Smriti Irani issues BIG statement on PM Modi भाजपा नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अलीकडेच अभिनेत्री सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये केलेल्या संवादांमुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी या चर्चेदरम्यान अनेक मोठे खुलासे . त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळची व्यक्ती कोण? यावर महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी या पॉडकास्टमध्ये आपल्या राजकारणातील आणि कलाक्षेत्रातील अनुभवांविषयीदेखील सांगितले आहे. स्मृती इराणी नक्की काय म्हणाल्या? त्यांनी पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या वक्तव्याची चर्चा का होत आहे? त्याविषयी जाणून घेऊयात…
स्मृती इराणी पंतप्रधान मोदींविषयी काय म्हणाल्या?
सोहा अली खानने ‘जवळचे संबंध’ असा उल्लेख करताच, स्मृती इराणींनी लगेचच हा गैरसमज दूर करणार असल्याचे म्हटले. “मी सर्वात मोठा गैरसमज दूर करते,” असे म्हणत त्या पुढे म्हणाल्या, “पंतप्रधानांच्या जवळचे कोणीही नाही.” त्या पुढे म्हणाल्या, “तुम्ही ज्या कोणाला कधीही भेटाल आणि ती व्यक्ती पंतप्रधानांबरोबरचे आपले संबंध किती जवळचे आहेत असे सांगत असेल, तर एकतर तो पंतप्रधानांना ओळखत नाही किंवा तो सरळसरळ खोटे बोलत आहे.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदींनी कधीही वैयक्तिक निष्ठा निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते एका मोठ्या उद्देशासाठी घर सोडून बाहेर पडले आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, जो कोणी त्यांच्या जवळच्या वर्तुळात येतो, त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिले जाते. “पंतप्रधान मोदींसाठी एक गोष्ट खूप स्पष्ट आहे की, माझे एकच आयुष्य आहे आणि मला ते माझ्या देशासाठी द्यायचे आहे एवढेच.”
“लोकप्रिय चेहरा म्हणून राजकारणात आल्याने नुकसान”
याच पॉडकास्टवर सोहाने स्मृती इराणी यांनी आपल्या राजकीय करिअरविषयी बोलताना म्हटले, “लोकप्रिय चेहरा म्हणून राजकारणात आल्यामुळे नुकसान झाले. कारण प्रत्येकाने असे गृहीत धरले आहे की अभिनेते त्यांच्या करिअरच्या शेवटी राजकारणात प्रवेश करतात, ते गांभीर्याने आणि तळागाळापासून काम करत नाहीत. बहुतेक अभिनेत्यांना त्यांच्या लोकप्रियतेमुळे थेट राजकारणात आणले जाते आणि मग ते फक्त राज्यसभा सदस्य राहतात.”
त्यांनी पुढे सांगितले, “मी त्यापैकी नव्हते. जेव्हा मी २००३ मध्ये सक्रिय राजकारणात आले, तेव्हा मी महाराष्ट्रातील भाजपाच्या युवा मोर्चाची सदस्य म्हणून सुरुवात केली. माझ्या बरोबरचे माझे एक सहकारी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि माझे दुसरे सहकारी धर्मेंद्र प्रधान हे आता शिक्षण मंत्री आहेत. पण, तेव्हाही मला माझ्या सहकाऱ्यांबरोबर तळागाळातील काम करायचे होते आणि त्यांचा आदर मिळवायचा होता, कारण मला माहीत होते की मला राजकारणात दीर्घकाळ टिकायचे आहे.”
इराणींनी त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी काय सांगितले?
इराणींनी त्यांच्या स्वतःच्या राजकीय प्रवासावरही भाष्य केले, ज्यात त्यांच्या मंत्रिपदाच्या भूमिकेचा, पंतप्रधानांच्या थेट नेतृत्वाखाली काम केलेल्या कालावधीचा समावेश होता. त्यांनी पंतप्रधानांना त्या संधी दिल्याबद्दल श्रेय दिले. मात्र, त्यांनी सांगितले की, मला त्या संधी वैयक्तिक जवळीकतेमुळे नाही, तर कामगिरी आणि सेवेमुळे मिळाल्या. इराणींनी पंतप्रधानांची स्मरणशक्ती अतिशय उत्तम आहे, असे देखील सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “तुम्ही २००७ मध्ये काहीतरी सांगितले असल्यास, मोदी ते सहज आठवून तुम्हाला विचारू शकतात, तुमचे तेव्हा त्या विषयावर काय मत होते, हे त्यांच्या लक्षात असते, ” असेही त्यांनी सांगितले.
“मी तळागाळातील जबाबदाऱ्या पार पाडत पुढे आले, नंतर नितीन गडकरी अध्यक्ष असताना मी महाराष्ट्राची प्रदेश सचिव झाले. मी पाच भाजपा अध्यक्षांबरोबर काम केले आहे -राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शाह, जे. पी. नड्डा आणि वेंकय्या नायडू. २००४ मध्ये मी २७ व्या वर्षी माझी पहिली निवडणूक लढले, त्यामुळे मी ठामपणे सांगू शकते की, मी हे सर्व अनुभवले आहे,” असे त्या म्हणाल्या.
अमेठी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा हे निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा यांनी स्मृती इराणी यांचा तब्बल १ लाख १८ हजार ४७१ मतांनी पराभव केला. स्मृती इराणी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव केला होता. त्यानंतर आता त्या क्यूँ की साँस भी कभी बहु थी या मालिकेच्या दुसऱ्या पर्वातून पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात परतल्या आहेत.
त्यांनी हेदेखील स्पष्ट केले आहे की, मला पक्षाने सांगितले तर २०२६ मध्येही ही पुन्हा येऊ शकते त्यासाठी २०२९ ची वाट पाहण्याची आवश्यकता नाही असे स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. त्यांनी राजकारणात कमबॅक करण्याचेही संकेत दिले आहेत. मी तेव्हाही राजकारण केलं जेव्हा युपीएचे सरकार होते. अखिलेश यादवांचे सरकार होते तेव्हाही मी अमेठीत काम केले आहे. तसेच अमेठीतून मी अशा वेळी लढले आहे जेव्हा यूपीएचे सरकार होते. मौत के कुएँ में जाकर सिधा छलांग मारना अशीच ती स्थिती होती. २०२९ कशाला? २०२६ला देखील पक्ष मला आदेश देऊ शकतो. मी तो ऐकेनच असेदेखील स्मृती इराणी म्हणाल्या.