scorecardresearch

शेकापच्या अस्तित्वाचाच प्रश्न

एकेकाळी शेकाप म्हणजे रायगड असे समीकरण होते. निवडणूकांमधील पराभवांच्या मालिकामुळे पक्षाचे भवितव्य अडचणीत आले आहे.

peasants and workers party of india, Konkan, election
शेकापच्या अस्तित्वाचाच प्रश्न ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

हर्षद कशाळकर

अलिबाग : कोकण शिक्षक मतदार संघात बाळाराम पाटील यांच्या बाळाराम पाटील यांच्या पराभवामुळे शेकापच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. निवडणूकांमधील पराभवांच्या मालिकामुळे पक्षाचे भवितव्य अडचणीत आले आहे.

एकेकाळी शेकाप म्हणजे रायगड असे समीकरण होते. जिल्ह्यातून चार ते पाच शेकापचे आमदार विधानसभेवर निवडून जात असत. पक्षाचा खासदारही शेकापचाच असायचा. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर पक्षाची घट्ट पकड होती. गेल्या काही वर्षात पक्षाची जिल्ह्यावरची पकड सैल होण्यास सुरवात झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत पक्षाचा एकही आमदार निवडून येऊ शकला नव्हता. आता विधान परिषदेवर निवडणूकीतही पक्षाच्या पदरी अपयश आल्याचे पहायला मिळत आहे.

हेही वाचा… पटोले-थोरात वादाची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल, प्रभारी एच. के. पाटील यांना पाचारण

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाली आहे. त्यामुळे पनवेल आणि उरण मधील कार्यकर्त्यांची मोठी कोंडी झाली होती. या प्रतिकूल परिस्थितीत बाळाराम पाटील यांनी पक्ष संघटन टिकवून ठेवण्याचे काम केले होते. आमदार असल्याने त्यांचा मोठा आधार पनवेल आणि उरण मधील कार्यकर्त्यांना होता. आता विधान परिषद निवडणूकीत पराभव झाल्याने हा आधारही नाहीसा होणार आहे. सत्तेचे आणि अधिकारांचे पाठबळ नसल्याने पक्षाची कोंडी होणार आहे.

हेही वाचा… अदाणींबरोबर पंतप्रधान मोदींचे संबंध काय? थेट राहुल गांधींनी संसदेत फोटो दाखवले; म्हणाले…

गेल्या विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील पक्षात फारसे सक्रीय असल्याचे दिसून येत नाहीत. अधून मधून ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या मात्र उठत असतात. अलिबागचे माजी आमदार सुभाष पाटील जिल्ह्याच्या राजकारणात सहभागी होतांना दिसत नाहीत. जिल्हा परिषद आणि नगरपालिकांवर प्रशासकराज असल्याने सत्तेचे पाठबळ राहीलेले नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये मरगळ आल्याचे पहायला मिळत आहे. याचे परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत होण्याची चिन्ह दिसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… राज्य काँग्रेसमधील संघर्षाला जबाबदार कोण ?

आजवरच्या प्रतिकूल परिस्थीत रायगड जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवला होता. मात्र आता रायगड जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. निवडणूकांमधील सततचे पराभव हे कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करणारे आहेत. त्यामुळे पक्षाने यातून बोध घेणं गरजेचे आहे. या परिस्थितीत पक्षसंघटना टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नव्या राजकीय समीकरणांची जुळवा जुळव करावी लागणार आहे. पक्षाची पडझड थोपवणे महत्वाचे आहे. जुन्या जाणत्या नेत्यांना विश्वासात घेऊन नवीन कार्यकर्त्यांची मोट बांधावी लागणार आहे. अन्यथा राज्यातील डाव्या विचारांचा वारसा सांगणारा पक्ष नामशेष होण्यास वेळ लागणार नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 10:32 IST
ताज्या बातम्या