सतीश कामत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम या मूळ शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेल्या दोन नेत्यांमध्ये सध्या पेटलेल्या वादामुळे जुन्या काळातील शिवसेनेची ‘राडा संस्कृती‌’ पुन्हा डोके वर काढू लागली आहे.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गेल्या शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. रत्नागिरी आणि दापोली या दोन ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा झाल्या, तर रत्नागिरीहून दापोलीपर्यंतच्या प्रवासात अनेक ठिकाणी रस्त्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. शिवसेनेचं नेतेपद नुकतंच लाभलेले आमदार जाधव या दौऱ्यात ‘स्टार वक्ते’ होते. त्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ उठवत आपल्या जुन्या राजकीय स्पर्धक, खरं तर ‘शत्रूं’वर यथेच्छ तोंडसुख घेतलं. रत्नागिरीत स्थानिक आमदार आणि शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांच्या व्यक्तिगत जीवनातील काही संदर्भ देत खालच्या पातळीवरून टीका-टवाळी केली आणि दापोलीत रामदास कदम यांच्या जुन्या राजकीय कोलांट्या एकेरी भाषेत उघड करत उपस्थित कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळवल्या. यावर, सामंतांनी नेहमीच्या संयत, पण उपरोधिक शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केल्याने त्यांच्याबाबतीत जाधवांचा बार फुसका निघाला. पण रामदासभाई या सापळ्यात अलगद अडकले.

हेही वाचा… शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा मुद्दा उच्च न्यायालयात, उद्या सुनावणी

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला उत्तर म्हणून गेल्या रविवारी आयोजित जाहीर सभेत कदमांनी जाधवांचा हल्ला परतवण्याच्या नादात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही अश्लाघ्य टीका केली. तेव्हापासून राज्यभरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. रत्नागिरीत शिवसैनिकांनी कदमांच्या प्रतिमेचे दहन केलं, तर दापोलीतील पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याच्या निमित्ताने दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. तिथे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावंतांच्या गटाने रामदास कदम यांचे आमदार पुत्र योगेश कदम यांच्या गटाला आव्हान दिलं आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे सोमवारी या दोन गटांमधील हमरातुमरी आटोक्यात आली. पण वातावरण धुमसत राहिलं आहे.

हेही वाचा… दसरा मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; गटप्रमुखांच्या मेळाव्यात चालणार ‘बाण’!

प्रतिपक्षाला डिवचून अंगावर घेणं, ही जाधवांची जुनी खेळी आहे. यापूर्वीही, २०११ मध्ये ते आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीमध्ये असताना जाधवांनी जाहीर कार्यक्रमात राणेंचा ‘कोंबडी चोर’ असा उल्लेख करुन उचकावलं होतं. त्या वेळी त्यांना राणे गटाकडून अपेक्षित प्रतिक्रिया आली. राणेंचे थोरले चिरंजीव, तत्कालीन खासदार नीलेश राणे यांच्या समर्थकांनी चिपळूण येथील जाधवांच्या संपर्क कार्यालयाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. सिंधुदुर्गात त्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्राही निघाल्या. हीच खेळी त्यांनी कदमांच्या बाबतीत यशस्वीपणे वापरली आहे. अर्थात जाधव-कदम या दोन नेत्यांमध्ये सध्या पेटलेल्या संघर्षाला पूर्वेतिहासाचेही संदर्भ आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघात रामदास कदम भाजपा-सेना युतीचे आणि जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. त्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी बंडखोरी केल्यामुळे कदमांचा पराभव झाला. त्या निवडणुकीत जाधव निवडून आले, एवढंच नव्हे तर राज्यातील कॉंग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीही झाले. या घडामोडींमुळे दुखावलेले कदम पूर्ण निष्क्रिय झाले होते. कालांतराने शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेत संधी मिळाली. त्यानंतर जाधवांच्या विरोधात त्यांनी जोरदार आघाडी उघडली. जाधवांचा बेकायदा वाळू व्यवसाय असल्याचा आरोप करत ‘वाळू चोर’ अशा शब्दात त्यांची संभावना केली. पण नंतरच्या काळात पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलं की २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोकणात ताकद वाढवण्यासाठी कदमांच्याच पुढाकाराने जाधवांचा शिवसेनेत प्रवेश झाला आणि गुहागर मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडूनही आले.

हेही वाचा… दापोलीत शिंदे गटाच्या मेळाव्यात भाजप पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर स्थान

आता मात्र या दोन नेत्यांमध्ये पुन्हा २००९ नंतरच्या काळासारखं वितुष्ट निर्माण झालं आहे. काहीशा बाजूला पडलेल्या माजी आमदार दळवींनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे आणि श्रेष्ठींप्रती आपली निष्ठा सिध्द करण्यासाठी कदम, दळवी व जाधव या तीन आजी-माजी नेत्यांनी ‘शिवसेना श्टाईल’ शैलीचा अंगीकार केला आहे. त्यामुळे कोकणात शिवसेनेच्या ‘राडा संस्कृती’चं पुनरुज्जीवन होण्याचा धोका बळावला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rada culture back in konkan again print politics news asj
First published on: 21-09-2022 at 12:24 IST