scorecardresearch

शिवसेनेकडून ‘छत्रपतीं’ना ‘मावळ्या’करवी शह!, स्पष्ट भूमिकेअभावी संभाजीराजेंनी उमेदवारी गमावली

सामान्य मराठा मावळ्याला उमेदवारी देत शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीत थेट कोल्हापूरच्या ‘छत्रपतीं’च्या राजनीतीला शह दिला आहे.

Sambjahoraje
राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी चुरस

दयानंद लिपारे

सामान्य मराठा मावळ्याला उमेदवारी देत शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीत थेट कोल्हापूरच्या ‘छत्रपतीं’च्या राजनीतीला शह दिला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेले संभाजीराजे छत्रपती हे शिवबंधन बांधण्यास तयार नसल्याचे दिसून आल्यावर शिवसेनेने चाणाक्षपणे व्यूहरचना करीत संजय पवार यांच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देत प्रादेशिक, जातीची सारीच गणिते आपल्या बाजूला केल्याचे दिसत आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या निर्णयामुळे आता संभाजीराजे यांना महाविकास आघाडीचाही पाठिंबा मिळणार नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ते आता अपक्ष म्हणून तरी लढणार का हेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत ३ मे रोजी संपली. तेव्हापासून त्यांनी राजकारण करणार नाही असे म्हणत राजकीय डावपेच सुरू ठेवले. तशात संभाजीराजे यांनी मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतरच काही दिवसांत नवी राजकीय भूमिका मांडू असा पवित्रा घेत त्यांनी पुणे येथे स्वराज्य संघटनेची स्थापना करून कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवणार नसल्याचे जाहीर केले. येथून त्यांनी स्वतःभोवतीच चक्रव्यूह आखला आणि ते त्यातच गुंतून पडले.

भाजपशी नाते तुटले

राजकारणात कोणाशी राजकीय बांधिलकी जपल्याशिवाय सहजासहजी पदरात काहीही पडत नाही. कुठल्याही पक्षात प्रवेश करायचा नाही, त्यांचे विचार-प्रचार यापासून फारकत घ्यायची आणि त्यांनी पाठिंबा द्यावा अशी भूमिका संभाजीराजे यांची सातत्याने राहिली. २००९ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवल्यानंतरही संभाजीराजे यांना पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर २०१६ मध्ये संभाजीराजे यांना भाजपच्या मदतीने राज्यसभेची खासदारकी मिळाली.  मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीची वेळ देत नाहीत, असा संताप त्यांनी व्यक्त केला. राज्यात तर दूरच, पण ‘कमळ’ फुलवण्यासाठी त्यांनी कधी कोल्हापुरातही पक्षाला मदत केली नाही. त्यामुळे भाजप अंतर्गतही त्यांच्यावर छुपी नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे भाजपने संभाजीराजांना उमेदवारी देण्याचे टाळले. शिवाय अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्याबाबत शेवटपर्यंत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली.

भाजपकडून यंदा उमेदवारीला प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर संभाजीराजे यांनी यंदा महाविकास आघाडीशी जुळवून घेण्याकडे मोर्चा वळवला. राष्ट्रवादीने ही जागा शिवसेनेची असल्याचे सांगत त्यांच्या गोटात चेंडू ढकलला. काँग्रेसनेदेखील याबाबत फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. दरम्यान संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली. महाआघाडीचा उमेदवार म्हणजे कोणत्याच पक्षाचा उमेदवार नाही. कोणाचाही पक्षादेश लागू होणार नाही की कोणत्याच पक्षाची बंधनेही येणार नाहीत. त्यामुळे असा निर्बंधमुक्त खासदार पाठवून देणे आघाडीतील कोणत्याही पक्षाला राजकीयदृष्ट्या परवडणारे नव्हते. कोणत्याही पक्षासाठी तो राजकीय आत्मघातच ठरला असता.

हीच बाब लक्षात घेऊन शिवसेनेने संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्याचा आग्रह धरीत सहाव्या जागेची उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली. मात्र याबाबत चालढकल करत आपण अपक्ष लढू अशी भूमिका संभाजीराजेंनी कायम ठेवली. पक्षप्रवेश न करता पद मिळवण्याची त्यांची ही चाल लक्षात घेऊन शिवसेनेने अखेर छत्रपतींना बाजूला करत पक्षाचे निष्ठावान शिवसैनिक असलेल्या मराठा समाजातील संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पवार यांच्या या निवडीतून शिवसेनेने एकप्रकारे राज घराण्यापेक्षा सामान्य मावळ्याला महत्त्व देत असल्याचा संदेश दिला आहे. शिवाय, पवार कोल्हापुरातीलच आहेत, मराठा जातीतील असल्याने या दोन मुद्द्यांवरूनही कुठल्याही नाराजीचे राजकारण करण्याची संधी शिवसेनेने विरोधकांना ठेवलेली नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena will try defeat chatrapti sambhajiraje through the common shivsainik pkd

ताज्या बातम्या