मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे विरोधकांच्या ‘इंडिया आघाडी’त काहीशी अस्थिरता निर्माण झाली आहे. या आघाडीतील घटक पक्ष आता काँग्रेसचे नेतृत्व झुगारून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ७ डिसेंबर रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलावली होती. मात्र, अनेक नेत्यांनी या बैठकीला येऊ शकणार नसल्याचे सांगितल्यामुळे ही बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे. असे असतानाच आता इंडिया आघातील पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. संयुक्त जनता दल (जदयू) आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अनुक्रमे नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी हे नेते पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत, असा दावा करीत आहेत.

इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलली

इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक ६ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र, अनेक नेत्यांनी या बैठकीला येऊ शकणार नसल्याचे सांगितल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. या बैठकीला राष्ट्रीय जनता दल (राजद) पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, तसेच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे उपस्थित राहणार होते. राजदचा मित्रपक्ष जदयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी मात्र प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत बैठकीला येऊ शकणार नसल्याचे सांगितले. याआधी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनीदेखील नियोजित दौऱ्यांमुळे बैठकीला येऊ शकणार नाही, असे सांगितले होते.

“पंतप्रधान होण्यासाठीचे सर्व गुण नितीश कुमार यांच्यात आहेत”

उत्तरेकडील महत्त्वाच्या तीन राज्यांत काँग्रेचा पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या इतर पक्षांतील नेते काँग्रेसच्या नेतृत्वाला झुगारून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त जनता दल आणि तृणमूल काँग्रेसचे नेते नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी हेच विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करण्यास कसे योग्य आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधापदाच्या उमेदवाराची घोषणा करून, आगामी लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, हे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना ठरवायचे आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान होण्यासाठीचे सर्व गुण नितीश कुमार यांच्यात आहेत. नितीश कुमार यांचा विकास आणि समाजवादी राजकारणाचा ब्रॅण्ड २०२४ सालच्या निवडणुकीत सर्वोत्तम ठरेल,” असे के. सी. त्यागी म्हणाले.

“नितीश कुमार यांना प्रमुख भूमिकेत ठेवून…”

बिहार सरकारने नुकत्याच केलेल्या जातीआधारित जनगणनेचा आधार घेत नितीश कुमार हेच कसे सर्वोत्तम नेते आहेत, हे सांगण्याचाही प्रयत्न के. सी. त्यागी यांनी केला. याच जातीआधारित सर्वेक्षणाचा आधार घेत, बिहार सरकारने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढवावी, अशी मागणी केली आहे. “याआधी काही राज्यांनी जातीआधारित सर्वेक्षण केलेले आहे; मात्र राजकीय समीकरण पाहता, कोणीही याबाबतचा अहवाल सार्वजनिक करण्याचा प्रयत्न केलेला नाही. नितीश कुमार यांना प्रमुख भूमिकेत ठेवून इंडिया आघाडीने आपल्या राजकारणाचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे,” असे त्यागी म्हणाले.

“ममता बॅनर्जी यांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव”

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील अशाच प्रकारे भूमिका घेतली आहे. या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना पुढे करण्याचा प्रयत्न केला आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपाला अनेक वेळा पराभूत करून दाखवलेले आहे. ममता बॅनर्जी यांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व त्यांच्याकडे दिले पाहिजे, असे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे.

“संयुक्तपणे सभा घेण्याचा प्रस्ताव त्यांना दिला होता; पण…”

त्यागी यांनी नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांवरही भाष्य केले. या निवडणुकांत इंडिया आघाडीतील इतर पक्षांना महत्त्व न दिल्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला, असा दावा त्यागी यांनी केला. “काँग्रेसने आपल्या मित्रपक्षांना विश्वासात घेतले नाही. या राज्यांत संयुक्तपणे सभा घेण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला होता. तो प्रस्तावही त्यांनी नाकारला. या पराभवानंतर इंडिया आघाडीला यश संपादन करायचे असेल, तर काँग्रेसने आता पुनर्विचार करण्याची गरज आहे,” असे त्यागी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“… तर लोकसभेत त्यांच्याशी कोण आघाडी करेल?”

दरम्यान, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीदेखील काँग्रेसला इशारा दिला आहे. काँग्रेस असाच उद्दामपणा करणार असेल, तर लोकसभेत त्यांच्याशी कोण आघाडी करेल, असे अखिलेश यादव म्हणाले आहेत. त्यानंतर आता इंडिया आघाडीसंदर्भात काँग्रेस काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.