Raj Thackeray Uddhav Thackeray Meeting : शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीचे कयास बांधले जात असताना रविवारी राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील मातोश्री निवासस्थानी झालेल्या या भेटीदरम्यान राज यांच्याबरोबर त्यांच्या आईदेखील उपस्थित होत्या. राज्यात आगामी काळात मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे दोन्ही पक्षांतील युतीची शक्यता अधिकच बळावली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मनसेबरोबरच्या युतीबद्दल सातत्याने सकारात्मक विधाने केली जात आहेत.
गेल्या आठवड्यातही ठाकरे बंधूंची भेट
गेल्या आठवड्यातही राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांची भेट घेतली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली बैठक ही राजकीय असल्याचे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. इतकेच नाही, तर मनसे आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्यात असल्याची माहितीही त्यांनी माध्यमांना दिली होती. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची साथ मिळावी यासाठी सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. १९९७ मध्ये एकसंध शिवसेनेने भाजपाबरोबर युती करून पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवला होता.
विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला फटका
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसला होता. मुंबईतही पक्षाचे मताधिक्य कमी झाल्याचे दिसून आले होते. दी इंडियन एक्स्प्रेसने नुकतेच या निवडणुकीचे सविस्तर विश्लेषण केले. त्यातून अशी माहिती समोर आली की, मुंबईतील २२७ पैकी ६७ प्रभागांमध्ये (म्हणजेच सुमारे ३० टक्के प्रभागांमध्ये) मनसेला विजयी फरकापेक्षा जास्त मते मिळाली होती. या ६७ पैकी ३९ प्रभागांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते; तर भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २८ प्रभागांमध्ये आघाडी मिळाली होती. यादरम्यान ठाकरे गट आणि मनसेत युती झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ३९ प्रभागांमध्ये मजबूत स्थान निर्माण होईल. त्याशिवाय महायुतीने आघाडी घेतलेल्या २८ प्रभागांमधील त्यांची ताकद वाढेल.
मुंबईत मनसेची किती ताकद?
प्रभागनिहाय आकडेवारीचे अधिक बारकाईने विश्लेषण केले असता, मनसेची ताकद प्रामुख्याने मराठी पट्ट्यात असल्याचे दिसून येते. वरळी, दादर, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, दिंडोशी-मालाड या विभागांमध्ये मनसेच्या उमेदवारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतांच्या तुलनेत एक-तृतियांश ते निम्म्यापर्यंत मते मिळालेली आहेत. विशेष म्हणजे मनसेने ६७ प्रभागांमध्ये मिळवलेली मते ही विजयी उमेदवारांच्या विजयी फरकापेक्षा जास्त होती. १० प्रभागांमध्ये मनसेचा मतांचा आकडा विजयी फरकाच्या अगदी जवळ होता; तर २५ प्रभागांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांच्या ५०% पेक्षा जास्त मते मिळवली. त्याचबरोबर ३७ प्रभागांमध्ये मनसेच्या मतांचा वाटा ३० ते ४९ टक्क्यांदरम्यान होता.
कोणकोणत्या प्रभागांमध्ये मनसे मजबूत?
उत्तर-मध्य आणि पूर्व उपनगरांतील आठ प्रभागांमध्ये (वरळी, माहीम, भांडुप, जोगेश्वरी, विक्रोळी) मनसेने महाविकास आघाडीला मागे टाकले होते. या भागांमध्ये राज ठाकरे यांचा पक्ष संघटनात्मकदृष्ट्या काहीसा कमकुवत असला तरी त्यांना मराठी मतदारांचा मोठा पाठिंबा आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने मुंबईतील एकूण २५ जागांवर उमेदवार दिले होते. या निवडणुकीत मनसेने चार टक्के मते मिळवून मुंबईतील एकूण १२३ प्रभागांवर आपला प्रभाव टाकला होता. त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट मनसेबरोबर युती करण्यास प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
मनसेची मते कशी ठरणार निर्णयाक?
दिंडोशी विधानसभा मतदारसंघात मनसेने सातपैकी सहा प्रभागांमध्ये विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते घेतली. या मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ४३ मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराने शिंदे-भाजपा युतीच्या उमेदवारावर एक हजार ८८ मतांची आघाडी घेतली होती; तर मनसेच्या उमेदवाराने एक हजार ७२८ मते मिळवली होती. या दोन्ही मतांचे एकत्रीकरण झाल्यास महाविकास आघाडी खूपच पुढे निघून जाईल. विक्रोळी मतदारसंघातील वॉर्ड १२१ मध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मतांचा फरक केवळ ८४३ होता; तर मनसेला एक हजार ९६ मते मिळाली होती.
हेही वाचा : आर्थिक उत्पन्न घटल्याचं कारण देत मोदी सरकारमधील ‘हा’ मंत्री राजीनामा देण्यास तयार; नेमकं प्रकरण काय?
मनसे-ठाकरे गटाला मोठे यश मिळणार?
जोगेश्वरी पूर्वमधील वॉर्ड ५७ मध्ये महायुतीच्या उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवारावर ४८२ मतांची आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे या वॉर्डात मनसेच्या उमेदवाराला ९१८ मते मिळाली होती. वांद्रे पूर्वमधील वॉर्ड ९२ मध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील मतांचा फरक ६२३ होता; तर मनसेच्या उमेदवाराने १,००४ मते घेतली होती. राजकीय विश्लेषकांच्या मते, मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे हा छोटा घटक पक्ष मानला जात असला तरी तो किमान ९० प्रभागांमधील निकालांवर परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंची साथ हवी असल्याचे सांगितले जात आहे. जर आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती झाली, तर त्यांना मोठे यश मिळू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.