मुंबई : काँग्रेसने सुमारे ६० वर्षांच्या सत्ताकाळात प्रचंड भ्रष्टाचार करुन देशाची व राज्याची वाट लावली, अशी टीका भाजप नेत्यांकडून सातत्याने गेली काही वर्षे केली जात असली तरी जुन्या कॅाग्रेस नेत्यांना भाजपमध्ये मानाचे स्थान दिले जात आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, मातब्बर घराणी व त्यांचे वंशज भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे देशाची व राज्याची वाट लावलेले नेते किंवा त्यांचे वंशज भाजपबरोबर कसे आणि भाजपच्या टीकेमध्ये किती तथ्य होते, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्व व कार्याचे कौतुक केले. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख, सुधाकरराव नाईक यांच्याविषयीही भाजप नेत्यांनी अनेकदा गौरवोद्गार काढले आहेत.
नाईक घराण्यातील वंशज निलय नाईक भाजपचे आमदार होते. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्याविषयी फडणवीसच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत व मोदी यांनी त्यांना राजकीय गुरू असेही संबोधले होते. ते मुरब्बी व द्रष्टे नेते, कुशल राजकारणी असा उल्लेख केला गेला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणे यांच्या राजकीय नेतृत्व, कौशल्य व अन्य गुणांची पारख करूनच भाजपने त्यांना पक्षात घेतले आहे. मोहिते-पाटील घराणे, नाईक-निंबाळकर, निलंगेकर-पाटील, चाकूरकर, यांच्या कुटुंबातील नेते, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले अशा मातब्बर घराण्यातील नेतेमंडळी भाजपबरोबर आहेत. हर्षवर्धन पाटील, छत्रपती संभाजीराजे अशी मान्यवर नेतेमंडळीही काही काळ भाजपबरोबर होती. त्यामुळे काँग्रेसच्या कोणत्या माजी मुख्यमंत्री व बड्या नेत्याच्या काळात राज्याची वाट लागली किंवा विकास झाला नाही, याचे कोडे सर्वसामान्यांना पडले आहे.