Top Political News in Today : आज दिवसभरात मुंबईसह राज्यात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. १) मराठा आरक्षणासाठी काढलेल्या शासन निर्णयाला मंत्री छगन भुजबळांनी पुन्हा तीव्र विरोध केला. २) हैदराबाद गॅझेट विरोधात न्यायालयात गेलात तर ओबीसी समाजाचं १६ टक्के आरक्षण गेलंच म्हणून समजा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिला. ३) मराठा समाज आणि ओबीसींचं ताट वेगवेगळं असायला हवं अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. ४) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक भूमिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली. ५) राजकारणात कधी कुणाची राख होत नाही, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
१) मराठा आरक्षणावरून राजकीय वाद
गेल्या आठवड्यात राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य करून मराठा आरक्षणाबाबत शासकीय आदेश काढला. या आदेशाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. “मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. हा शासन निर्णय सर्वांनाच संभ्रमित करणारा आहे, त्यामुळे सरकारने एकतर हा निर्णय रद्द करावा किंवा त्यातील संभ्रम दूर करून त्यात सुधारणा करावी”, अशी मागणी मंत्री भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेतून केली. या शासन निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं सूतोवाच त्यांनी यावेळी केलं. राज्यात सध्या सुरू असलेल्या आंदोलनांवरही मंत्री भुजबळांनी भाष्य केलं. बंजारा समाजही आता न्याय मागत आहे. त्यामुळे त्यांची मागणीही योग्य असल्याचे मला वाटते. कोणी येऊन काहीही धमकी देणार आणि तुम्ही धमक्यांना घाबरणार आहात का? कायदा हातात घेऊन आंदोलन चालवायचे आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
२) मनोज जरांगेंना मंत्री छगन भुजबळांना इशारा
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या शासकीय निर्णयाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी कडवट भूमिका घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. “हैद्राबाद गॅझेट विरोधात न्यायालयात गेलात तर आम्हीही १९९४ च्या शासन निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेणार. छगन भुजबळांनी जर मराठ्यांचं वाटोळं करण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी समाजाचं १६ टक्के आरक्षण गेलंच म्हणून समजा”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. “आमच्या समाजातील काही लोकं आमच्यावर टीका करीत आहेत, पण त्यांनी आजपर्यंत समाजाला काहीही दिलेलं नाही. राज्यात कुणीही आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा काढला की चर्चेला हेच लोकं जाणार. यांचे कपडे, गाड्या, चष्मे आणि सेंटचा वासच मराठ्यांनी पाहिला आहे”, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी विनोद पाटील यांना लगावला.
आणखी वाचा : Maharashtra Politics : छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे महायुतीची कोंडी? मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार?
३) मराठा आणि ओबीसी समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे : प्रकाश आंबेडकर
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला शासकीय आदेश कायद्याला धरून नाही. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं ताट वेगळं असायला हवं, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबाद खंडपीठाच्या एका निर्णयाचा दाखला दिला. सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही असं खंडपीठाने नमूद केलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “सत्तेत बसलेल्या निझामी मराठ्यांना गरीब मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावायची आहे. भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारले असून आरक्षण असूच नये असे गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. हा पक्ष ओबीसीचा समाजाचा शत्रू आहे. मंडल कमिशन वाचवणे फक्त आता ओबीसींच्याच हातात आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.
४) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा : गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं असताना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर हैदराबाद गॅझेटची मागणी मान्य करून शासन निर्णय काढण्यात आला. या निर्णयावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. “जोपर्यंत सर्व ओबीसी नेते एकतेनं नांदत नाहीत, तोपर्यत जरांगे यांच्यासारखे आंदोलक गप्प बसणार नाहीत. तुमची वज्रमूठ तयार करा आणि हैदराबाद गॅझेट विरोधात भूमिका घ्या”, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. “मनोज जरांगेंनी जातीयवाद वाढवला आहे. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे. विखे पाटील यांच्याकडे दोन पदं आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी राजीनामा द्यावा”, असंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : भाजपाचं ‘या’ राज्यातील सरकार धोक्यात? मित्रपक्षाचा युतीतून बाहेर पडण्याचा इशारा; कारण काय?
५) राजकारणात कधी कुणाची राख होत नाही : खासदार सुप्रिया सुळे
राजकारणात कधी कुणाची राख होत नाही आणि कुणी संपतही नाही, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं असं कधी काही होईल हे आमच्या ध्यानीमनीही नाही. प्रत्येकजण आपल्या कष्टाने आणि विचाराने प्रयत्न करत असतो. कुणी कुणाला संपवायची भाषा करत असेल तर ते योग्य नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी पत्रकार संघातर्फे ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना- अनेक लोकांना वाटलं की, माझी राख होत आहे, पण तेवढ्यात मी भरारी घेतली, असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. त्यांच्या या विधानावर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.