Revanth Reddy On PM Narendra Modi : महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातला गेल्याचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशभरातील अनेक उद्योग गुजरातमध्ये वळवल्याचे आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. दरम्यान आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी एक्स्प्रेस अड्डावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत.

पंतप्रधान मोदी विरोधी राज्यांना संपवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असून पंतप्रधान कार्यालयाकडून विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये येणारी गुंतवणूक गुजरातकडे पाठवली जात असल्याचा आरोप रेड्डी यांनी यावेळी केला आहे . “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत”, अशी टीकाही रेड्डी यांनी यावेळी बोलताना केली.

पुढे बोलताना रेड्डी म्हणाले की, “२००४ ते २०१४ पर्यंत सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्ष होत्या आणि मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्या १० वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांनी ‘गुजरात मॉडल’ची जगभरात जाहिरात केली. तेव्हा केंद्र सरकारने मोदींना सहकार्य केले. विरोधकांची सत्ता असो किंवा नसो, प्रत्येक राज्याला त्याच्या विकासासाठी पाठिंबा देण्यात आला. मग ते परवानगी देणे असो की निधी पुरवणे. यामुळेच गुजरात मॉडेल शक्य झाले. पण आज नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर असताना मात्र विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. ते विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांना संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. का? हेच गुजरात मॉडेल आहे”.

आम्ही १० वर्ष सत्तेत होतो पण…

“जर तेलंगणा येथे गुंतवणूक येत असेल आणि गुंतवणूकदार राज्यात पैसा गुंतवण्यास तयार असेल, तर पंतप्रधान कार्यालय त्यांना गुजरातमध्ये जाण्यास सांगते. ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण मोदी हे गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. कारण त्यांच्यासाठी प्रत्येक गुंतवणूक आणि प्रत्येक दृष्टीकोन गुजरात आहे. आम्ही १० वर्षं सत्तेत होतो, पण गुजरातकरिता कुठलीही अडचण निर्माण केली नाही”, असेही रेवंथ रेड्डी यावेळी म्हणाले.

हेही वाचा >> तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना रेड्डी म्हणाले की, “मोदी हे भारताला पाच ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याविषयी बोलतात, पण विरोधकांना सोबत न घेता. तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू यांच्याशिवाय ते पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्था कशी बनवणार? ते महाराष्ट्राशिवाय हे ध्येय कसं गाठणार? ती तर देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रातून १७ गुंतवणुका गुजरातला गेल्या आहेत, गुजरात मॉडेल देशासाठी धोकादायक आहे”.