देवेश गोंडाणे

नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवणारे विद्यमान आमदार नागो गाणार यांची उमेदवारी शिक्षक परिषदेने भाजपशी सल्लामसलत न करता जाहीर केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे, यावेळी भाजप किंवा शिक्षक परिषद नव्या चेहऱ्याला संधी देईल, अशी शक्यता होती. मात्र गाणारांची उमेदवारी जाहीर झाल्याने याला खीळ बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दुसऱ्या नावांची चर्चाच होऊ नये म्हणून गाणारांनी ही खेळी खेळली, अशीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

हेही वाचा… केवळ धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यासाठी शिंदे गटाकडून अंधेरी पूर्व निवडणुकीचे कारण पुढे?

हेही वाचा… अमित शहा यांच्या आगामी दौऱ्यात पश्चिम महाराष्ट्रात राजकीय फेरबांधणी, भाजपची पकड घट्ट करण्याकडे लक्ष

विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात जानेवारी २०२३ मध्ये निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी मतदार नोंदणी सुरू झाली असून सर्वच शिक्षक संघटनांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ हा एकेकाळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा गड होता. डी.यू. डायगव्हाणे या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले. त्यानंतर २०११ मध्ये प्रथमच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांनी माध्यमिक शिक्षक संघाच्या गडाला भगदाड पाडत विजय मिळवून विधानपरिषद गाठली होती. त्यानंतर २०१७ मध्येही गाणार विजयी झाले. मात्र यावेळी त्यांना भाजपचा अधिकृत पाठिंबा होता. सध्या राज्यात व केंद्रात भाजप सत्तेत आहे. त्यामुळे भाजपला ही निवडणूक जड जाणार नाही, अशी चर्चा आहे. परिणामी भाजपच्या विविध शिक्षक संघटनांमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. शिक्षक परिषदेचे कार्यवाह योगेश बन हे अनेक वर्षांपासून उमेदवारीची आस लावून आहेत. तर भाजप शिक्षक आघाडीचे अनिल शिवणकर यांच्या उमेदवारीला काही भाजप नेत्यांची पसंती असल्याची माहिती आहे. माजी महापौर व शिक्षण मंचाच्या प्रमुख डॉ. कल्पना पांडे उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनी काही भाजप नेत्यांची भेट घेतली आहे. भाजपच्या विविध संघटनांमधील अनेक पदाधिकारी उमेदवारीसाठी रांगेत असताना अचानक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने नागो गाणार यांची उमेदवारी घोषित करत पाठिंब्यासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षाला पत्र पाठवून पक्षाची चांगलीच कोंडी केली. परिषद आणि भाजप शिक्षक आघाडीने आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आणि नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे भाजप नेते परिषदेला समर्थन देतात की भाजप शिक्षक आघाडीचा उमेदवार घोषित करतात हे बघणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा… विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

हेही वाचा… विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीचे लक्ष आता भाजपच्या ताब्यातील शिक्षक मतदारसंघावर आहे. मात्र ही जागा जिंकण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसमधून अद्याप कुठल्याही नावाची चर्चा नाही. मागील निवडणुकीमध्येही काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार देऊन शिक्षक भारतीच्या मतांची विभागणी केली होती. याचा फायदा गाणार यांना झाला होता. आताही शिक्षक भारतीने पुन्हा एकदा राजेंद्र झाडे यांच्यावर विश्वास दाखवून उमेदवारी जाहीर केली. तर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे सरकार्यवाह सुधाकर अडबाले रिंगणात असणार आहेत. त्यांनी निवडणूक तयारी सुरू केली आहे. मात्र, भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झाल्यावरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.