डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत रविवारी नऊ विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमांच्या निमीत्ताने शिंदे यांच्या शिवसेनेने कल्याण, डोंबिवली, २७ गाव परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. डोंबिवलीचे आमदार आणि भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्याचे अैादार्य शिंदे गटाने दाखविले खरे मात्र विकासकामांच्या या झगमगाटात भाजप कुठे आहे, असा प्रश्न मात्र या पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सतावू लागला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होतील असे सर्वत्र वातावरण आहे. कल्याण डोंबिवली आणि ठाणे या दोन शहरांमधील सत्ता राखणे हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी शिंदे यांच्या पक्षासाठी प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप ठरेल असेच सध्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी शिंदे सेनेने डोंबिवली आणि कल्याण परिसरात आयोजित केलेले विवीध विकास सोहळे येथील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत.
कल्याण डोंबिवलीत भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून माजी मंंत्री आणि पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण सक्रिय आहेत. सार्वजनिक राजकीय कार्यक्रमात खासदार शिंदे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हसतखेळत वावरताना दिसतात. प्रत्यक्षात मात्र चित्र तसेच नाही हे डोंबिवलीतील सर्वश्रूत आहे. रविवारच्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या कार्यक्रमातून तेच दिसले. महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून राबविण्यात येत असलेले प्रकल्प, असा थेट उल्लेख होता. महापालिकेत आजही आमचाच वरचष्मा आहे हे दाखविण्याचा शिंदेसेनेचा हा प्रयत्न होता अशी चर्चा आता रंगली आहे.
कल्याण डोंबिवलीत वावर उपमुख्यमंत्र्यांचाच
या भूमिपूजन कार्यक्रमाचे डोंबिवली, कल्याणमध्ये रस्तोरस्ती फलक झळकविण्यात आले होते. या फलकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रतिमा होत्या. निधी शासनाचा असुनही या फलकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, स्थानिक आमदार चव्हाण यांच्या प्रतिमा नव्हत्या. काही फलकांवर नाण्याच्या आकारा एवढ्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा होती. त्यामुळे भाजप कार्यकर्ते अस्वस्थ होते. कार्यक्रम महापालिकेचा आणि श्रेय मात्र शिंदेसेना घेत आहे यामुळे अस्वस्थ असलेल्या भाजपच्या एका लोकप्रतिनिधीने या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारण्यास नकार दिल्याची चर्चाही होती. महापालिकेत चेन्नई पॅटर्न कचरा प्रकल्प राबविताना येथे अनेक वर्ष कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या सुमारे ६०० ते ७०० कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. शिंदे शिवसेनेच्या निमंत्रकांनी मनधरणी केल्यानंतर भाजपच्या त्या लोकप्रतिनिधीने कार्यक्रमाचे निमंत्रण स्विकारले अशी चर्चा आहे. महापालिकेतील घनकचरा विभागातील कामगारांना या प्रकल्पात सामावून घ्या, अशी सूचना शिंदे पिता पुत्रांना पालिकेला करावी लागली.
शिवसेनेचाच वरचष्मा
डोंबिवलीतील कार्यक्रमात शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक तसेच डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांचा मोठा भरणा होता. ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक हे भाजपचे एकमेव मंत्री आहेत. ते पालघरचे पालकमंत्री असले तरी कल्याण डोंबिवलीत त्यांचा नेहमीच वावर राहीला आहे. असे असताना या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती नव्हती. या संपूर्ण सोहळ्यावर शिंदेसेनेचा वरचष्मा राहील अशाच पद्धतीची आखणी करण्यात आल्याने नाईकांना याठिकाणी बोलविण्याचा प्रश्नच नव्हता अशी प्रतिक्रिया या भागातील एका राजकीय जाणकाराने दिली. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला गणेश नाईक सातत्याने आव्हान देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाईकांना या सोहळ्यांपासून दूर ठेवत कल्याण डोंबिवलीत निवडक महायुतीचे दर्शन घडविण्यात आल्याची चर्चा आहे.
रविवारच्या पालिकेच्या कार्यक्रमात शिंदे शिवसेना किंवा भाजपमध्ये कोणतीही धुसफूस नव्हती. आमच्या नेत्यांच्या प्रतिमा आवश्यक त्या ठिकाणी होत्या. युतीधर्म पाळून कालचा कार्यक्रम पार पडला. – नंदू परब, जिल्हाध्यक्ष,भाजप कल्याण जिल्हा.
कालचा कार्यक्रम पालिकेचा होता. युतीधर्म पाळून आम्ही हा कार्यक्रम पार पडला. येथे दुजाभावाचा प्रश्न येतच नाही. – संतोष चव्हाण, डोंबिवली विधानसभा क्षेत्र प्रमुख, शिंदे शिवसेना.