संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : बंड करणारे किंवा बंडात सहभागी होणारे आमदार पुढील निवडणुकीत पराभूत झाल्याची अनेक उदाहरणे राज्याच्या राजकारणात आहेत. अगदी पुलोदपासून, समाजवादी काँग्रेस, छगन भुजबळ समर्थक, जनता दल, नारायण राणे समर्थकांना पराभवाचा धक्का बसला आहे. हीच परंपरा आता एकनाथ शिंदे यांच्या बंडातील आमदारांबाबतही सुरू राहते का, हे आता पुढील निवडणुकीत बघायला मिळेल.

छगन भुजबळ यांच्याबरोबर शिवसेनेतून बाहेर पडलेले बहुतांशी आमदार पुढील निवडणुकीत पराभूत झाल्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत करून दिली. पण राज्यात जेव्हा केव्हा बंड झाले अथवा मोठ्या प्रमाणावर घाऊक पक्षांतरे झाली त्यानंतर या आमदार मंडळींचा पुढील निवडणुकांमध्ये पराभव झाल्याची राज्यात उदाहरणे आहेत. बंडखोरांच्या पराभवाच्या या परंपरेमुळेच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंड करणाऱ्या शिवसेना आमदारांना अधिक सावध व्हावे लागेल.

पुलोदचा प्रयोग

१९७७ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाचे ९९, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ६९ तर इंदिरा काँग्रेसचे ६२ आमदार निवडून आले होते. दोन्ही काँग्रेसने वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. पुढे शरद पवार यांनी १९७८ मध्ये पुलोदचा प्रयोग केला. जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन केले. इंदिरा गांधी सत्तेत आल्यावर पवारांचे सरकार बरखास्त करण्यात आले. १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला १८६ जागा मिळाल्या. जनता पक्षाची सदस्यसंख्या ९९ वरून १७ वर घटली. तेव्हा जनता पक्षाच्या आमदारांनी बंड केले नव्हते वा पक्षांतरही केले नव्हते. फक्त शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला पाठिंबा दिला होता. पण जनता पक्ष तेव्हा राज्यात पार नामशेष झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ६९ पैकी निम्म्यापेक्षा अधिक आमदार पराभूत झाले होते. त्यात दिग्गजांचा समावेश होता.

समाजवादी काँग्रेस

पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजेच पुलोदचा प्रयोग फसल्यावर शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस स्थापन केली होती. १९८०च्या निवडणुकीत पवारांनी अर्स काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. तेव्हा अर्स काँग्रेसचे ४७ आमदार निवडून आले होते. पुढे यातील ३५च्या आसपास आमदारांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९८५ च्या निवडणुकीत यातील बहुसंख्य आमदार पराभूत झाले. यापैकी काही आमदार तर पुन्हा कधीच विधानसभेत दिसले नाहीत, असा अनुभव शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केला आहे.

छगन भुजबळ यांचे बंड

१९९०च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५२ आमदार निवडून आले होते. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षातून छगन भुजबळ यांनी बंड पुकारले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात १८ जणांनी स्वतंत्र गट स्थापन केला. भुजबळ व त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्र‌वेश केला. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत दोन तीन अपवाद वगळता खुद्द छगन भुजबळांसह सारेच आमदार पराभूत झाले. माझगाव मतदारसंघात बाळा नांदगावकर यांनी भुजबळ यांचा पराभव केला होता.

जनता दलातील फूट

१९९०च्या निवडणुकीत जनता दलाचे २४ आमदार निवडून आले होते. पण बबनराव पाचपुते व पक्षाच्या ११ आमदारांनी बंड केले. या आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. १९९५च्या निवडणुकीत यातील बहुसंख्य आमदार पराभूत झाले होते.

गणेश नाईक पराभूत

नवी मुंबईतील शक्तीमान नेते गणेश नाईक यांनी शिवसेनेला आव्हान देत १९९८ मध्ये स्वतंत्र संघटना स्थापन केली होती. पण १९९९च्या निवडणुकीत सीताराम भोईर या नवख्या कार्यकर्त्याने नाईकांचा नवी मुंबई या त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभव केला होता.

नारायण राणे यांचे बंड

२००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केले. राणे यांना शिवसेनेतील मोठ्या प्रमाणावर आमदारांची साथ मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण शिवसेनेतील १० ते १२ आमदारांनीच राणे यांना साथ दिली होती. स्वत: राणे व कोकणातील आमदारांनी राजीनामे देऊन पोटनिवडणुका लढविल्या होत्या. राणे यांच्यासह गणपत कदम, शंकर कांबळी व सुभास बने हे तिघे पोटनिवडणुकीत निवडून आले. पण श्रीवर्धनमध्ये शाम सावंत हे पराभूत झाले. रामटेक लोकसभा मतदारसंघात सुबोध मोहिते हे राणे समर्थक पराभूत झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत नारायण राणे यांचा कुडाळ विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. तर २०१५ मध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पुन्हा नारायण राणे पराभूत झाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebellious mla defeated is tradition in maharashtra politics print politics news asj
First published on: 24-06-2022 at 12:15 IST