Kalyan Banerjee targets kirti azad : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांमध्ये निवडणूक आयोगाच्या परिसरातच वादावादी झाल्याची माहिती आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या वादावादीचे व्हिडीओ मंगळवारी (तारीख ८ एप्रिल) सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्याण बॅनर्जी यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत पक्षाचे खासदार कीर्ती आझाद यांच्यासह एका महिला खासदाराला (ज्यांचे त्यांनी नाव घेतले नाही) लक्ष्य केलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही या वादाची गंभीर दखल घेतली असून दोन्ही खासदारांना पक्षातून निलंबित करण्याचा इशारा दिला आहे.

तृणमूलच्या खासदारांमध्ये काय वाद झाला?

पक्षातील सूत्रांनी सांगितले की, या वादाच्या केंद्रस्थानी स्वत: कल्याण बॅनर्जी आहेत. त्यांच्यात आणि पक्षातील एका महिला खासदारामध्येच हा वाद झाल्याची माहिती आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, “४ एप्रिल रोजी पक्षाचे एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला निवेदन देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. या निवेदनावर तृणमूल काँग्रेसच्या बहुतांश खासदारांचे नाव आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. मात्र, एका महिला खासदाराचे नाव निवेदनातून वगळण्यात आले होते. हा प्रकार लक्षात येताच संबंधित महिला खासदाराला राग अनावर झाला. त्यांनी पक्षाचे प्रतोद कल्याण बॅनर्जी यांच्याकडे याबाबत विचारणा केली. तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये निवडणूक आयोगाच्या आवारातच बाचाबाची झाली.”

कल्याण बॅनर्जी यांची महिला खासदाराला अरेरावी?

“दोन्ही खासदारांमध्ये सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की, कल्याण बॅनर्जी यांनी महिला खासदाराला चांगलेच खडेबोल सुनावले, ज्यामुळे महिला खासदार अधिकच संतापली. निवडणूक आयोगाच्या परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी दोन्ही खासदारांमध्ये सुरू असलेला हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांनी तातडीने कल्याण बॅनर्जी यांना अटक करावी अशी मागणीच महिला खासदाराने लावून धरली, यामुळे कल्याण बॅनर्जी हे अधिकच संतप्त झाले. त्यांनी महिला खासदाराबद्दल बोलताना आपला संयम गमावला होता”, असंही पक्षातील एका खासदाराने सांगितले.

आणखी वाचा : …तर बिहारमध्ये भाजपाचा एकही आमदार निवडून येणार नाही; प्रशांत किशोर यांनी काय दावा केला?

कल्याण बॅनर्जींविरोधात पोलिसांत तक्रार?

तृणमूलच्या दुसऱ्या एका खासदाराने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं, “कल्याण बॅनर्जी यांनी वापरलेल्या भाषेमुळे महिला खासदार अत्यंत संतापली होती. तिने बॅनर्जी यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली. मात्र, पक्षातील इतर खासदारांनी तिची समजूत काढली. पोलिसांत तक्रार करण्याआधी तुम्ही हा प्रकार पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना कळवायला हवा, असा सल्ला त्यांनी महिला खासदाराला दिला. त्यानुसार महिला खासदाराने ममता दीदींना पत्र लिहिलं असून कल्याण बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.”

कल्याण बॅनर्जी यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

दरम्यान, भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांमध्ये झालेल्या वादावादीचा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर कल्याण बॅनर्जी यांनी कोलकाता येथे जाहीर पत्रकार परिषद घेतली. आपल्या पक्षातील महिला खासदाराचा उल्लेख करताना कल्याण बॅनर्जी म्हणाले, “जेव्हा मी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचलो, तेव्हा पक्षातील एका महिला खासदाराने माझ्यावर ओरडायला सुरुवात केली. त्यांचे म्हणणे होते की मी जाणून बुजून तिचे नाव यादीत समाविष्ट केले नाही. सदरील महिला खासदाराबाबत मी कोणतेही अपशब्द वापरले नाहीत, त्यांनी माझ्यावर केलेले आरोप अत्यंत खोटे आहेत. त्यांनी मला दिलेले आदेश मी का पाळू? माझ्यासारख्या माणसाला तुरुंगात टाकले पाहिजे असं त्यांनी उघडपणे बोलून दाखवले. मला या गोष्टीचा खूपच राग आलेला आहे. या महिलेचा अजेंडा फक्त नरेंद्र मोदी आणि अदानींना लक्ष्य करणं आहे”, असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : काँग्रेसनं कंबर कसली, भाजपाचं टेन्शन वाढणार? ६४ वर्षांनंतर गुजरातमध्ये काय घडणार?

कीर्ती आझाद यांच्यावरही केली टीका

कल्याण बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेतून तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांनाही लक्ष्य केलं. “भाजपामधून आलेल्या आणि त्यांच्याकडे कोणतीही लोकप्रियता नसलेल्या आमच्या एका खासदाराने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. ते आमच्या पक्षाची प्रतिमा जाणून बुजून खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कीर्ती आझाद हे मिठाईचे दुकानं उघडण्यासाठी संसदेत स्वाक्षरी मोहीम चालवत होते. मी त्याचा निषेध केला म्हणून त्यांनी माझ्यावर राग काढला”, असंही कल्याण बॅनर्जी म्हणाले. दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसने या प्रकरणाबाबत कीर्ती आझाद यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.

कल्याण बॅनर्जी यांच्या हकालपट्टीची मागणी

कल्याण बॅनर्जी यांनी तृणमूलचे ज्येष्ठ खासदार सौगत रॉय यांच्यावरही टीका केली आहे. सौगत दा यांनी पक्षाची प्रतिमा एकापेक्षा जास्त वेळा खराब केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कल्याण बॅनर्जी यांच्या या आरोपाला सौगत रॉय यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “कल्याण बॅनर्जी यांच्या असंस्कृत वर्तनाची आम्हाला अनेक वेळा जाणीव झाली आहे. त्यांची पक्षाच्या मुख्य प्रतोद पदावरून हकालपट्टी केली पाहिजे. ममता दीदींनी हा निर्णय घेतला नाही तर पक्षात मोठी फूट पडू शकते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ममता बॅनर्जींनी दिली खासदारांना तंबी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेस नेते डेरेक ओबेरियन यांनी ममता बॅनर्जी यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. यानंतर ममता बॅनर्जींनी पक्षातील तिन्ही खासदारांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. त्याचबरोबर महिला खासदाराच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. पुन्हा पक्षात असा प्रकार घडल्यास थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या या प्रकरणावर कुणीही भाष्य करू नये, असे निर्देशही त्यांनी आपल्या पक्षातील खासदारांना दिले आहेत.