर तुम्हाला किती राग येईल? जेव्हा आम्ही चुकीचे असू तेव्हा कारवाई करा. पण माझ्या हक्कावर गदा आणण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असे परब यांनी गोऱ्हे यांना सुनावले. तसेच माझ्यासंदर्भातली तुमची ती विधाने कामकाजातून काढून टाका, अशी मागणी त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सभागृहात दोन्ही बाजूनी सतत गोंधळ घालायचा प्रयत्न होतो. त्यामुळे अनवधानाने माझ्या तोंडून ते शब्द आले असावेत. तुमच्या संदर्भातील विधान तपासते आणि कामकाजातून काढून टाकण्याचा निर्णय घेते.