Shiv Sena Political crisis मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील विजयाने शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडी यांचे वर्चस्व दाखवून दिले असले तरी, संभाव्य धोकेही दाखवून दिले आहेत. शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या शिवडी विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत घटलेले मताधिक्य ही ठाकरे गटासाठी चिंतेची बाब आहे. विद्यामान आमदार अजय चौधरी हे तिसऱ्यांदा रिंगणात उतरण्याची तयारी करत असले, तरी पक्षातूनच त्यांना आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. याचा फायदा महायुती घेऊ शकते का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वरळी आणि शिवडी म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जातो. त्यातही शिवडी मतदारसंघातील लालबाग, परळ म्हणजे शिवसेनेची हक्काची मते. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना वरळीतून कमी मताधिक्य मिळाल्याची चर्चा झाली. पण त्याचबरोबर शिवडीतील मताधिक्यही घटल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात चिंता आहे. शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतरही शिवडी विधानसभा क्षेत्रातील एकाही माजी नगरसेवकाने ठाकरेंची साथ सोडली नाही. पण लोकसभेच्या निकालामध्ये शिवडी विधानसभेतील पालिका प्रभागांमध्ये मताधिक्य घटले आहे. १९६६ पासून शिवडीतील लालबाग, परळमध्ये नेहमी शिवसेनेचा नगरसेवक निवडून येत होता. मात्र यंदा लालबागमध्ये ठाकरे गटाला १३०० मतांची पिछाडी मिळाली तर परळमध्ये केवळ ३०० मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे लालबाग परळमध्येच ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

हेही वाचा >>> विम्बल्डनमध्ये अल्कराझसमोर पुन्हा जोकोविचचे आव्हान

शिवडी मतदारसंघातील विद्यामान आमदार अजय चौधरी हे आतापर्यंत दोनदा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी चौधरी यांना विधानसभेच्या गटनेतेपदी नेमले होते. ठाकरे यांनी विश्वास दाखवल्यामुळे चौधरी यांना पुन्हा आमदारकी मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र गटनेते पदावरून चौधरी यांची आक्रमकता दिसली नसल्याची चर्चा ठाकरे गटात सुरू आहे. त्यातच शिवडीमध्ये मताधिक्य घटल्यामुळे चौधरी यांच्याविरोधात मतदारसंघात नाराजी आहे का याबाबतही चाचपणी सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौधरी यांच्याबद्दल नाराजी

चौधरी जिथे राहतात त्याच लालबाग परळमधील मते कमालीची घटल्यामुळे या विषयाचे गांभीर्य वाढले आहे. गेल्या काही महिन्यांत या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका करण्यात आल्या असून त्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये विशेषत: महिला आघाडीमध्ये नाराजी असल्याचे समजते. त्यामुळे चौधरी हे राहत असलेल्या लालबाग परळमध्ये मतपेटीतून ही नाराजी दिसत असल्याची या मतदारसंघात चर्चा आहे. लालबाग परळ हा परिसर गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असून मंडळांमध्येही चौधरी यांच्याबद्दल नाराजी असल्याची चर्चा आहे.