सांगली : राज्यात पहिल्यांदा काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात महत्वाची भूमिका बजावलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले इस्लामपूरचे जेष्ठ नेते अण्णा डांगे भाजपच्या वाटेवर आहेत. पुढच्या महिन्यात त्यांचा अधिकृत पक्ष प्रवेश होईल. डांगे यांनी आमदार जयंत पाटील यांचा हात सोडून आता पुन्हा स्वगृही परतण्याचा उतरत्या वयात घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हे येणारा काळच सांगणार असला तरी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या पाठोपाठ डांगेही दूर जात आहेत, ही आमदार पाटील यांच्यासाठी अडचणीची ठरते की काय हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी दिसून येणार आहे.
राज्यात १९९५ मध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचे म्हणजेच भाजप शिवसेना युतीचे सरकार अपक्षांच्या मदतीने सत्तेवर आले. या मंत्री मंडळात अण्णा डांगे यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच भाजपचे जेष्ठ नेते म्हणून त्यांच्या शब्दाला भाजपमध्ये मान-सन्मान होता. मात्र, तोच मानसन्मान पुन्हा मिळवून देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. डांगे यांनी भाजपमध्ये यावे यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी प्रयत्न केले. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर डांगे यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यातील राजकारण वेगळ्या वळणावर जाउ पाहत आहे.
डांगे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते, अगदी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत त्यांनी राजकीय क्षेत्रात काम केले. या योगदानामुळेच १९९५ मध्ये युती शासन सत्तेवर येताच त्यांना मानाचे पद दिले.विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा तत्पुर्वी ठसा उमटवला होताच, त्या बदल्यात त्यांना ग्रामीण विकास खात्याचे मंत्री पद मिळाले. त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कारकीर्दीतच सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहराची संयुक्त महापालिका अस्तित्वात आली.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येताच, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आमदार जयंत पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाशी प्रामाणिकही राहिले. मात्र, पक्षांने त्यांच्या जेष्ठत्वाला फारसे महत्व दिले नाही. यातूनच त्यांचा हिरमोड झाला होता. अॅड. चिमण डांगे, विश्वनाथ डांगे यांच्याकडे वारसा असला तरी पक्षात फारशी संधीही नजीकच्या काळात दिसत नव्हती. यामुळे त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला असावा. याचबरोबर वर्षापुर्वी आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत आलेले शिराळ्याचे नाईकही संधीची वाणवा पाहून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. पक्षानेही त्यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. आता वाळव्याचे राजकारण एक दिशा राहण्याची चिन्हे दुर्मिळ वाटत आहेत. आमदार पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला आहे. यामुळे राजकीय दृष्ट्या वाळव्याचे महत्व कमी होते की काय अशीच सगळी पावले दिसत आहेत.
श्री. डांगे हे धनगर समाजाचे जेष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आजही त्यांचे प्रयत्न सुरू असतात. याचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो. याशिवाय भाजप नेतृत्वावर आयारामांना कायम संधी आणि निष्ठावान कट्ट्यावर असा आरोप होतो. या आरोपाला छेद देण्याचे काम डांगे यांच्या भाजप प्रवेशाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी साधले असावे. तरूण आणि जेष्ठांचा समन्वय साधण्याचे काम सुरू असले तरी या खेळात आमदार पाटील हे एकाकी पडतात की काय अशी स्थिती वाळव्यात निर्माण झाली आहे. पारंपारिक विरोधक एकत्र आल्यास प्रस्थापितांचा बाजार उठू शकतो.