संतोष मासोळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष जनहिताच्या मार्गाकडे वळल्याने सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आरोग्य सेवेतील त्रुटींकडे एरवी राजकीय पक्षांचे लक्ष फारसे जात नाही. राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांशी संंबंधित रुग्णावर अन्याय झाला किंवा त्याची भेट घेण्यासाठी आलेले लोकप्रतिनिधी, पदाधिकारी रुग्णालयातील परिस्थिती समजून घेताना दिसतात. शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित याही परिचयातील एका रुग्णाच्या भेटीस येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात आलेल्या असताना तेथील अस्वच्छता नजरेस पडली आणि त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हा प्रशासनास निवेदनही दिले. शिंदे गटाने समस्यांवर आवाज उठवला; परंतु संधी साधली शिवसेनेने. पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून त्वरीत स्वच्छता मोहीम राबवून रुग्णालय परिसरातून दोन टन कचरा गोळा केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उघड भूमिका घेत शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख सतीश महाले, मनोज मोरे आणि संजय गुजराथी हे शिंदे गटात गेले. शिंदे गटाचे बळ वाढविण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होत आहेत. आमदार मंजुळा गावित या एका रुग्णाच्या भेटीसाठी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात आलेल्या असताना तेथील समस्या निदर्शनास आल्या. गावित यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात लेखी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयास भेट दिली आणि आवश्यक त्या सूचना केल्या. हे सगळे घडत असतांना मूळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उचल खाल्ली आणि त्यांनीही वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवत जवळपास दोन टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.

हेही वाचा… एकाचवेळी दोन ठरावांच्या मंजुरीमुळे काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडीच्या गुंतागुंतीत वाढ

खरे तर माजी जिल्हा महानगर प्रमुख हिलाल माळी यांचे हे कार्यक्षेत्र मानले जात होते. शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून माळी यांनी जिल्हा रुग्णालय किंवा हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी निगडीत जवळपास सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला होता. व्हेंटिलेटर, सिटी स्कॅन यंत्र असो, कुणाच्या शस्त्रक्रियेशी निगडित समस्या असो किंवा तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असो. या सगळ्यांची इत्थंभूत माहिती ठेवून माळी यांनी कितीतरी वर्षे रुग्णसेवेत घालवली. त्यांच्या या कर्तृत्वाच्या जोरावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली होती. माळी यांच्या पसंतीच्या ग्रामीण मतदार संघाऐवजी त्यांना शहरातून उमेदवारी देण्यात आली. त्यांना पराभव स्वीकारावा लागला, परंतु, ते तत्कालीन आमदार अनिल गोटे आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मतांमध्ये वाटेकरी झाल्याने माळी यांच्यासह गोटे आणि कदमबांडे दोघेही पराभूत होऊन एमआयएमचे डॉ.फारूक शहा हे विजयी झाले होते. सद्यस्थितीत माळी यांच्यावर शिंदखेडा, शिरपूर आणि दोंडाईचा या भागाचे सहसंपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे कार्यक्षेत्राचा विचार केला तर त्यांचा धुळे शहर आणि परिसराशी पक्षीय कार्यक्रमांच्या दृष्टीने फारसा संबंध राहिलेला दिसत नाही.

हेही वाचा… नगरविकासमंत्री होतो तरी तेव्हा अधिकारच नव्हते …मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना चिमटा

माळी यांनी रुग्णालयातील समस्यांचे मुद्दे हाती घेऊन शिवसेनेचा चेहरा ज्या पद्धतीने लोकांसमोर आणला, तीच पद्धत आता शिंदे गटाकडून वापरली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे गटातील साक्रीच्या आमदार गावित यांनी अचानक घडवून आणलेली ही अनपेक्षित कार्यपद्धती म्हणजे मूळ शिवसेनेला आव्हान देत जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा अधिकाधिक प्रिय करण्याचा प्रयत्न असल्याचे अधोरेखित होत आहे. केवळ फोटोसेशनसाठी कार्य न करता प्रत्यक्ष राबून रुग्णसेवा करण्यावर आपला भर राहील, असे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आपण दर आठवड्याला अशी स्वच्छता करू, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… राज ठाकरे यांच्या दौऱ्याने विदर्भात मनसे बाळसे धरणार?

कोट्यवधींचा निधी येऊनही हिरे रुग्णालयात कुठलेच काम होत नसून हा निधी जातो कुठे, असा प्रश्न शिवसेनेने केला आहे. हिरे रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत नेहमीच ओरड असते. परंतु, हिरे रुग्णालय प्रशासन याकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करते, असा आरोपही शिवसेनेने केला. यावर उपाय म्हणून शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ५० शिवसैनिक प्रत्येक आठवड्यात या रुग्णालयातील प्रत्येक वार्डात स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. तसेच शिवसेना या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी स्वच्छतेबाबत सूचित करणार आहे. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आमदार प्रा.शरद पाटील, महानगर प्रमुख धीरज पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी परिसरात स्वच्छता राहील, यासाठी लक्ष देण्याचे ठरविले आहे. परंतु, रुग्णांना येणाऱ्या अडचणी, हवी असलेली अन्य मदत कशी मिळेल यासाठी शिंदे किंवा ठाकरे गट नेमक्या कोणत्या भूमिकेत राहील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Positive effects of politics between shinde group and shiv sena government medical hospital area cleaned in dhule print politics news asj
First published on: 19-09-2022 at 18:15 IST