Bihar election 2025 बिहारमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. या जागावाटपाबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी केली. यामध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दल २४३ सदस्यांच्या विधानसभेत प्रत्येकी १०१ जागांवर लढणार आहेत. याचबरोबर एनडीएचा भाग असलेल्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांना २९ जागा देण्यात आल्या आहेत, तर राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा यांना प्रत्येकी ६ जागा देण्यात आल्या आहेत.

परंतु, हा जागा वाटपाचा फार्म्युला ठरल्यानंतर एनडीएतील मित्रपक्ष असणाऱ्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. युतीतील फुटीची कारणे काय? राजभर यांनी नक्की काय आरोप केले? जाणून घेऊयात…

स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय

  • सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी बिहारमध्ये स्वतंत्र मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएने त्यांच्या पक्षाला एकही जागा न दिल्यामुळे ते नाराज आहेत.
  • राजभर म्हणतात की, त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आत्मसन्मानापोटी घेतला आहे.
  • ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत राजभर यांनी युतीमध्ये काय बिघडले, त्यांच्या पक्षाची निवडणूक रणनीती काय आहे आणि बिहारमधील त्यांचा पक्षाचा प्रचार कोणत्या मुद्द्यांवर आधारित असेल, याविषयी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएने त्यांच्या पक्षाला एकही जागा न दिल्यामुळे ते नाराज आहेत. (छायाचित्र-जनसत्ता)

एनडीएपासून वेगळे होऊन बिहारमध्ये स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय का घेतला?

ओम प्रकाश राजभर यांनी म्हटले, “मी सर्व प्रयत्न केले. बिहारपासून दिल्लीपर्यंत याविषयी प्रयत्न झाले; पण जेव्हा जागावाटपाची यादी जाहीर झाली, तेव्हा आमच्या उमेदवारांचा त्यात अजिबात समावेश नव्हता. आम्ही महिनो न महिने जमिनीवर काम केले असतानाही, त्यांनी आम्हाला विचारात न घेता यादी प्रसिद्ध केली. आम्ही ३२ जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहोत, तरीही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.” ते पुढे म्हणाले, “१९५२ पासून कोणत्याही राजकीय पक्षाने बिहारमध्ये राजभर समाजाचा एकही आमदार दिला नाही. आम्हाला केवळ ‘प्रतीकात्मक भागीदार’ म्हणून किती दिवस वागवणार? त्यामुळेच आम्ही ही लढाई स्वतःच्या बळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ते म्हणाले.

एसबीएसपी किती जागांवर निवडणूक लढवणार?

राजभर म्हणाले, “पहिल्या टप्प्यात आम्ही ५२ उमेदवार उभे करत आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुढील उमेदवारांची यादी जाहीर करू. एसबीएसपी बिहारमधील एकूण १५३ जागांवर निवडणूक लढवेल. आमचे उमेदवार स्थानिक समुदायांचे आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे तळागाळातील लोकांसाठी काम केले आहे. आम्ही केवळ ताकद दाखवण्यासाठी लढत नाही, ज्यांना कधीच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही, त्यांना संधी देण्यासाठी आम्ही लढत आहोत.”

एनडीएकडून केलेल्या अपेक्षांची पूर्तता नाही

ते म्हणाले, “आम्ही बिहारमध्ये फक्त चार ते पाच जागांची मागणी केली होती. ही काही मोठी मागणी नव्हती, पण त्यांनी तेवढीही मागणी पूर्ण केली नाही. त्यांनी आमच्या उमेदवारांचा समावेश केला नाही आणि त्यांची यादी जाहीर केली. ‘गठबंधन धर्म’ (युतीचा धर्म) असा नसतो.” ते पुढे म्हणाले, “जेव्हा त्यांना पोटनिवडणुकांमध्ये मदतीची गरज होती, तेव्हा ते हात जोडून आमच्याकडे आले होते. पण, आता आमच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली तेव्हा त्यांना विसर पडला. आम्ही आमची योजना सादर करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विनोद तावडे यांचीही भेट घेतली, तरीही काहीच बदल झाले नाही; त्यामुळे आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी स्पष्ट केले.

बिहारमध्ये एसबीएसपी कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार?

त्यांनी पुढे स्पष्ट केले, “आमचे उद्दिष्ट आमच्या मतदारांना एकत्र करणे आहे, विशेषतः राजभर, प्रजापती आणि राजबंशी समुदायांचे. या समुदायांची संख्या बिहारमधील अनेक मतदारसंघांत २०,००० ते ८०,००० आहे. सर्व प्रमुख पक्ष त्यांच्या मतांवर दावा करतात, पण त्यापैकी कोणीही त्यांना कधीही प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली नाही.” त्यांनी पुढे सांगितले, “आम्ही जमीन, शिक्षण आणि रोजगारावरही लक्ष केंद्रित करू. बिहारमध्ये मजूर तयार होतात, पण सरकारने येथील तरुणांना योग्य शिक्षण आणि रोजगाराच्या संधी का उपलब्ध करून देऊ नयेत? आमची प्राथमिकता गरजू लोकांना जमीन उपलब्ध करून देणे असेल.”

जागावाटपासाठी एनडीएशी चर्चा करण्यास तयार

“जर त्यांना खरोखर आम्हाला युतीत ठेवायचे असेल, तर अजूनही वेळ आहे. आम्हाला ४ ते ५ जागा द्या आणि आम्ही आनंदाने त्यांच्याबरोबर उभे राहू. पण, जर त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष करणे सुरू ठेवले तर आम्ही स्वतंत्रपणे लढू. माझा युतीच्या धर्मावर विश्वास आहे, पण सन्मान दोन्ही बाजूंनी असावा लागतो. जर तुम्ही भागीदारांना दुय्यम समजत असाल, तर ती युती टिकू शकत नाही,” असे राजभर यांनी स्पष्ट केले.

या निर्णयाकडे अनेक जण तुमच्या पक्षाचा उत्तर प्रदेशबाहेर पाय रोवण्याचा प्रयत्न म्हणून पाहतात. बिहारचा समावेश तुमच्या योजनेत आहे का?

या प्रश्नावर राजभर म्हणाले, “आम्ही एक वर्षापेक्षा अधिक काळ बिहारमध्ये शांतपणे काम करत आहोत. आमची संघटना ३२ जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहे आणि आम्ही विश्वासार्ह स्थानिक नेत्यांची ओळख केली आहे. बिहारमधील ही लढाई केवळ राजकीय नाही, ती सामाजिक आहे. एसबीएसपी हा जितका राजकीय पक्ष आहे, तितकेच ते एक ‘आंदोलन’देखील आहे. जिथे आमचा समुदाय राहतो, तिथे आम्ही विस्तार करत आहोत आणि बिहार स्वाभाविकपणे त्या भौगोलिक क्षेत्राचा भाग आहे,” असे ते म्हणाले.

रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप योजना निश्चित केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष, जनता दल-युनायटेड (जेडी-यू), आणि भारतीय जनता पक्ष (भाजपा) प्रत्येकी १०१ जागा लढवतील. चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष-राम विलास २९ जागांवर निवडणूक लढवेल. दरम्यान, जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा प्रत्येकी सहा जागांवर निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत. एनडीए आपले अंकगणित अंतिम करत असताना, राजभर यांच्या स्वतंत्रपणे लढण्याच्या निर्णयाने बिहारच्या राजकीय वर्तुळात नवीन समीकरणे निर्माण केली आहेत. याचा एनडीएच्या मतांवर परिणाम होईल का, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.