Top Five Political News in Today : स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अनेकदा संपवण्याचे प्रयत्न झाल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भिवंडीत मराठी बोलण्याची काय गरज या अबू आझमी यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन १५ रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकला जात असल्याची टीका काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या. मुंबईपासून ते राजधानी दिल्लीपर्यंत घडलेल्या या पाच महत्वाच्या राजकीय घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
आरएसएसला संपवण्याचे प्रयत्न, मोदींचे विधान
स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अनेकदा संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम राहिला, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांच्या या विधानाची संपूर्ण देशभरात चर्चा होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आज (बुधवारी) राजधानी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते संघाला वाहिलेले १०० रुपयांचे विशेष नाणे आणि पोस्टाच्या तिकीटाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी संघाच्या १०० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. राष्ट्र निर्माणाच्या कार्यात संघाच्या योगदानाचा उल्लेख करताना त्यांनी कार्यकर्त्यांचेही कौतुक केले. ‘स्वातंत्र्यानंतर अनेकदा संघाला संपवण्याचे आणि चिरडण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा राहिला. प्रत्येक स्वयंसेवकाने नेहमी समाजासाठी काम केले,’ अशा भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केल्या.
भिवंडीत मराठीची गरज काय? अबू आझमींचा प्रश्न
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी मराठीला उद्देशून केलेल्या एका प्रश्नामुळे राजकीय वाद निर्माण झाला. ‘मराठी और हिंदी में फर्क क्या है? मी मराठी बोलू शकतो, पण ही भिवंडी आहे. इथे मराठीची गरज काय?’, असा प्रश्न आझमी यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. त्यांच्या या विधानाचा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘भिवंडी ही कुणा एकट्याची नाही. अबू आझमी यांनी सांभाळून बोलावे. शिवसेनेचे अनेक आमदार भिवंडीतून निवडून येत होते. हा आमच्या पक्षाचा बालेकिल्ला होता. भिवंडीतील जनता आझमी यांना चोख प्रत्युत्तर देईन’, असे प्रताप सरनाईक म्हणाले. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही अबू आझमींचे कान टोचले. ‘महाराष्ट्रात मराठीत बोलले पाहिजे. भिवंडी काय, गोवंडी काय, चंडी असेल तरी भाषा ही मराठीतच असली पाहिजे’, असे शेलार म्हणाले.
आणखी वाचा : BJP Defeat Election : भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव; निवडणुकीत ४० पैकी २८ जागा गमावल्या, कारण काय?
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनच वसूली
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काढणीला आलेली खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. राज्य सरकारने तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी बळीराजाकडून केली जात आहे. यादरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन पाच रुपये, तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये अशी एकूण १५ रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऊस गाळपसंदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे आणि साखर संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सरकार शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा घातलंय- काँग्रेसची टीका
राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन १५ रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढून पुन्हा शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली. या प्रकारामुळे राज्य सरकारची दिवाळखोरी समोर आली असा घणाघात त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केला. एकीकडे शेतीपिकांचे नुकसान होत असताना सरकारकडून शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकला जात असल्याची टीकाही सतेज पाटील यांनी केली. मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून देखील तुम्ही पैसे घेणार आहात का? अशी विचारणा त्यांनी सरकारला केली. दुसरीकडे शेतकरी नेते राजु शेट्टी यांनीही सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशातून कपात करण्याचा सरकारला कोणताही नैतिक अधिकार नाही, असे ते म्हणाले.
दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात गटात जुंपली
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काही तासांचा अवधी शिल्लक असताना शिंदे आणि ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांचा फैरी पाहायला मिळत आहे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महत्व आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणजे खरी शिवसेना नाही. निवडणूक आयोग आणि भाजपाला सोडले तर दुसरे लोक त्यांना शिवसेना मानत नाही. शिंदेंच्या मेळाव्याला प्रचंड पैशांचा वापर करून लोक आणले जातील”, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना, आम्हाला शक्तीप्रदर्शनाची गरज नाही. लोकांनी आमच्या पक्षाला मतदान करून विजयी केले आहे. शेतकऱ्यांच्या हिसासाठी आम्ही ताकद वापरणार आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असून शिंदेंचा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे.