मुंबई: हिंदीसक्ती विरोधाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या शिवसेना (ठाकरे) आणि मनसे दोन्ही पक्षांची महापालिका निवडणुकीत युती होणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र याची अधिकृत घोषणा झालेली नाही. जागावाटप हा उभयतांमध्ये कळीचा मुद्दा ठरला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी दोन्ही बंधू यांची पुन्हा एकदा भेट झाली. मागील तीन महिन्यांत या भेटीगाठी वाढ झाली असून दोन्ही पक्षांकडून एकमेकांनी घेतलेल्या भूमिकांना पाठिंबा दिला जात आहे. शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळावर झालेल्या दोन्ही बंधूंच्या भेटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जागावाटपासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी संवाद साधला. या जागावाटपाची चर्चा लवकरच सुरू हाेणार असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. या बैठकांमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे मोजकेच पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

एकदा जागावाटप निश्चित झाले की तत्काळ युतीची घोषणा करण्यात येणार आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती जाहीर झाल्यास त्याचा परिणाम मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली या महापालिकांत दिसून येणार आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने महिनाभरात महापालिकांचे जागावाटप दोन्ही बंधूंना अंतिम करावे लागणार आहे.

मुंबई महापालिका लक्ष्य

शिवसेना ठाकरे गट तसेच मनसेकडून मुंबई महापालिकेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची संख्या ९९ आहे. यापैकी ४४ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ५५ नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. २०१७च्या निवडणुकीनंतर मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेचा सध्या एकही नगरसेवक नसला तरी मनसेमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फटका प्रत्येक निवडणुकीत ठाकरे गटाला बसला आहे. त्यामुळे मनसेकडून १२५ जागांचे लक्ष्य ठेवण्यात आले असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या दोन विजयी जागांची मागणी करण्यात येणार आहे.

यासाठी ठाकरे गटाचे जे नगरसेवक सध्या शिंदे गटात गेले आहेत, त्याच ठिकाणच्या जागा मनसेकडून मागण्यात येणार आहेत. याला ठाकरे गटाकडून कोणता प्रतिसाद मिळतो यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे. त्याचबरोबर या युतीमध्ये राष्ट्रवादीही सामील झाल्यास त्यांच्यासाठी किती जागा सोडाव्या लागतील याचेही गणित बांधले जाणार आहे. मुंबई महापालिकेचे ठरल्यानंतर अन्य महापालिकांबाबत वाटाघाटी केल्या जातील.