राजस्थान काँग्रेस संघटनेत असलेली अंतर्गत धुसफूस आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येत आहे. २०२० सालचे बंड फसल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. अशोक गेहलोत हे सोनिया गांधींचे नाही तर वसुंधरा राजे यांचे नेते आहेत, अशी टीका पायलट यांनी केली आहे. गुरुवार, दि. ११ मे पासून सचिन पायलट अजमेर येथून भ्रष्टाचाराच्या विरोधात पाच दिवसांची जन संघर्ष यात्रा सुरू करत आहेत. या यात्रेची माहिती देण्यासाठी जयपूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच २०२० साली पायलट आणि काही आमदारांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना भेटून गेहलोत यांना हटविण्याची मागणी केली होती, ही बाबही पायलट यांनी पत्रकार परिषदेत मान्य केली. राजस्थान विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना काँग्रेस पक्षसंघटनेतील जुन्या-नव्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा वर्चस्ववादाची लढाई दिसून येत आहे.

सचिन पायलट पुढे म्हणाले की, “वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मी ११ एप्रिल रोजी एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. मात्र गेहलोत यांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. कारवाई न करण्यामागचे कारण आता मला स्पष्ट झाले आहे. वसुंधरा राजे यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर कारवाई का केली जात नाही? यासाठी मी मागच्या दीड-दोन वर्षांपासून पत्रव्यवहार करत होतो. पण, गेहलोत यांनी जे वक्तव्य केले, त्यावरून मागच्या दोन वर्षांत भ्रष्टाचाराची चौकशी का होऊ शकली नाही, याचे कारण आता सर्वांसमोर आले आहे.”

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी ढोलपूर येथील सभेत बोलताना सांगितले की, २०२० साली घोडेबाजार करून सरकार पाडण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना मोठी रक्कम दिली गेली. तसेच वसुंधरा राजे, कैलाश मेघवाल आणि शोभारानी कुशवाहा यांनी भाजपाच्या घोडेबाजाराचा विरोध करून काँग्रेसचे सरकार वाचविले. गेहलोत यांच्या दाव्यावर पायलट यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “एका बाजूला तुम्ही म्हणता भाजपाने सरकार पाडण्याचे कारस्थान केले, दुसऱ्या बाजूला हेही सांगता की, वसुंधरा राजे यांनी सरकार वाचविण्यासाठी मदत केली. या दोन्ही दाव्यांमध्ये विरोधाभास आहे. तुम्हाला काय सांगायचे आहे, ते स्पष्ट सांगा. विसंगती निर्माण करू नका”

हे वाचा >> भाजपाच्या घोडेबाजारापासून काँग्रेसचे सरकार वाचविण्यासाठी वसुंधरा राजेंनी गेहलोत यांना मदत केली; राजस्थानमध्ये खळबळ

सचिन पायलट पुढे म्हणाले की, मी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्यात पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. २०२० साली, माझ्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्याचा प्रयत्न झाला होता. मी आणि माझे काही सहकारी राज्यातील नेतृत्वाता बदल करू इच्छित होतो, यासाठी आम्ही दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. त्यानंतर हा विषय काँग्रेसच्या कार्यकारी समितीमध्येही चर्चेला आला होता. त्यानंतर या विषयासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ज्यामध्ये अजय माकन, के. सी. वेणुगोपाल आणि दिवंगत अहमद पटेल यांचा समावेश होता.

सचिन पायलट यांच्या गटातील आमदारांना भाजपाकडून कोट्यवधी रुपये मिळाल्याचा आरोप गेहलोत यांनी रविवारी नाव न घेता केला होता. या आरोपला उत्तर देत असताना पायलट म्हणाले, “जे लोक २०२० साली दिल्लीत आपली बाजू मांडण्यासाठी गेले होते, त्यांच्यावर अतिशय खालच्या पातळीचे आरोप करण्यात आले आहेत. जे लोक ३० ते ४० वर्षांपासून सामाजिक जीवनात सक्रीय आहेत, त्यांच्यावर असे आरोप होणे चुकीचे आहे. हेमाराम चौधरी हे १९८० पासून आमदार आहेत. त्याच्या मतदारसंघातील लोकांना त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल जराही शंका नाही. चौधरी यांनी आपल्या मालकीची कोट्यवधींची जमीन समाजाला दान केली आहे, त्यातून आलेल्या २२ कोटी रुपयांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधले. दुसरे एक नेते ब्रिजेंद्र सिंह यांचे वडील १९५७ पासून निवडून येत आहेत. आता ब्रिजेंद्र सिंह आमदार आहेत, त्यांनी अनेक पदांवर आजवर काम केले आहे. अशा व्रतस्थ लोकांवर खालच्या पातळीवरचे आरोप होणे, योग्य नाही. मी हे सर्व आरोप फेटाळून लावतो.”

पायलट पुढे म्हणाले की, “जर तुम्ही या नेत्यांवर आरोप करत आहात, मग मागच्या तीन वर्षांत त्यांच्यावर कारवाई का नाही केली? आम्ही २०२० साली दिल्लीत जाऊन आमची भूमिका मांडली होती. त्यानंतर पक्षाच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माकन आणि खरगे यांना जयपूरला पाठवले होते. राजस्थान विधीमंडळ सदस्यांची बैठक घेऊन तोडगा काढावा, असे आदेश सोनिया गांधी यांनी दिले होते. मात्र अशी बैठकच बोलावण्यात आली नाही. अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधींच्या आदेशाची ज्या प्रकारे पायमल्ली करण्यात आली, हा त्यांचा अवमान होता. याला एकप्रकारे गद्दारी म्हणू शकतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिन पायलट गुरुवारपासून भ्रष्टाचाराच्या विरोधात अजमेर ते जयपूर पदयात्रा काढत आहेत. “मी ऐकले की अजमेर येथून एक भ्रष्टाचारा उघड झालेला आहे. त्याच्या बातम्याही झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही अजमेरपासून पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेचे म्हणणे ऐकून घेऊ. भ्रष्टाचार, युवकांचे प्रश्न, प्रश्नपत्रिका फुटणे, परिक्षा रद्द होणे, हे सर्व मुद्दे माझ्या जन संघर्ष यात्रेत घेण्यात येतील. अजमेर ते जयपूर असा १२५ किमींचा प्रवास आम्ही करणार आहोत. ही यात्रा लोकांच्या कल्याणासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात उचललेले एक पाऊल आहे”, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.