करोनाच्या संकटाचा सामना केल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात यंदा दिवाळी साजरी केली जात आहे. मात्र, त्यातही काही राज्यांमध्ये फटाक्यांवरील बंदी कायम असून त्यावरून राजकीय वर्तुळातही चर्चा दिसून येत आहे. दिल्लीसह काही राज्यांमधील सरकारांनी फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घातली असून नियमाचं उल्लंघन करणाऱ्याला दंड ठोठावण्याचीही तरतूद केली आहे. त्यावरून आता संमिश्र प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS शी संबंधित संघटना स्वदेशी जागरण मंच (SJM) कडून या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. फटाक्यांवर टाकण्यात आलेली बंदी ही भावना दुखावणारी असून भारतीय फटाक्यांमुळे प्रदूषण होत नाही, असा दावा या संघटनेकडून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“दिल्ली सरकारने फटाक्यांवर पूर्णपणे घातलेल्या बंदीचा स्वदेशी जागरण मंच निषेध करत आहे. दिवाळीच्या उत्सवादरम्यान अशा प्रकारची बंदी घालणं चुकीचं आहे. लोकांच्या भावना दुखावणारं आहे. शिवाय, देशात फटाक्यांचं उत्पादन आणि वितरण करणाऱ्या लाखो लोकांचा रोजगार काढून घेणारा हा निर्णय आहे”, असं स्वदेशी जागरण मंचचे अश्विनी महाजन यांनी म्हटलं आहे.

“हा चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न”

दिल्ली सरकार समाजात चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत असून त्याचाच भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मंचकडून सांगण्यात आलं आहे. “आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण हे प्रामुख्याने चीनमधून गैरमार्गाने आयात करण्यात आलेल्या फटाक्यांमुळे होतं. भारतात बनवण्यात आलेल्या पर्यावरणपूरक फटाक्यांमुळे प्रदूषण होत नाही. चीनमध्ये फटाके तयार करताना त्यात पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर मिसळलं जातं. परिणामी प्रदूषण होतं. भारतीय फटाक्यांमध्ये पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर मिसळलं जात नाही. अॅल्युमिनियम, लिथियम, आर्सेनिक आणि पारा यांचंही प्रमाण अत्यल्प असतं. शिवाय, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्युट यांच्याकडून या फटाक्यांना प्रमाणितही करण्यात आलं आहे”, अशी माहिती महाजन यांनी दिली.

दिवाळीत फटाके वाजवताना लहान मुलांना भाजले तर काय करावे? जखम होण्याआधी लगेच वापरा ‘या’ टिप्स

तणावर उपाय करण्यात अपयश

दरम्यान, दिल्ली, हरयाणा आणि पंजाब या राज्यांना तण जाळण्याच्या समस्येवर उपाय योजन्यात अपयश आल्यामुळेच ते फटाक्यांवर बंदी आणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा दावा स्वदेशी मंचकडून करण्यात आला आहे. “या काळात जाळण्यात येणारं तण हाच दिल्लीतील प्रदूषणासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरल्याचं सिद्ध झालं आहे. पण या समस्येवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच फटाक्यांवरील बंदीचा खटाटोप दिल्ली सरकार करत आहे”, असंही अश्विनी महाजन म्हणाले.

दिल्लीत बंदी असताना आप मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले; भाजपा म्हणाली, “केजरीवाल हिंदू विरोधी…”

बंदीमुळे रोजगार गमावणाऱ्या उत्पादकांचं काय?

दरम्यान, फटाक्यांवरील बंदीमुळे हे फटाके तयार करणारे आणि वितरीत करणारे लाखो लोक बेरोजगार होणार आहेत,त्यांचं काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. “तामिळनाडू(शिवकाशी), पश्चिम बंगाल आणि देशातील इतरही अनेक भागांमध्ये लाखो लोक या व्यवसायात गुंतले आहेत. त्यामुळे ऐनवेळी कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय फटाक्यांवर बंदी घालणं चुकीचं आहे”, असंही महाजन म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss affiliated swadeshi jagran manch on firecracker ban in delhi pmw
First published on: 22-10-2022 at 19:14 IST