सांंगली : महाविकास आघाडीतील जागा वाटप अजून रेंगाळले असताना आणि सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा प्रबळ दावा असताना जनसंवाद मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारीमुळे भाजपबरोबरच काँग्रेसलाही धक्का बसला आहे.

कोणत्याही स्थितीत विरोधी उमेदवार काँग्रेसचा म्हणजेच विशाल पाटील यांची अपेक्षा असताना पैलवान मैदानात येणारच या घोषणेने भाजपलाही गोड धक्का बसला असला तरी काँग्रेस अजूनही वरिष्ठांच्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहे. ही बाब ठरवून तर झाली नाही ना अशीही शंका काही जण व्यक्त करत आहेत. मात्र या राजकीय डावपेचात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे राजकीय व रक्ताचे वारसदार मात्र पिछाडीवर जातात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा – मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकारण्याचा ५२ वर्षांतील दुसरा प्रसंग

सांगली तशी राजकीयदृष्ट्या अधिक ताकदवान समजली जात होती. एकेकाळी राज्याचे तिकीट वाटप कसे होणार याचा निर्णय कृष्णाकाठच्या सांगलीवर अवलंबून असायचा, वसंतदादांनी मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या सांगलीची राजकीय ताकद आघाडी सरकारच्या काळापर्यंत कायम होती. उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या आरआर आबांची आणि मुख्यमंत्रीपदाच्या कायम स्पर्धेत असलेल्या डॉ. पतंगराव कदम यांच्यापर्यत सांगलीचा राजकीय दबदबा कायम होता. आघाडी सरकारच्या काळात तीन तीन मंत्री आणि तेही मातब्बर खात्याचे जिल्ह्याला लाभत होते. मात्र, २०१४च्या मोदी लाटेनंतर ही परिस्थिती बदलत गेली. सत्तेच्या राजकारणात आजही आमदार जयंत पाटील सक्रिय असले तरी राजकीय दबदबा मात्र कमी होत चालला आहे. कुरघोडीच्या राजकारणात भाजपला सांगली आंदण दिली गेली आणि मित्र पक्षाबरोबरच स्वपक्षाचाही तोरा हरवून बसले अशी गत आज सांगलीची झाली आहे.

हेही वाचा – बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?

लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी तीन महत्वाचे पक्ष एकत्र आले. जागा वाटपात सांगलीच्या जागेवर घोडे अडले असताना ठाकरे शिवसेनेने सांगलीच्या जागेवर दहा दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या पैलवान पाटील यांना उमेदवारी देऊन तहात आणि युद्धात काँग्रेसला चितपट करता येऊ शकते हे दाखवून दिले. येत्या काही दिवसांत काँग्रेसची भूमिका स्पष्ट होईल यात शंका नाही. मात्र ठाकरे शिवसेनेच्या कुरघोडीने गेलेली पत कशी मिळणार हा प्रश्‍न आहे.

हेही वाचा – लिंगायत मतपेढीचे गणित मांडत लातूरमध्ये काँग्रेसची डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी

जर यदाकदाचित काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला तर जुळणी होणार का? यासाठी उमेदवाराची मानसिकता आहे का या बाबींचाही विचार करायला हवा. काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्या म्हणण्यानुसार ६०० गावांपैकी दहा टक्के गावात शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य नाहीत. मग शिवसेनेला सांगलीमध्ये आपली ताकद असल्याचा साक्षात्कार कशाच्या जिवावर झाला. जरी काँग्रेसने आघाडी धर्म पाळायचा निर्णय घेतला तरी गावपातळीवरील कार्यकर्ते मशाल घेऊन मतदारांना सामोरे जातीलच याची गॅरंटी कोण देणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारी ठाकरे सेनेच्या जनसंवाद मेळाव्याकडे काँग्रेसने पाठ फिरवली. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने ठाकरे शिवसेनेच्या जनसंवाद यात्रेबाबत सावध भूमिका घेत बहिष्कार न टाकता तोंडदेखलेपणा करत तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना पाठवून आघाडी धर्म पाळत असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला.