रवींद्र जुनारकर

चंद्रपूर : दूरध्वनीवर ‘हॅलो’ नाही तर ‘वंदे मातरम’ने सुरुवात करायची, ‘जय जय महाराष्ट्र’ हे राज्यगीत, भवानी तलवार आणण्याची केलेली घोषणा अशा काही निर्णयांमुळे गेले वर्षभर सुधीर मुनगंटीवार हे चर्चेतच अधिक राहिले.

वने आणि सांस्कृतिक कार्य अशी खाती भूषविताना दोन्ही विभागांमध्ये आपली छाप पाडण्याचा प्रयत्न सुधीरभाऊंनी केला. सांस्कृतिक खात्यात त्यांच्या काही अफलातून योजनांवर टीकाही झाली. वने खाते भूषविताना चंद्रपूर किंवा आसपासच्या परिसरातील मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यावर त्यांनी भर दिला. याप्रमाणेच भाजपचे ज्येष्ठ नेते असल्यानेच सरकारच्या कामगिरीवर विरोधकांकडून टीका होताच त्याला राजकीय भाषेत प्रत्युत्तर देण्यातही सुधीरभाऊ आघाडीवर असतात.

हेही वाचा… जमाखर्च : गिरीश महाजन, खात्यांपेक्षा राजकारणातच अधिक मग्न

वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री अशी तीन महत्त्वाची खाती मुनगंटीवार यांच्याकडे आहेत. वनेमंत्री म्हणून त्यांनी गेली अनेक वर्षे केवळ चर्चेत असलेला वाघ स्थलांतरणाच्या प्रयोगाला सुरुवात करून मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला. राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या (२५०) त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातच आहे व त्यामुळे येथे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला गेलेला. ३० वाघांचे नवेगाव-नागझिरा अभयारण्य, संभाजीनगर, सह्यांद्री व मेळघाट अभयारण्यात स्थलांतरण करून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. याशिवाय राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पातील ७५ हजार विद्यार्थ्यांना मोफत जंगल सफारी, व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर हत्तीप्रकल्पाची घोषणा आणि चंद्रपूरला ‘टायगर कॅपिटल’सोबतच ‘बर्ड कॅपिटल’ करण्याचा निर्णय हे त्यांच्या नेतृत्वातील वनखात्याचे प्रमुख निर्णय आहेत.

हेही वाचा… जमाखर्च : दीपक केसरकर; घोषणांचा सुकाळ, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनखात्याप्रमाणेच मुनगंटीवार यांच्याकडील सांस्कृतिक खात्याने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यात मराठी चित्रपटांसाठी अनुदान तीन महिन्यांच्या आत देणे, दोन वर्षाच्या आतील चित्रपटांना यासाठी पात्र ठरवणे, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांना दुप्पट व प्रेरणादायी चित्रपटांसाठी एक कोटीपेक्षा अधिकचे अनुदान देण्याचा निर्णय यांचा समावेश आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत असताना त्यांनी २ जून २०२३ रोजीच रायगडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा केला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने त्यांची पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. भारतीय भाषांमधील साहित्य आणि पारंपारिक ज्ञान विकीपीडियावर आणण्याची घोषणा त्यांनी केली. त्याच प्रमाणे विकिपीडियाच्या माध्यमातून शिवचरित्र जगातील ३०० भाषांमध्ये प्रकाशित करण्याचा मुनगंटीवार यांचा मानस आहे. त्याच प्रमाणे महाराजांवर वीस भाषांमध्ये ‘टॉकिंग ऑडिओ’ आणि व्हीडीओ बूक तयार करण्यात येणार आहे.