महेश सरलष्कर

मुंबईतील ‘इंडिया’च्या दोन दिवसांच्या बैठकीत एकजुटीचे गुडीगुडी बोल संपून खऱ्या अर्थाने भाजपविरोधात लढण्याची गंभीर चर्चा सुरू झाली! विरोधी ऐक्यामध्ये जागावाटप हाच कळीचा मुद्दा होता. त्यामध्ये पश्चिम बंगाल, केरळ आणि पंजाब ही तीन राज्ये अडथळा ठरली. पण, काँग्रेसच्या तडजोडीच्या भूमिकेमुळे लोकसभेच्या ५४५ जागांपैकी सुमारे ४४०-४५० जागांवर भाजपविरोधात ‘इंडिया’कडून एकास एक उमेदवार रिंगणात उतरवला जाऊ शकतो, ही बाब स्पष्ट झाली.

‘इंडिया’ची बैठक सुरू असताना दिल्लीत केंद्र सरकारने घेतलेल्या ‘एक देश, एक निवडणूक’ वगैरे धडाकेबाज निर्णयांचा परिणाम विरोधी पक्षनेत्यांच्या चर्चावर झालेला पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही कोणताही निर्णय घेऊ शकतात, त्यांनी लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक जाहीर केली तर ‘इंडिया’ची अडचण होऊ शकते. त्यामुळे बेसावध राहता विरोधकांनाही वेगाने तयारी करावी लागेल, असा सूर बैठकीत निघाला. लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आदी नेत्यांनी जागावाटपांचा प्रश्न तातडीने सोडवला पाहिजे, अशी आग्रही मागणी केली.

हेही वाचा… ‘इंडिया’ आघाडीत जागावाटपावरून मतभेद? ममता बॅनर्जी पत्रकार परिषदेला अनुपस्थित; काँग्रेसची भूमिका काय?

पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) व काँग्रेसची युती असून प्रामुख्याने ‘माकप’ सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी आघाडी करण्यास तयार नसल्याचेही स्पष्ट झाले. बैठकीमध्ये जागावाटपावर अंतिम तोडगा न निघण्यामागे तृणमूल काँग्रेस व ‘माकप’चे मतभेद कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने १८ जागा जिंकल्या होत्या, यावेळी अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरेल. तृणमूल काँग्रेसविरोधातील मतदारांच्या नाराजीचा भाजपने लाभ उठवला तर ‘इंडिया’कडे पर्याय काय असेल, असा सवाल ‘माकप’चे महासचिव सीताराम येचुरी यांनी व्यक्त केल्याचे समजते.

हेही वाचा… आजवर संसदेचे विशेष अधिवेशन कितीवेळा झाले? मोदींचा ‘पब्लिसिटी स्टंट’ अशी टीका विरोधकांनी का केली?

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसविरोधातील मते भाजपला नव्हे तर, भाजपेतर माकप-काँग्रेस युतीला मिळायला हवीत, त्यासाठी तिथे तृणमूल काँग्रेसशी युती फायद्यापेक्षा ‘इंडिया’चे नुकसान अधिक करेल, असे येचुरींचे म्हणणे होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी जागावाटपाच्या मुद्द्यावर माकप व काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असा आग्रह धरला होता. माकप-काँग्रेसने तृणमूल काँग्रेसशी आघाडी करावी असेही बॅनर्जींचे म्हणणे होते. पण, ‘माकप’च्या भूमिकेमुळे ही बोलणी फिसकटली. त्यामुळे नाराज झालेल्या बॅनर्जी ‘इंडिया’च्या पत्रकार परिषदेला हजर राहिल्या नसल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा… संसदेचे विशेष अधिवेशन : विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत चुळबुळ; मुंबईत अनौपचारिक चर्चा

पश्चिम बंगालमधील वादामुळे ‘इंडिया’च्या घटक पक्षांमध्ये सर्व राज्यांत संयुक्त उमेदवार देण्याचा प्रस्ताव अमलात येण्याची शक्यता संपुष्टात आली. केरळमध्ये माकप आघाडी व काँग्रेस आघाडी एकमेकांविरोधात लढतील. इथेही दोन पक्षांमध्ये तडजोड होण्याची शक्यता नाही. पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष व काँग्रेस यांच्यामध्येही युती होण्याची शक्यता नाही. तिथेही हे दोन पक्ष एकमेकांविरोधात लढतील. केरळ व पंजाबमध्ये भाजप नगण्य असल्याने त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संघर्ष ‘इंडिया’साठी फारसा त्रासदायक ठरणार नाही असे मानले जाते.

हेही वाचा… मोदींच्या धक्कातंत्रामुळे ‘इंडिया’मध्ये गोंधळ!

बहुतांश राज्यांमध्ये जागावाटपाबाबत तडजोड केली जाईल, असे काँग्रेसने मुंबई बैठकीत स्पष्ट केल्यामुळे जागावाटपांच्या मतभेदाला वळसा घालून ‘इंडिया’चा पुढे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस व आप यांच्यामध्ये जागावाटपांचा गुंता सुटण्याची शक्यता दिसू लागली आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेससाठी काही जागा सोडल्या तर, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, गुजरात, उत्तराखंड या राज्यामध्ये काँग्रेस सप व माकप या दोन्ही पक्षांना जागावाटपात सामावून घेण्याची शक्यता आहे.