सुहास सरदेशमुख
मुंबईमध्ये महापालिकेच्या पातळीवर कधी तरी यश मिळणारे बहुतांश नेते मराठवाड्यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख. कोणाकडे दोन जिल्हे तर कोणाकडे तीन जिल्ह्यांचे कामकाज. मुंबईत ज्या नेत्यांना फारशी ओळख नाही असे नेते मराठवाड्यात संपर्कप्रमुख म्हणून येतात आणि निवडून येणाऱ्या आमदार आणि खासदारांवरही रुबाब गाजवतात. मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, अधून-मधून एक दिवसाचा संपर्क करणे त्या दिवसांत पुष्पगुच्छ स्वीकारणे, यथेच्छ पाहुणचार स्वीकारून पुन्हा मुंबईला परत जाणे अशी कार्यशैली असल्याने अशा संपर्कप्रमुखांचा सेना वाढविण्यात काय हातभार लागणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सात- आठ वर्षापूर्वी विनोद घोसाळकर यांची संपर्कप्रमुख म्हणून नेमणूक झाली. पालकमंत्री म्हणून रामदास कदम व त्यानंतर सुभाष देसाईसारख्या ज्येष्ठ नेत्यांची नेमणूक असल्याने घोसाळकर हे फक्त मोठ्या कार्यक्रमास हजेरी लावण्यासाठी येतात. तेवढ्या काळात त्यांचे आगत-स्वागत केले जाते. त्यांची बडदास्तही राखली जाते. केवळ ओरंगाबादच नाही तर त्यांच्याकडे जालन्याचीही जबाबदारी आहे. मुंबईत पक्षनेतृत्वाच्या जवळ असलेले नेते मराठवाड्यात मोठे असतात. त्या जीवावर ते मुंबईतही खूप काम करत असल्याचे चित्र निर्माण करतात. तानाजी सावंत वगळता मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांचा कारभार मुंबईच्याच नेत्यांच्या हाती आहे. लातूरचे संपर्क प्रमुख संजय मोरे हे ठाण्याचे माजी महापौर होते. लातूर जिल्ह्यातील मतदारसंघ बांधणीत शिवसेना आजही शून्यावरच आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून सचिन देशमुख यांना मिळालेली मते नोटापेक्षा कमी होती. एवढी नाचक्की झाल्यानंतरही लातूर जिल्ह्यातील सेनेचे संघटन शून्यच. अगदी धनुष्यबाणाचे चिन्ह मिरविण्यासाठी गळयात भगवे उपरणे घालायलाही माणसे अशी नाहीतच. या जिल्ह्याचे शिवसेना संपर्क नेते म्हणून संजय मोरे यांच्याकडे जबाबदारी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार, एक खासदार एवढी ताकद. तानाजी सावंत यांच्या रूपाने संपर्क नेताही चांगला खमक्या. पण अतिबोलण्यामुळे पक्ष प्रमुखांची खप्पा मर्जी असलेला. त्यामुळे सत्ता मिळाल्यानंतरही संघटनात्मक वाढीत खडतर काळात काम करणारे शिवसैनिक मागच्या बाकावर आणि नव्याने आपणच शिवसेना उभी केल्या आर्विभावात नवे नेते अशी अवस्था असल्याने उस्मानाबादमधील संपर्कप्रमुख ही यंत्रणा तशी असून नसल्यासारखी.
परभणी जिल्ह्यात अलिकडेच राजेंद्र साप्ते यांची निवड झाली आहे. तर शिवसेनेच्या संघटनेच्या बांधणीच्या दृष्टीने राजकीय कुपोषित बीड, हिंगोली व नांदेड जिल्ह्याचा कारभार मुलुंडच्या आनंद जाधव यांच्याकडे आहे. ते अधून- मधून मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. एवढाच काय तो संपर्क. संपर्क प्रमुखांनी नवीन एखादा समाजघटक शिवसेनेशी जोडून दिला आहे, असे कधी ऐकिवात नाही. ते येतात, जमलेच तर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरही रुबाब करून मुंबईकर असल्याची वातावरण निर्मिती करून जातात. पूर्वीपासून गौरिश शानबाग, विश्वनाथ नेरुरकर, बबनराव थोरात, सुभाष भाले, विजय कदम अशी मुंबईतील व्यक्तीच संपर्क प्रमूख म्हणून नेमली जाते. मराठवाड्यातील शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांना अन्य जिल्ह्यात ना नेमणूक मिळते ना मान सन्मान. राबणारे वेगळे आणि मिरवणारे वेगळे अशी सेनेतील संघटनात्मक रचना असल्याची खंत शिवसेनेतील एका नेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे चला मराठवाड्यात जाऊ व रुबाब करू ही सेनेतील मुंबईतील नेत्यांची कार्यशैली होत असल्याची नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.