छत्रपती संभाजीनगर: उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टीकेच्या केंद्रस्थानी ठेवायचे पण कायद्याच्या कचाट्यातूनही वाचायचे अशी रणनीती आखून हिंगोलीच्या सभेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी रविवारी सभेचा फड गाजविला. ‘ ‘फडतूस’, ‘कलंक’ असे मी म्हणणार नाही. ‘थापाड्या’ मी म्हणणार हाेतो, पण मी ‘थापाड्या’ही म्हणणार नाही’ अशी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली तिरकस टीका एका बाजुला आणि दुसऱ्या बाजूला हिंगोली शहरातील अवैध धंद्यांचे उल्लेख यामुळे गृह खाते टीकेच्या केंद्रस्थानी राहील अशी तजवीज शिवसेनेकडून केली जात असल्याची रणनीती दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी हिंगोली शहरात शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आयोजित केलेल्या ‘कावड यात्रा’ फलकाची गर्दीच गर्दी होती. त्या फलकांवर आमदार बांगर यांच्या गळ्यात नाना प्रकारच्या साखळ्या, गंडे- दोरे, कपाळवर उभे गंध आणि बलदंड बाहू दाखविणाऱ्या प्रतिमा दिसून येत होत्या. अशा वातावरणात रामलिला मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या हिंगोली येथील जाहीर सभेला मोठी गर्दी झाली. शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी बांगर यांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करत शहरात बोकाळलेल्या अवैध धंद्यांना सत्ताधाऱ्यांचे कसे संरक्षण आहे, असे आरोप केले.

हेही वाचा… समविचारी पक्षांचेच महाविकास आघाडीला आव्हान!

‘कल्याण’, ‘कल्याण माॅर्निंग’, ‘माधुरी’, ‘ श्रीदेवी’, ‘धनबाजार’ हा मटका चालविला जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हिंगोली येथील जाहीर सभेत केला. हिंगोलीमधील कावड यात्रा ही भक्तीपेक्षा ‘शो’-बाजी’ अधिक आहे. या जिल्ह्यात हळद संशोधन केंद्र मंजूर करण्याचे श्रेय उद्धव ठाकरे यांचे असून त्यांनी हे काम पूर्ण केले होते. मात्र, हिंगोलीत पिकणाऱ्या मालावर प्रक्रिया करणारा उद्योग अजून उभा राहिलेला नाही. उलट येथील तरुण आपला दोन नंबरचा धंदा आहे, असे स्पष्टपणे सांगत आहेत. हे दोन नंबरचे मटक्याचे धंदे चालविणारे रतन खतरी हिंगोलीत आहेत. त्यांना आता कात्री लावली पाहिजे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी आरोप केले. तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत देवेंद्र फडणवीस यांना टीकेच्या केंद्रस्थानी ठेवायचे पण कायद्याच्या कचाट्यातही सापडायचे नाही, अशी वाक्य रचना करायची अशी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.

लोकसभेचा उमेदवार कोण?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सभांमधील टीका आणि भाषणांमधील मद्द्यांच्या पुढचे राजकारण उद्धव ठाकरे कसे करणार, असा प्रश्न सभेनंतर उपस्थित केला जात आहे. हिंगोलीच्या खासदार म्हणून निवडून आलेले हेमंत पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले. पण त्यांच्या वर्तणुकीवर, कार्यशैलीवर कोणी चक्कार शब्दही काढला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायची आणि आपल्याच पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या व्यक्तींवर कोणतेही भाष्य करायचे नाही, असे सभेचे स्वरुप होते. शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे प्रतीनिधीत्व कोणाकडे असू शकेल याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. सभेचे सूत्रसंचालन करणारे जयप्रकाश मुंदडा आणि कॉग्रेसमधून पुन्हा शिवसेनेमध्ये आलेले माजी खासदार सुभाष वानखेडे ही दोन नावे चर्चत आणली गेली. सभेत अंबादास दानवे यांच्या भाषणापूर्वी सुभाष वानखेडे यांचे भाषण झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चर्चेतील नावे आणि सक्षम उमेदवार

उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीपासून उद्धव ठाकरे यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार नाहीत, ही चर्चा हिंगोली जिल्ह्यातील राजकीय पटलावर सुरू आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभेच्या जागेवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दावा सांगितला जात असून जयप्रकाश दांडेगावकर निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. मात्र, कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आहे. कॉंग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्यासाठी ती सोडवून घेण्यात आली होती. २०१४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या निवडून आलेल्या दोन जागांमध्ये नांदेड आणि हिंगोली या दोन मतदारसंघाचा समावेश होता. त्यामुळे या जागेवरील आपला दावा कॉग्रेस सोडणार नाही, असे सांगण्यात येत आहे. उमेरखेडचे डॉ. अंकुश देवसरकर याचे नावही चर्चेत आणले जात आहे. जागा वाटपात कॉंग्रेसची जागा असताना आणि हिंगोलीमध्ये सक्षम उमेदवार नसताना उद्धव ठाकरे यांची ही कसरत कशासाठी,असा प्रश्न विचारला जात आहे.