बीड – राज्यातील मराठा विरुद्ध ओबीसींमधील आरक्षणावरून निर्माण झालेला वाद आणि आगामी नगराध्यक्षपदाची निवडणूक पाहता परळीतील लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेले असेल आणि येथील निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्याच्या विद्यमान पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि ओबीसींचे नेते म्हणून भूमिका घेणारे माजीमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे व यांच्या नेतृत्वाचाही कस लागणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळीशी संबंधित घडलेल्या घडामोडी, धनंजय मुंडेंवर राजीनामा देण्याची आलेली वेळ, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मुंडे भावंडांशी असलेला वाद, जरांगे यांचे महादेव मुंडे खून प्रकरणात लक्ष घालून ओबीसींमध्ये प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न यातून परळीमध्ये मराठा अधिक शक्तिशाली की ओबीसी, अशा अंगांनी परळीची निवडणूक लक्षवेधी ठरेल असे सांगण्यात येत आहे.

मुंडे भावंडांचे राजकीय मार्ग वेगवेगळे असले तरी राज्याच्या सत्तेत दोघांचेही पक्ष एकत्र विसावलेले आहेत. दोघांच्या पक्षांमध्ये युती होईल की होणार नाही, हे अद्याप अनिश्चित असले तरी मुंडे भावंडांचे मागील वर्षभरापासून परस्परांना पूरक राजकारण सुरू आहे. त्याची “सामंजस्य करार” म्हणून परळीत चर्चा होत असते. गतवर्षीप्रमाणेच मुंडे भावंडे पुन्हा एकदा परवाच्या दसरा मेळाव्यात एकत्र दिसले. त्यात ओबीसींच्या हक्कासाठी एकत्रित लढण्याचे थेटपणे त्यांनी जाहीरही केले. विशेषतः धनंजय मुंडे यांनी तशी भूमिका पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून स्पष्टच केली. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे टीकात्मक विधानही माध्यमात चर्चीले गेले.

परळीतील नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले असून, या लढतीमध्ये एखाद्या पक्षीय उमेदवारापेक्षा मुंडे भावंडे जो उमेदवार देतील किंवा दोघे ज्यांच्यामागे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष ताकद उभे करतील तोच उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल, असे मानले जाते.

राज्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी व भाजप, शिंदेंच्या शिवसेनेची महायुती सत्तेवर असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती कायम राहील, असे चित्र सद्यस्थितीत काहीसे दोलायमान आहे. स्वतंत्रपणे लढले तरी दोन्ही भावंडांच्या नेतृत्वाचा परळीत कस लागणार आहे. त्यातही परळी हा ओबीसींचा आणि भाजपच्या सूत्रानुसार दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी बांधलेल्या “माधवं”चा गड असल्याचा संदेश देण्यासाठी दोघांमध्ये “सामंजस्य युती” असेल, असे सांगण्यात येते. परळी नगरपालिकेमधील गैरव्यवहाराची चर्चा विरोधकांकडून केली जाईल का, असा प्रश्नही या निमित्ताने विचारला जात आहे.