लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई: स्वातंत्र्य दिन मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी उत्साहात पार पडला. या निमित्ताने विविध कायर्क्रमांचे आयोजन करण्यात आले होते.स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. ध्वजारोहण कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयातील आजी-माजी न्यायाधीश, वकील व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. तर विधान भवनात विधानसभेचे अध्यक्ष, अॅड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सचिव जितेंद्र भोळे आणि डॉ.विलास आठवले यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात महसूल पंधरवडा २०२४ ची सांगता करण्यात आली. तसेच उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा या वेळी गौरव करण्यात आला. तसेच विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमधील पारितोषिकप्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा >>>विधानसभा निवडणुकीसाठी संवाद यात्रा; महायुतीच्या संयुक्त मेळाव्यांना २० ऑगस्टपासून कोल्हापूर येथून प्रारंभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार झिशान सिद्दीकी, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी लोढा यांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षांमधील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.