बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत गटातटांचं राजकारण हे बिहारमधील राजकीय पक्षांसामोरील मोठे आव्हान असणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जनता दल युनायटेड एक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. जनता दल युनायटेडमध्ये ही एक जागा पुन्हा केंद्रीय मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांना द्यायची यावरून पेच निर्माण झाला आहे. केंद्रात मंत्रिपद मिळण्याआधी सिंह हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार नितीशकुमार यांना देण्यात आले आहेत. जनता दल युनायटेडमधील सूत्रांनी सांगितल्यानुसार आर.पी सिंह यांनी स्वतः इच्छुक असल्याचं सांगितल्यामुळे आणि या विषयावर काही जेष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यामुळे याबातचा अंतिम निर्णय घेण्याची जबादारी नितीश कुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 

आर.पी सिंह हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी केंद्रीय मंत्रिपद स्वीकारले. त्यामुळे जनता दल युनायटेडचे सर्वोच्च नेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. आर.पी सिंह हे केंद्रीय मंत्री झाल्यावर मुंगेरचे खासदार राजीव रंजन सिंह यांनी जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष पद स्वीकारले. 

या निवडीवरून नितीश कुमार यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आरसीपी सिंह यांना पुन्हा उमेदवारी दिली तर पक्षातील एक मोठा गट नाराज होण्याची शक्यता आहे. सिंह यांची पक्षावर फारसी पकड नसल्याची पक्षातर्गत चर्चा सुरू आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत ३२ उमेदवारांपैकी फक्त तीनच उमेदवार ते निवडून आणू शकले होते. आणि तरीसुद्धा त्यांना उमेदवारी देण्यात आली तर ते सहा महिन्यांतच केंद्रीय मंत्रिपद गमावतील असं पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. 

राज्यसभेची निवडणूक १० जून रोजी होणार आहे. बिहार विधानसभेच्या २४३ सदस्य संख्या असलेल्या सभागृहात भाजपाचे ७७ आमदार आहेत. राष्टीय जनता दलाचे ७६, आणि जनता दल युनायटेडचे ४५ आमदार आहेत. सदस्य संख्येनुसार भाजपा आणि राष्ट्रीय जनता दलाला प्रत्येकी २ जागा आणि जनता दल युनायटेडला १ जागा मिळू शकते.

राष्ट्रीय जनता दलातून मिसा भारती यांना पुन्हा।उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.नुकताच आपला पक्ष राष्ट्रीय जनता दलात विलीन करणारे शरद यादव यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. लालू प्रसाद यादव यांचे जेष्ठ चिरंजीव तेज प्रताप यादव राज्यसभा मिळावी यासाठी प्रचंड लॉबिंग करत असले तरी पक्षाचे नेते फैसल अली यांचे नाव चर्चेत आहे.