scorecardresearch

राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांची दुसरी पिढी एकत्र

अमित ठाकरे आणि सौरभ शेट्टी या युवक नेत्यांनी बंद खोलीत अर्धा तास राजकीय चर्चा केल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Raj Thackeray, Raju Shetty, Amit Thackeray, Saurabha Shetty
राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांची दुसरी पिढी एकत्र ( Image – लोकसत्ता प्रतिनिधी )

दिंगबर शिंदे

सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रमुख अमित ठाकरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे सौरभ शेट्टी यांनी कुपवाडमध्ये मनसेच्या शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने एकत्र हजेरी लावली. राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांची दुसरी पिढी एकत्र आल्याने चर्चा तर राजकीय वर्तुळात सुरू झाली. यावेळी उभय युवक नेत्यांनी बंद खोलीत अर्धा तास राजकीय चर्चा केल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या सडेतोड वक्तृत्वाची अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ आहे. मनसे हा केवळ मुंबईपुरताच मर्यादित राजकीय पक्ष अशीही प्रतिमा निर्माण झाली आहे. ग्रामीण महाराष्ट्रात शेतीचे प्रश्‍न अधिक गंभीर असून या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये माजी खा. राजू शेट्टी अगदी देशपातळीवर प्रयत्नशील असतात. त्या तुलनेत शेतीच्या प्रश्‍नाबाबत मनसेकडून ज्या पध्दतीने मराठी अस्मिता, परप्रांतीयांचे लोंढे, स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य यासारख्या प्रश्‍नावर ज्या पध्दतीने संघर्ष केला जातो त्या पध्दतीने शेती आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत तेवढा आग्रह धरला जात नाही असा समज ग्रामीण भागात आहे. याच प्रश्‍नावर मात्र, माजी खा. शेट्टी हे अधिक आक्रमकपणे प्रश्‍नाला भिडत असतात. त्याच्या आंदोलनामुळेच पश्‍चिम महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात वर्चस्व असलेल्या साखर लॉबीलाही कधी कधी माघार घेण्याची वेळ आली आहे. प्रसंगी शासन पातळीवरही तड लावण्यात शेट्टींचा आक्रमकपणा कामी आला आहे.

हेही वाचा… अमरावतीतही भाजपाला जोरदार धक्‍का

स्वाभिमानीकडील जमेची बाजू आणि मनसेचा आक्रमकपणा यांचा मिलाफ व्हावा अशी भावना मनसेच्या तरूण कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. याच भावनेतून कुपवाडचे मनसेचे शहर प्रमूख विनय पाटील यांनी राजू शेट्टींचे पुत्र सौरभ शेट्टी आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची भेट कुपवाडमध्ये घडवून आणली. कुपवाडमध्ये शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने हे दोन युवा नेते एकत्र आलेच, पण त्यांनी विविध प्रश्‍नाबाबत सुमारे अर्धा तास चर्चा केली.

हेही वाचा… नागपूरमध्ये पदवीधर पाठोपाठ शिक्षकमधील पराभव भाजपच्या जिव्हारी

विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी शहरी भागात चांगले मार्गदर्शन मिळते. मात्र, शेतकरी मुलांना ग्रामीण भागात त्या तुलनेत अधिक सक्षम मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी काय करता येईल याचाही विचार उभय युवा नेत्यामध्ये झाला.

हेही वाचा… सत्यजित तांबे यांच्या भविष्यातील भूमिकेविषयी उत्सुकता

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेला घरोबा आता संपुष्टात आणला असून पुढील सोयरीक कोणत्याही पक्षाशी न करता एकला चलोचा नारा सध्या दिला आहे. त्या दिशेने संघटनेची राजकीय वाटचाल सुरू असताना दोन्ही पक्षाच्या युवा नेत्यांची बंद खोलीत झालेली चर्चा नवी राजकीय दिशा तर नाही ना? अशी शंका राजकीय निरीक्षकाकडून व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 17:45 IST