दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळाप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर शनिवारी त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. नितीश कुमार यांचे भाजपाबरोबर जाणे हा इंडिया आघाडीसाठी सर्वांत मोठा धक्का होता, असे ते म्हणाले. तसेच इंडिया आघाडीतील पक्षांनी किमान समान कार्यक्रम तयार करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संजय सिंह यांना ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी ते इंडिया आघाडीच्या प्रत्येक बैठकीस प्रामुख्याने हजर होते. याच पार्श्वभूमीवर त्यांना नितीश कुमार यांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याबाबत विचारण्यात आलं. या संदर्भात बोलताना “नितीश कुमार यांचं इंडिया आघाडीतून बाहेर पडणं पूर्णपणे अनपेक्षित होतं. विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. मात्र, त्यानंतर ते स्वत:च इंडिया आघाडीतून बाहेर पडले. खरं तर पक्ष बदलल्यानं तुम्हाला सत्ता मिळेल. मात्र, अशानं तुमची प्रतिमा मलीन होते”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच आधी भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांना आणि नंतर भाजपासमोर नतमस्तक झालेल्यांना इतिहास लक्षात ठेवणार नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – काँग्रेसला अपेक्षा २००४ च्या ‘सोनिया मॅजिक’ची, राहुल गांधींना शक्य आहे का चमत्कार?

ममता बॅनर्जी यांच्याबरोबर चर्चा करण्यात इंडिया आघाडीतील पक्ष अपयशी ठरले का, असे विचारले असता, नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांच्यात मोठा फरक आहे. ममता बॅनर्जी या आजही भाजपाविरोधात लढत आहेत. त्या भाजपाबरोबर गेलेल्या नाहीत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाविरोधात निकाल येईल आणि त्याचा फायदा इंडिया आघाडीलाही होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुढे बोलताना, इंडिया आघाडीतील पक्षांनी किमान समान कार्यक्रम जाहीर करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. “दिल्लीमध्ये काँग्रेसनं लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावेत; जेणेकरून प्रचार सुरू करता येईल. तसेच इंडिया आघाडीतील पक्षांनी एकत्र बसून किमान समान कार्यक्रम तयार करणं आवश्यक आहे.” असे ते म्हणाले.

हेही वाचा – सनातन धर्म, राम मंदिर आणि भाजपाचीच भाषा; गौरव वल्लभ यांनी अचानक का सोडला काँग्रेस पक्ष?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संजय सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेवरून भाजपालाही लक्ष्य केलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक, हे भाजपाचं षडयंत्र आहे. भाजपाकडून आज नैतिकतेच्या गोष्टी केल्या जातात. मात्र, त्यांचीच कृत्यं अनैतिक आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेली कारवाई ही भ्रष्टाचाराविरोधात नसून, दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी आहे, अशी टीका त्यांनी केली.