चंद्रशेखर बोबडे

नागपूर : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत असलेले पुसदचे नाईक घराणे पक्षफुटीच्या वेळी शरद पवार यांच्यावर अविश्वास दाखवत बंडखोर अजित पवार यांच्यासोबत गेले आहे. पुसदचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील मनोहर नाईक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे नाईक घराणे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाते. पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा त्यांच्यासोबत सुरुवातीला जाणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांचा समावेश होता. त्यांच्यानंतर त्यांचे पुतणे मनोहर नाईक हे सुद्धा राष्ट्रवादीचे निष्ठावंत होते. त्यांना पक्षाने अनेक वर्षे मंत्रिमंडळात स्थान दिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाईक यांच्याऐवजी त्यांचा मुलगा इंद्रनील नाईक यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली व ते विजयी झाले.

हेही वाचा >>>काँग्रेससाठी छत्तीसगड केवळ ‘एटीएम’ मशीन; पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

नाईक घराणे आणि शरद पवार यांचे संबंध बघता राष्ट्रवादीत फूट पडल्यावर हे घराणे पवार यांच्यासोबत राहील, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण मनोहर नाईक व त्यांचे पुत्र व आमदार इंद्रनील नाईक यांनी बंडखोर अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये प्रथम आमदार झालेले इंद्रनील राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हा मंत्रीपदासाठी इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादीने त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे ते नाराज होते, अशी चर्चा होती.यापूर्वीही नाईक घराण्यातील नीलय नाईक यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. हे येथे उल्लेखनीय.

हेही वाचा >>>‘कागल पॅटर्न’ची इतरत्र पुनरावृत्ती होणार ?

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना मनोहर नाईक म्हणाले, मतदारसंघाचा विकास करण्यासाठी फक्त आमदार असून चालत नाही तर त्यासाठी सत्तेची जोडही महत्वाची असते. हा विचार करूनच अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी शरद पवार आमचे नेते आहेत व त्यांच्याविषयी आदर कायम आहे.

दरम्यान विदर्भातील राष्ट्रवादीच्या एकूण सहा पैकी चार आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहेत. त्यात धर्मरावबाबा आत्राम (अहेरी). मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव), राजेंद्र कारेमोरे (तुमसर) आणि इंद्रनील नाईक (पुसद) यांचा समावेश आहे. तर अनिल देशमुख (काटोल) आणि डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा) हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.

हेही वाचा >>>शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडखोरीत रायगड महत्वाच्या भूमिकेत

नाईक घराण्याचे महत्त्व

यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमधील नाईक कटुंबीयांचे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. १९५२ पासून पुसद विधानसभा मतदारसंघावर या घराण्याची पकड आहे. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री या घराण्याने महाराष्ट्राला दिले आहेत. या घराण्यांशी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे व त्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ मतदार संघाच्या विकासासाठी निधी हवा असेल तर सत्तेसोबत राहणे गरजेचे आहे. अजित पवार यांनी निधीबाबत आश्वस्थ केल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.” – इंद्रनील नाईक, आमदार पुसद.