अलिबाग : रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा तिढा कायम राहीला आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने, सात पैकी सहा मतदारसंघात युती आणि आघाडी मध्ये बिघाडी कायम राहिल्याचे चित्र आहे.

शिवसेना ठाकरे गटाने शेकाप विरोधात अलिबाग, पेण, उरण आणि पनवेल मध्ये उमेदवार उभे केले होते. यातील अलिबाग, पेण आणि पनवेल मधील उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्याबदल्यात उरण मधून शेकापने आपला उमेदवार मागे घ्यावा अशी अपेक्षा होती. ठरल्या प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाने अलिबाग मधून जिल्हाप्रमुख सुरेद्र म्हात्रे यांचा अर्ज मागेही घेतला. मात्र शेकापने उरण मधून प्रितम म्हात्रे यांचा अर्ज कायम ठेवला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने पेण आणि पनवेल मधून आपले उमेदवार कायम ठेवले आहेत. त्यामुळे शेकाप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मतांचे विभाजन होणार हे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा-Buldhana Vidhan Sabha Constituency : सातत्य राखण्याचे युतीपुढे तर कामगिरी उंचावण्याचे आघाडीसमोर आव्हान!

अलिबाग मधून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. मात्र श्रीवर्धन मधून त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे श्रीवर्धन मध्ये महाविकास आघाडीतील मतांचे विभाजन अटळ झाले आहे. महाविकास आघाडी प्रमाणे महायुतीची परिस्थिती फारशी वेगळी नाही. अलिबागमधून भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांच्या अडचणी वाढणार आहेत. तर कर्जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बंडखोर सुधाकर घारे यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांची कोंडी अटळ आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीत घटक पक्षांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव आणि अविश्वास यामुळे प्रकर्षाने समोर आला आहे. तर महायुती मध्ये कर्जत आणि अलिबाग मध्ये झालेल्या बंडखोरीला वैयक्तिक वादाची किनार आहे.