I Love Muhammad controversy उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये बारावफात (ईद मिलाद-उन-नबी) निमित्त ‘आय लव्ह मुहम्मद’चे बॅनर लावल्यावरून वाद निर्माण झाला. मात्र, या वादाची ठिणगी देशभरात पोहोचली. उन्नाव, बरेली, गोध्रा, लखनौ, काशीपूर यांसारख्या शहरांमध्ये आंदोलने करण्यात आली, मोर्चे काढण्यात आले, पोलिसांशी चकमक झाली आणि अनेकांना अटकही झाली.
अनेकांनी असाही आरोप केला आहे की, पोलिस मुस्लीम समाजाला त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त करण्यासाठी मुद्दाम लक्ष्य करत आहेत. आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी या वादावर बोलले आहेत. ते नक्की काय म्हणाले? या वादाचे कारण काय? जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या वादावर काय प्रतिक्रिया दिली? त्याविषयी जाणून घेऊयात…

ओवैसी काय म्हणाले?
एआयएमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी ‘आय लव्ह मुहम्मद’ पोस्टर्सचे समर्थन केले आणि ते म्हणाले की, याचा विरोध करणारे लोक प्रेमाच्याच विरोधात आहेत. त्यांनी पुढे प्रश्न केला की, इतर व्यक्तींचे कौतुक करणारे संदेश स्वीकारले जातात, तर पैगंबरांचा उल्लेख करणाऱ्या संदेशांवर टीका का केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या पोस्टर वादादरम्यान ‘आय लव्ह महादेव’ मोहीम सुरू करण्यात आली. त्यावरही ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली. ओवैसी म्हणाले, “ती चांगली गोष्ट आहे.”

“जर ‘आय लव्ह महादेव’ गट असेल, तर यात अडचण काय आहे? यात राष्ट्रविरोधी काय आहे? यातून कोणत्या प्रकारचा हिंसाचार वाढतो? जर त्यात ‘प्रेम’ शब्द असेल, तर कोणाला अडचण का होत आहे?” असा प्रश्न ओवैसींनी बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना केला. ओवैसी यांनी या घोषणेवर आक्षेप घेणाऱ्या लोकांसाठी ‘मुगल-ए-आजम’ चित्रपटातील ‘मोहब्बत जिंदाबाद’ हे गाणे ऐकण्याचा सल्ला दिला.

ओवैसी पुढे म्हणाले की, जर पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना असे बॅनर लावू शकतात, तर ‘आय लव्ह पैगंबर मुहम्मद’ पोस्टरला समस्या मानण्याचे काहीच कारण नाही. “मला वाटते की आम्हाला या लोकांसाठी ‘मुगल-ए-आजम’मधील ‘मोहब्बत जिंदाबाद’ हे गाणे वाजवावे लागेल. जर ‘हॅपी बर्थडे पीएम मोदी’ पोस्टर लावता येत असेल, तर ‘आय लव्ह पैगंबर मुहम्मद’ पोस्टर का लावता येऊ नये?” यापूर्वीही ओवैसी या मुद्द्यावर बोलले होते. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी ‘आय लव्ह मोहम्मद’ असे म्हणणे गुन्हा नसल्याचे स्पष्ट करत कानपूर पोलिसांना टॅग करून त्यांच्या कारवाईवर टीका केली.
‘आय लव्ह मुहम्मद’ वाद काय आहे?
‘आय लव्ह मुहम्मद’ या वादाची सुरुवात ४ सप्टेंबर रोजी झाली. कानपूरच्या रावतपूर येथील बारावफात (ईद-ए-मिलाद-उन-नबी) मिरवणुकीत ‘आय लव्ह मोहम्मद’चे बॅनर लावले. या कृतीला काही हिंदू संघटनांनी विरोध केला. तेव्हापासून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा आणि महाराष्ट्र यांसारख्या अनेक राज्यांमध्ये मुस्लीम गटांकडून याचा निषेध करण्यात येत आहे आणो आंदोलन करण्यात येत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या धार्मिक उत्सवांसाठी वापरल्या जाणाऱ्या जागेत नवीन परंपरा सुरू केली जात असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला होता. तणाव कमी करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला काय म्हणाले?
‘आय लव्ह मुहम्मद’सारखा एक साधा वाक्यांश बेकायदा कसा असू शकतो, असा प्रश्न त्यांनी केला आणि न्यायपालिकेला तातडीने कारवाई करण्याची विनंती केली. “‘मी मुहम्मदवर प्रेम करतो’ असे लिहिणे बेकायदा कसे आहे?” असा प्रश्न मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी केला. “जरी तुम्ही त्याचा संबंध धर्माशी जोडला, तरी त्यात गैर काय आहे? इतर धर्माचे लोक त्यांच्या देवतांबद्दल लिहीत नाहीत का? आपले शीख बांधव-भगिनी त्यांच्या गुरूजन्यांबद्दल लिहीत नाहीत का? आपले हिंदू बांधव-भगिनी त्यांच्या विविध देवतांबद्दल लिहीत नाहीत का? ते लिहितात,” असे मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले.
