अलिबाग- एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे रायगड जिल्ह्यातील पारंपरीक प्रतिस्पर्धी ओळखले जायची, आलटून पालटून याच दोन पक्षांचे खासदार रायगड जिल्ह्यातून लोकसभेवर निवडून जायचे, आज मात्र दोन्ही प्रतिस्पर्धी पक्ष निवडणुकीच्या आखाड्यापासून दूर गेल्याचे चित्र आहे.

रायगडचा लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी कुलाबा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. १९६२ साली स्थापन झालेल्या या मतदारसंघाची २००९ मध्ये पुनर्रचना करण्यात आली. तेव्हापासून हा मतदारसंघ हा रायगड नावाने ओळखला जाऊ लागला. शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्ष होते. दोघांमध्ये कायम तुल्यबळ लढती पहायला मिळायच्या. आलटून पालटून या दोन पक्षांचेच खासदार लोकसभेवर निवडून जायचे. सहा वेळा काँग्रेस तर पाच वेळा शेकापचे उमेदवार लोकसभेवर या मतदारसंघाने निवडून दिले. आज मात्र दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यापासून दूर गेले आहेत. मित्र पक्षांचा प्रचार करण्यातच दोन्ही पक्षांना धन्यता मानावी लागत आहे.

हेही वाचा – “पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!

बॅरीस्टर ए आर अंतुले यांच्या निधनानंतर जिल्ह्यात काँग्रेसला उतरती कळा लागली. रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील यांच्यासारखे दुसऱ्या फळीतील नेते पक्षाला सोडून भाजपमध्ये गेले. माणिकराव जगताप आणि मधुकर ठाकूर यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील संघटनेला एकसंघ ठेवेल असे नेतृत्वच उरले नाही. त्यामुळे पक्षाची वाताहत लक्षात घेऊन २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडला. त्यानंतर काँग्रेसने आजतागायत या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली नाही.

मतदारसंघ पुनर्रचनेत मुळचा कुलाबा मतदारसंघ मावळ आणि रायगड अशा दोन मतदारसंघात विभागला गेला. त्यामुळे शेकापची ताकद दोन मतदारसंघात विभागली गेली. २००९ मध्ये स्वतः निवडणूक लढवण्यापेक्षा मित्रपक्षांना मदत करण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले. शेकापने पहिल्यांदा लोकसभेला उमेदवार दिले नाही. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेकापने मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार दिले पण ते फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. म्हणून पुन्हा एकदा मित्र पक्षांना मदत करण्याचे धोरण शेकापने स्वीकारले. २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ आणि रायगडमधील उमेदवारांना शेकापने पाठींबा दिला. यंदाच्या निवडणुकीतही शेकापने पक्षाचे उमेदवार देण्याऐवजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांना पाठींबा केला आहे. त्यामुळे शेकाप निवडणूक आखाड्याच्या बाहेर राहून मित्रपक्षांचा प्रचार करणार आहे.

हेही वाचा – आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंहांना “इतिहास न्याय देईल?”

अशा पद्धतीने रायगडमधील दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले शेकाप आणि काँग्रेस हे यंदाही लोकसभा निवडणुकीपासून दूर असणार आहेत. दोन्ही पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनंत गीते यांचा प्रचार करताना दिसणार आहेत.