Top Five Political News in Today : आजच्या पाच महत्वाच्या राजकीय बातम्या : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह त्यांचा दोन्ही मुलांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सडकून टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आठवण झाली. दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर रस्त्यावर उतरणार असा इशारा शिवसेना ठाकरे गटाने राज्य सरकारला दिला. महाराष्ट्रातील या पाच महत्वांच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

नितीन गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी गंभीर आरोप केले. गडकरी यांनी टोलच्या माध्यमातून जमा होणारे पैसे स्वतःच्या मुलांच्या कंपनीत वळते केले असा दावा दमानिया यांनी केला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना कुठलाही आर्थिक फायदा मिळवून देणे हा कायदेशीर गुन्हा असूनही गडकरी यांच्याकडून तो सातत्याने होत असल्याची टीका दमानिया यांनी केली. “रस्ते आणि टोलच्या माध्यमातून मिळालेला पैसा आयडीयल एनर्जी प्रोजेक्ट्स नावाच्या एका कंपनीत जमा करण्यात आला. याच कंपनीतून हा पैसा यंत्रणांच्या मदतीने नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपनीत पाठवला गेला. हा सर्व प्रकार आर्थिक गैरव्यवहाराचा आहे. चौकशी केल्यास यात नक्कीच सत्य समोर येईल, असेही दमानिया यांनी म्हटले.दुसरीकडे, आमदाररोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी दमानिया यांच्या आरोपांच्या वेळेवर आणि हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या आरोपांवर गडकरी यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली. परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीपिकांची नासधूस झाली आहे. सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांसह विरोधी पक्षातील नेते करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांबरोबर संवाद साधताना बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली. “अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची मी पंतप्रधान मोदींना माहिती दिली आहे. कशा पद्धतीचे नुकसान झाले त्याबद्दल सांगितले आहे. आम्हाला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करा अशी विनंती मी पंतप्रधानांना केली. त्यांनीदेखील सकारात्मकता दाखवली असून लवकरात लवकर प्रस्ताव येऊ द्या, प्रस्ताव आला की त्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा : Visual Storytelling : इंडिया आघाडीच्या दबावानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा बदल; कारण काय?

फडणवीस दिल्लीला जाऊन काय दिवे लावतील? काँग्रेसची टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली. फडणवीस दिल्लीला जाऊन काय दिवे लावतील असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. दोन जातींमध्ये भांडणे लावून राज्याचे लक्ष पूरपरिस्थितीतून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना केला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य मंत्रिमंडळाने निर्णय न घेतल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारमधील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधांवरून परतल्यानंतरही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी दिलेल्या अनेक आश्वासनांची आठवणही सपकाळ यांनी करून दिली. ‘वेगळा विदर्भ’ आणि ‘अजित पवारांशी युती नाही’ यासारख्या वक्तव्यांचा त्यात समावेश आहे. ‘संपूर्ण कर्जमाफी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आम्ही करू, आम्हाला सत्ता द्या’ हे निवडणुकीच्या अनुषंगाने केलेले विधानही त्यांनी आठवण करून दिले.

हेही वाचा : ‘I Love Muhammad’ वादावरून ओवैसी संतापले, कारण काय? एका घोषवाक्याने देशभरात का पेटलाय वाद?

अजित पवार यांनी काढली शरद पवार यांची आठवण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज काका पुतण्याच्या नात्यावर भाष्य केले. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आठवण काढली. “तुम्हाला कळतेय का मागचा अजित आणि आताच्या अजितमध्ये बराच फरक आहे. काळानुरूप वय वाढते आणि वय वाढले की परिपक्वता येते. यापूर्वी आपण काहीही केले तरी त्यावर पांघरुण घालायला साहेब (शरद पवार) असायचे. आता आपल्यालाच पांघरुण घालावे लागते. गमतीचा भाग जाऊ द्या तुम्ही परिस्थिती समजून घ्या,” असे अजित पवार म्हणाले. पुण्यातील शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) कार्यालयात वेगवेगळ्या पक्षांमधील नेते व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत जाहीर पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार यांनी टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (तारीख २५ सप्टेंबर) मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ठाकरेंनी त्यांना धीर दिला. आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना अद्यापही मदत पोहोचली नसल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. “पंतप्रधान निधीतून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी ही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची मागणी आहे. दिवाळीआधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करा अन्यथा पक्षप्रमुखांसह हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरणार”, असा इशारा संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिला. शेतकऱ्याच्या प्रश्नांवर येत्या ११ ऑक्टोबरला शिवसेना (ठाकरे गट) प्रचंड मोठा मोर्चा काढणार आणि त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचा हा भव्य मोर्चा असेल, असेही राऊतांनी स्पष्ट केले.