जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न केवळ आभास असून त्यातून फक्त राजकीय स्वार्थ साधला जात आहे, अशी भूमिका स्थलांतरित काश्मिरी पंडितांची संघटना असलेल्या पनुन काश्मीरने केंद्र सरकारकडे मांडली आहे. पनुन काश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रुंगू (Ajay Chrungoo) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे पुंछ आणि राजौरी जिल्ह्यांत मागच्या एक-दीड वर्षात सुरक्षा दलावर झालेल्या हल्ल्यांबाबत आश्चर्य व्यक्त केले. या प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला की, पुंछ-राजौरी जिल्ह्यांत पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या जंगलावर भरताचे नियंत्रण आहे की नाही?

“ऑक्टोबर २०२१ नंतर अतिरेकी वारंवार आपल्या सुरक्षा दलावर हल्ला करून मोठी जीवितहानी कशी काय करत आहेत? राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांत सुरू असलेल्या कट्टरतावादाबाबत केंद्र सरकारला काही कल्पना आहे का? केंद्र सरकारने मुघल मार्ग सुरू केल्यानंतर सुरक्षेचे उपाय योजले आहेत का?” असे प्रश्नदेखील च्रुंगू यांनी पत्रकात उपस्थित केले आहेत. त्यांनी पुढे म्हटले की, जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आणि ज्येष्ठ नेत्यांना सुरक्षा पुरविण्यात केंद्र सरकारला अपयश आले, ही बाब केंद्र सरकारने मान्य करायला हवी.

हे वाचा >> दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद, काश्मीरच्या पूँछमध्ये लष्करी वाहन भस्मसात

तसेच सर्वच संकटे ही देशाबाहेरून येत नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पनुन काश्मीरचे अध्यक्ष च्रुंगू म्हणाले की, अनेक अडचणी देशांतर्गत निर्माण केल्या जात आहेत. आपल्याला सार्वजनिकरीत्या हे मान्य करणे अतिशय गरजेचे आहे की, जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी कारवाया या फक्त पाकिस्तानच्या हस्तक्षेपामुळे होत नाहीत, तर त्यामध्ये आपल्याच देशातील काही देशद्रोही तत्त्वांच्या जिहादी शक्तींचाही हात आहे, असेही च्रुंगू यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

च्रुंगू यांनी पुढे म्हटले की, जम्मू-काश्मीरमध्ये सामान्यीकरण झाल्याचा अपप्रचार केला गेला, जेणेकरून काश्मीरमधून पळालेले हिंदू कामगार पुन्हा कामासाठी येतील. काश्मीरमध्ये ठरवून काही लोकांच्या हत्या करण्यात आल्या. या गोष्टीकडे काणाडोळा करून सर्व काही सुरळीत होणार नाही. काश्मीर खोऱ्यात एका समूहाच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हत्यांचे जिहादी युद्ध जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये सामान्य वातावरण निर्माण होणार नाही. जिहादी अलगाववादी लोकांनी हिंदूंना हुसकावून लावण्याची मोहीम दोन वेळा यशस्वी करून दाखवली. यावर भाजपा सरकारने उत्तरादाखल जिहादींना केवळ ताब्यात घेतले आणि त्यानंतर पुन्हा हत्याकांड करण्यासाठी सोडून दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जम्मू आणि काश्मीर हे आता पंजाबनंतर दुसऱ्या क्रमांकाचे अमली पदार्थांचे हब बनले आहे, असेही डॉ. च्रुंगू यांनी सांगितले. प्रत्येकाला माहीत आहेच की, इस्लाम आणि अमली पदार्थांचा व्यापार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवादाची व्याप्ती वाढत आहे, हे सिद्ध करण्यासाठी हे वास्तव पुरेसे आहे. त्यामुळे आमची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती आहे की, त्यांनी वास्तव नाकारण्याची वृत्ती सोडावी आणि सद्य:परिस्थितीत काय सुरू आहे, याचा स्वीकार करून पावले उचलावीत, असेही ते म्हणाले.