गोंदिया : काँग्रेसने अनुसूचित जनजातीकरिता राखीव आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सहेसराम कोरेटी यांचे तिकीट कापून त्यांच्या ऐवजी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली आहे. तर, अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून तिरोड्याचे माजी आमदार व काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांना संधी देण्यात आली आहे.

कोरेटी यांच्या उमेदवारीला लोकसभेत निवडून आलेले खासदार नामदेवराव किरसान यांचा विरोध होता. मुलगा दुष्यंत किरसान याच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. या दोघांतील रस्सीखेच काँग्रेस पर्यवेक्षक नायक थलैया यांच्यासमोरही उघडकीस आली होती. इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान खासदार कीरसान, त्यांचे पुत्र दुष्यंत आणि आमदार कोरेटी यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दोघांनाही टाळून तिसऱ्याला उमेदवारी दिली. यामुळे आता विद्यमान आमदार काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >>>दक्षिण नागपूर मतदारसंघ काँग्रेसकडे, २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या अर्जुनी मोरगाव येथून बनसोड यांना उमेदवारी जाहीर होताच स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी  संताप व्यक्त केला आहे. दिलीप बनसोड यांना जाहीर करण्यात आली असून अंतर्गत वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. याशिवाय शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातून विरोध होत आहे. अंतर्गत बंडाळी आणि मतदारांचे मन वळविण्याचे मोठे आव्हान स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे. येथून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या अजय संभाजी लांजेवार यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. या व्यतिरिक इतर १७ इच्छुक उमेदवार आता कोणती भूमिका घेतात, हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >>>शेतकरी संघटनांची ऊसदर आंदोलने यंदा थंड ! आचारसंहितेमुळे निकालानंतर लढाईची तयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पटोलेंच्या ‘लॉलीपॉप’मुळे अनेकांचा हिरमोड

उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर होताच काँग्रेसमधील अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून आपल्याला केवळ ‘लॉलीपॉप’ मिळाल्याची भावना इच्छुकांमध्ये आहे. पटोलेंची भूमिका आणि स्वभाव यासाठी कारणीभूत मानले जात आहे. पटोले यांच्याकडून सर्व इच्छुकांना आश्वासनरूपी ‘लॉलीपॉप’ दिल्या जातो. यामुळे सर्व इच्छुक आपणच पुढील आमदार, या अविर्भावात वावरतात आणि पक्षाची कामे करतात. यंदाही पटोलेंनी अनेकांना ‘लॉलीपॉप’ दिले, मात्र उमेदवारी मिळाली ती दिलीप बनसोड यांनाच. बनसोड यांनी दोन महिन्यांआधी अर्जुनी मोरगाव येथे ३५ लाखांचे घर घेतले. येथील रहिवासी नसतानाही फलकांवर त्यांचा रहिवास अर्जुनी मोरगाव येथील दाखविल्या जातो. नाना पटोले यांच्या या ‘लॉलीपॉप’रूपी राजकारणामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला असून त्याचीच चर्चा अर्जुनी मोरगाव मतदारसंघांत आहे.