Bihar Assembly elections 2025 बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. दोन टप्प्यांत येथील निवडणुका होणार आहेत. ६ व ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत इंडिया आणि एनडीए आघाडीसह प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्षही महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, आता राजकीय रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयावर भाजपाकडूनही टीका केली जात आहे.

काय म्हणाले प्रशांत किशोर?

  • ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना निवडणूक रणनीतीकार-राजकारणी प्रशांत किशोर यांनी सांगितले, “मी निवडणूक लढवणार नाही. पक्षाने हा निर्णय घेतला आहे. मी पक्षात जे काम करीत आलो आहे, तेच सुरू ठेवणार. पक्षाच्या व्यापक हितासाठी मी संघटनात्मक काम करीत राहीन.”
  • यापूर्वी, किशोर यांनी त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या करगहर किंवा राघोपूर यापैकी एका जागेवरून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते.
  • मात्र, मंगळवारी पक्षाने राघोपूर विधानसभा जागेसाठी चंचल सिंह यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केल्यावर किशोर निवडणूक लढवणार नाहीत हे स्पष्ट झाले.

त्यांच्या पहिल्या यादीत, जन सुराजने लोकप्रिय भोजपुरी गायक रितेश पांडे यांना करगहर येथून उमेदवारी दिली आहे. राघोपूर मतदारसंघ यादव कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो आणि सध्या त्याचे प्रतिनिधित्व आरजेडी नेते तेजस्वी यादव करीत आहेत. या भागाच्या भेटीदरम्यान किशोर यांनी आरजेडीला सणसणीत इशारा दिला होता की, तेजस्वी यांनी राघोपूरमधून निवडणूक लढवल्यास त्यांना ‘अमेठीसारख्या पराभवाला’ सामोरे जावे लागू शकते. हा संदर्भ राहुल गांधींचा त्यांच्या कौटुंबिक बालेकिल्ल्यात २०१९ मध्ये झालेल्या पराभवाशी जोडलेला आहे.

२४३ सदस्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाने आतापर्यंत ११६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा आणि एक ‘अनटेस्टेड’ पक्ष म्हणून पाहिला जाणारा जन सुराज बिहारमधील सर्व २४३ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. उमेदवारांमध्ये मोठमोठी नावे समाविष्ट आहेत. पाटणा जिल्ह्यातील कुम्हरारमधून गणितज्ञ के. सी. सिन्हा, करगहरमधून भोजपुरी गायक रितेश रंजन पांडे व समस्तीपूरमधील मोरवामधून माजी मुख्यमंत्री व समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांची नात डॉ. जागृती ठाकूर यांसारख्या नावांचा यादीत समावेश आहे. प्रशांत किशोर यांनी सांगितले होते की, त्यांच्या उमेदवारांची निवड त्यांनी लोकांसाठी केलेल्या कामांच्या आधारावर करण्यात आली आहे. “आता जर तुम्ही अशा लोकांना मतदान केले नाही, तर ते प्रशांत किशोर यांची जबाबदारी नाही. ही बिहारच्या जनतेची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले होते.

भाजपाने प्रशांत किशोर यांच्या निर्णयावर काय म्हटले?

भाजपाने किशोर यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. भाजपाच्या मते, किशोर यांना माहिती आहे की, “जर त्यांनी निवडणूक लढवली, तर त्यांची अनामत रक्कम जप्त होईल आणि म्हणूनच त्यांनी माघार घेतली.” प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढविण्यासाठी निर्धारित केलेली रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. त्यालाच अनामत रक्कम म्हटले जाते. जर कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीमध्ये एकूण मतांच्या एक-षष्ठांश मतेही मिळवता आली नाहीत, तर त्याच्याकडून जमा केलेली अनामत रक्कम आयोगाकडून जप्त केली जाते.

भाजपा नेते प्रदीप भंडारी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, “प्रशांत किशोर यांना माहीत आहे की, त्यांच्या पक्षाचा बिहारमध्ये निवडणुकीच्या दृष्टीने नगण्य प्रभाव आहे. प्रशांत किशोर यांनी उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. कारण- त्यांना माहीत आहे की, तसे केल्यास त्यांची अनामत रक्कम जप्त होईल. जन सुराज, आरजेडी, काँग्रेस या सर्वांना बिहारमधील जमिनीवरील परिस्थिती माहीत आहे की बिहारची जनता एनडीएबरोबर आहे.”

बिहार विधानसभा निवडणूक २०२५

बिहारमधील २४३ विधानसभा जागांसाठी निवडणूक दोन टप्प्यांत होणार आहे. सध्या एनडीए आघाडीकडे १३१ जागा आहेत—ज्यात भाजपा (८०), जेडीयू (४५), हिंदुस्तानी अवाम मोर्चा (४) आणि दोन अपक्ष यांचा समावेश आहे. तर, विरोधी महाआघाडीकडे १११ जागा आहेत— ज्यात आरजेडी (७७), काँग्रेस (१९), सीपीआय(एमएल) (११), सीपीआय(एम) (२) आणि सीपीआय (२) यांचा समावेश आहे.

भाजपाने प्रशांत किशोर यांच्यावर केलेले आरोप

प्रशांत किशोर यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजपाने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भाजपाचे प्रदेश माध्यम प्रभारी दानिश इक्बाल यांनी प्रशांत किशोर यांच्यावर राष्ट्रीय जनता दल (RJD) नेतृत्वाखालील महाआघाडीला अप्रत्यक्षपणे मदत करीत असल्याचा आरोप केला होता. “निवडणुकांदरम्यान व्यावसायिक मदतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांकडून त्यांच्या पक्षाला अजूनही निधी का मिळत आहे,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

“पश्चिम बंगालमधून ३७० कोटींहून अधिक रुपये आले आहेत, जिथे त्यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससाठी काम केले होते. त्याशिवाय, किशोर यांना तेलंगणा, तमिळनाडू व कर्नाटकसारख्या राज्यांतूनही मोठा निधी मिळत आहे,” असा दावा त्यांनी केला. “किशोर बिहारमध्ये जंगल राज परत आणण्याचा मार्ग मोकळा करत आहेत. त्यांचा जन सुराज हा फसवणुकीवर आधारित राजकीय स्टार्ट-अप आहे. ते डझनभर शेल कंपन्यांद्वारे शेकडो कोटी रुपये उभे करत आहेत, ज्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह यांचे नातेवाईक सामील आहेत. तसेच, त्यांच्या पक्षाने राज्यातील २४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या लोकांकडून ५० कोटींहून अधिक रुपये जमा केले,” असा आरोप इकबाल यांनी केला.