सतीश कामत

रत्नागिरी: कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहता उध्दव ठाकरेंची शिवसेना आणि राणेप्रणित भाजपा या दोन पक्षांनी आपापले गड अबाधित राखल्याचं चित्र पुढे आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेने निवडणूक झालेल्या २२२ ग्रामपंचायतींपैकी सुमारे ५० टक्के ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे प्रमाण किंचित जास्त आहे. या अतिशय स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या निकालांबाबतचे सर्वच राजकीय पक्षांचे दावे थोडे अतिशयोक्तीचे असतात, हे लक्षात घेतलं तरी यातून मतदारांचा कल निश्चितपणे लक्षात येत आहे. त्यामुळे हे निकाल फारसे धक्कादायक अजिबात नाहीत.

Buldhana lok sabha, Buldhana,
बुलढाण्यात पक्षीय उमेदवारांसह अपक्षांचीही अग्निपरीक्षा; मतांचे ध्रुवीकरण, विभाजन ठरणार निर्णायक!
Buldhana Lok Sabha constituency, independent candidate, won, history of buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, buldhana news,
बुलढाणा: सात दशकात अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळलाच नाही! यंदा चमत्कार घडणार का? चर्चेला उधाण
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत

पण यापूर्वीच्या निवडणुकांच्या तुलनेत या वेळी असलेला मुख्य फरक म्हणजे, आत्तापर्यंत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे चार प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असत. जूनमध्ये राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे यावेळी त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना, या अस्थायी स्वरूपाच्या गटाचा सहभाग झाला आहे. या घडामोडीमुळे यंदाच्या निवडणुका जास्त रंगतदार होतील किंवा धक्कादायक निकाल लागतील, अशी काहीजणांची अटकळ होती. पण कोकणातल्या मतदारांनी आपापल्या परंपरागत राजकीय भूमिका कायम राखत रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंची शिवसेना, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील त्या पक्षाला झुकतं माप द्यायचं, या पूर्वापार धोरणानुसार यावेळी भाजपाला हात दिला आहे. पण हा विजय किंवा हे बळ भाजपाचे नसून राणे त्यांच्या बाजूला आहेत म्हणून आलेली सूज आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

हेही वाचा: सारथ्य समृद्धीवरचे आणि राजकारणाचे: शिदेंसाठी एक सुसह्य, दुसरे हादरे देणारे

राणे शिवसेनेत होते तेव्हा किंवा नंतर काँग्रेस पक्षामध्ये आल्यावर त्या त्या पक्षांमध्ये असंच हत्तीचं बळ आल्याचा भास होत असे. पण राणे यांनी तेथून मुक्काम हलवल्यावर उरलेल्या कार्यकर्त्यांना पक्षसंघटन पुन्हा बांधताना किती कष्ट घ्यावे लागतात आणि किती काळ जावा लागतो, याचं या जिल्ह्यातील शिवसेनेची गेल्या सुमारे पंधरा वर्षांची वाटचाल, हे उत्तम उदाहरण आहे. अर्थात शिवसेना त्यातून सावरली. पण पडझडीमुळे गमावलेली राजकीय ताकद फार वाढली नाही. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आणि २०१४ च्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये आलेले दीपक केसरकर यांच्यामुळे अलीकडेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनपैकी दोन आमदार शिवसेनेचे असल्याचं चित्र होतं. त्यामुळे या पक्षाच्या ताकदीबद्दल भ्रम निर्माण होत असे. पण केसरकर यांचं आत्तापर्यंतचं संधीसाधू राजकारण पाहता शिवसेनेने त्यांना हिशेबात धरणं चुकीचं ठरले. वाऱ्याची दिशा पाहून ते शिवसेनेतून बाहेर पडल्यावर आता हा पक्ष पुन्हा आमदार वैभव नाईक यांच्या जीवावर मुख्यत्वे कुडाळ-मालवण तालुक्यापुरता मर्यादित झाला आहे.

हेही वाचा: कोल्हापुरात महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपचेही यश उल्लेखनीय

या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्यात ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तब्बल १८० ग्रामपंचायतींवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने ७२ ठिकाणी बहुमत मिळवत दुसरा क्रमांक पटकावला असला तरी या दोन क्रमांकांमध्ये सुमारे मोठं अंतर आहे. भाजप, शिवसेनेपाठोपाठ ग्रामविकास पॅनेलने ५० जागा मिळवत मोठी झेप घेतली आहे, तर राज्यातील सत्तांतरानंतर नव्याने उदयास आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेने भाजपाच्या साथीने १५ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फक्त २ ग्रामपंचायतींपुरती मर्यादित झाली असून काँग्रेसला तर भोपळाही फोडता आलेला नाही, असं चित्र आहे.

या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने आपलं वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. कारण इथे ‘राणे फॅक्टर’ कधीच फारसा चाललेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस खेड-चिपळूण-संगमेश्वरपुरतीच मर्यादित आहे आणि कॉंग्रेसची प्रकृती दोन्ही जिल्ह्यांमध्ये तोळामासा आहे. पण जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी दोघेजण शिंदे गटात सामील झाल्याने राजकीय चित्र किती बदलतं, याबाबत उत्सुकता होती. त्यापैकी आमदार योगेश कदम यांनी खेड-दापोली टापूवरची वडिलोपार्जित पकड सुटू दिलेली नाही आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपला मतदारसंघ शाबूत ठेवला आहे. पण दोघेही जण त्यापलीकडे फारसे प्रभावी ठरले नाहीत. भाजपाने मात्र या जिल्ह्याच्या दक्षिण भागात आपलं अस्तित्व वाढवलं असल्याचं या निवडणुकांच्या निकालांवरुन दिसून येत आहे.

हेही वाचा: औरंगाबादच्या ग्रामीण भागात शिवसेनाच आघाडीवर

संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या चार तालुक्यांमध्ये मिळून पक्षाचे १७ सरपंच आणि १८८ सदस्य निवडून आल्याचा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये या आकडेवारीबद्दल नेहमीच दावे-प्रतिदावे होत असतात. शिवाय, अन्य कोणत्याही निवडणुकीमध्ये नसणारा ‘गाव पॅनेल’ हा पूर्णपणे स्थानिक पर्याय, सर्वच राजकीय पक्षांची गणितं बिघडवत असतो. त्यामुळे हे तपासून घ्यावं लागेल. पण काही ठिकाणी स्वबळावर, तर काही ठिकाणी शिंदे गटाशी अनौपचारिक युती केल्याने ग्रामीण भागात या पक्षाचं अस्तित्व वाढलं आहे, हे निश्चित. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघात दोघांनी मिळून वरचष्मा ठेवण्यात यश मिळवलं आहे. या निवडणुकांनंतर पुढील वर्षाच्या पूर्वार्धात नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने झालेली ही रंगीत तालीम सर्व प्रमुख पक्षांसाठी उपयुक्त झाली आहे. या चित्रात फारसा बदल अपेक्षित नसला तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना किती विस्तार वाढवते, हे औत्सुक्याचं ठरणार आहे.