छत्रपती संभाजीनगर : ‘आमचा उठाव’ आणि ‘ त्यांची गद्दारी’ या जुन्या उखाळ्या – पाखाळ्याच्या खेळात अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठीच्या मागण्यांची जंत्री प्रशासनापर्यंत पोहचलीच नाही. तोपर्यंंत पूर व अतिवृष्टीग्रस्तांना मदत कशी केली जाईल याचे शासन निर्णय जारी झाले होते. उद्धव ठाकरे मदतीला येत नाहीत, आम्हीच कसे धाऊन येतो, असे सांगण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी सोडली नाही. तर उद्धव ठाकरे यांनी ‘ भाजप’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेच्या रिंगणात घेतले.

दाेन शिवसेनेतील वादामध्ये भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीची बैठक घेतली. या सगळ्यात ‘ आरक्षणा’चे आवाजही वाढत असल्याचे चित्र मराठवाड्यात दिसून आले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘ हंबरडा मोर्चा’ काढण्याचे ठरल्यानंतर शिवसेनेकडून ‘ गट’ प्रमुखांचा मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले. हा मेळावा घेण्याच्या तयारीला खूप कमी वेळ मिळाल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाषणात मान्य केले. पुढे गटप्रमुखाच्या मेळाव्यावर ‘ कट प्रमुख ’ चा मेळावा अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली.

या मेळाव्यातील दोन भाषणांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली. पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी ‘ निवडणुकीमध्ये २० हजार मतदार बाहेरुन आणल्याचा फायदा झाला,’ असे जाहीर न बोलायचे वाक्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमाेर उच्चारले. हे वाक्य उलटेल, निवडणुकीत केलेले उलटे- पालटे प्रयोग बाहेर येतील असे लक्षात आल्यानंतर त्यांनी आमदार भुमरे यांना रोखले. पण तोपर्यंत वेळ हातची निघून गेली होती. मतदारसंघातील पण परगावी राहणारे असा खुलासा विलास भुमरे यांना करावा लागला. अशी स्थिती खासदार भुमरे यांच्या भाषणातूनही आली.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे संदीपान भुमरे यांनी ‘तुमच्या हंबरड्यापेक्षा आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा हंबरडा मोठा आहे.’ असे वाक्य म्हटले आणि एकनाथ शिंदे यांना पुन्हा डोक्यावर हात मारावा लागला. बोलण्याच्या ओघात झालेल्या या चुकांमुळे शिवसेनना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची कार्यशैली स्पष्टपणे समोर आली. मात्र, याच मेळाव्यात ठाकरे गटाच्या कार्यशैलीवरही पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढविण्यात आला. खासदार भुमरे यांनी ‘ कोविडच्या काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना भेटण्याची संधीच मिळाली नाही. मुख्यमंत्री फक्त ऑनलाईन आणि ऑफलाईन आम्ही पाहिले. त्यांना ना कामे सांगता आली. ना त्यांनी ती केली. अगदी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पैठणच्या ज्ञानेश्वर उद्यानासाठी निधी मागितला. त्यांनी नुसतेच रामराम घालत त्याकडे दुर्लक्ष केले. या काळात आम्ही वर्षा बंगलासुद्धा पाहिला नाही. कोणाला येऊच दिले जात नव्हते.’ असे म्हणत ठाकरे यांच्यावर टीका केली.

पैठणमधील एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला उद्धव ठाकरे यांनी मदतीचे आश्वसान देऊनही ती कशी केली गेली नाही, असे जाहीर भाषणातून सांगण्यात आले. पुढे या शेतकऱ्याला एक लाख रुपये तातडीने पाठवा, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले. आम्ही मदतीला धाऊन येतो, हे सांगण्याची संधी त्यांनी घेतली.

दुसरीकडे ‘ हंबरडा’ मोर्चात ५० खोके एकदम ओके या घोषणेसह ‘ गद्दारी’ चा मुद्दा निघाला. अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि कर्जमुक्तीचा नारा देण्यात आला. या निमित्ताने कमकुवत झालेल्या संघटनेला बांधण्यासाठी ठाकरे गटास कार्यक्रम मिळाला. गाव बैठका, मंडळ बैठका घेऊन मोर्चाची तयारी केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, उद्धव ठाकरे स्वत: मोर्चात उतरत असतानाही मोर्चातील ‘ गर्दी’ जमविण्यास फारसे यश मिळाल्याचे दिसून आले नाही. या काळात अतिवृष्टीच्या चक्रात सापडलेला शेतकरी ‘ सोयाबीन ’ काढून काही हाती लागते का हे तपासत होता. त्यामुळे मोर्चात शेतकऱ्यांची संख्या कमी दिसून आली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी तीन शेतकऱ्यांची भाषणे शिवसेनेने ठेवली. अतिवृष्टीचे संकट किती गंभीर आहे, हे त्यातून उमजावे असे अपेक्षित होते. ते घडलेच नाही. उलट अतिवृष्टीमध्ये सैनिकासारखे लढणारे ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांना भाषणाची संधी मिळाली नाहीच. पुन्हा एकदा निवडून येणारे लोकप्रतिनिधी मागच्या बाजूला ही मंचकावरील रचना कायम होती. त्यामुळे दोन्ही शिवसेनेत अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या समस्यांभोवती उखाळा- पाखाळ्यांचा खेळ मांडल्याचे आणि रंगल्याचे चि़त्र कायम होते.