Raj Thackeray MNS News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करून ती प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला नुकतेच दिले. यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले. यादरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्यामागचं कारण म्हणजे, आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा अटकळी बांधण्यात आल्या. मात्र, १२ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज यांची भेट घेतल्यानंतर या अटकळींना काहीसा ब्रेक लागला. दरम्यान, राज ठाकरे हे स्वतंत्र निवडणुका लढविणार की राजकीय पक्षांबरोबर युती करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, तरीही ते राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची भूमिका बजावतील हे मात्र निश्चित आहे.

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी शिवसेना ठाकरे गटात काहीशी अस्वस्थता निर्माण करू शकतात. कारण, भाजपासह सर्वच राजकीय पक्ष मनसेबरोबर हातमिळवणी करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. मात्र, राज ठाकरे यांची आजपर्यंतची राजकीय भूमिका अनेकांना गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळे मनसेची नेमकी कोणत्या पक्षाबरोबर युती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. २००६ मध्ये एकसंध शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती.

मनसेची निवडणुकीतील कामगिरी कशी राहिली?

  • २००९ मध्ये मनसेने पहिल्यांदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सहभाग घेतला होता.
  • लोकसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, त्यांच्या मतांचा टक्का ४.१% एवढा होता.
  • विधानसभा निवडणुकीत मनसेची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी १३ जागांवर विजय मिळविला आणि एकूण ५.७ टक्के मते घेतली.
  • मात्र, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगिरीत सातत्याने घसरण दिसून आली.
  • २०१४ आणि २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत मनसेला प्रत्येकी एका जागेवर यश मिळालं.
  • २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही.

आणखी वाचा : मंत्रिमंडळातून हकालपट्टी होताच भाजपा आमदाराने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; गोवा विधानसभेत नेमकं काय घडलं?

२००६ ते २००९ दरम्यान मनसेला मोठं यश

विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मनसेला समाधानकारक यश मिळालं नसलं तरी राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला. त्यामुळे मनसेने आतापर्यंत लढविलेल्या तीन महापालिका निवडणुकीत तुलनात्मकरीत्या चांगली कामगिरी केली आहे. २००६ ते २००९ दरम्यान झालेल्या पहिल्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेने १२ महापालिकांमध्ये उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकूण ४५ जागा त्यांच्या पारड्यात पडल्या. महापालिका निवडणुकीत मनसेला मिळालेल्या मतांची टक्केवारी ५.८७ टक्के इतकी होती.

राज्यातील एकूण २२ महापालिकांमध्ये नगरसेवकपदाच्या २,११८ जागा आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी नाशिकमध्ये झाली, जिथे पक्षाने एकूण १०८ पैकी १२ जागा जिंकल्या आणि १२.९७% मतं मिळवली. त्यानंतरच्या पालिका निवडणुकीत मनसेने पुण्यातील १४४ पैकी आठ जागा जिंकल्या. त्यावेळी मनसेला मिळालेली मतांची टक्केवारी ७.७४ इतकी होती. गेल्यावेळी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेने १०.४३% मतांसह सात जागांवर विजय मिळवला होता.

Raj Thackeray MNS Alliance (PTI Photo)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (छायाचित्र पीटीआय)

भाजपापेक्षाही मनसेला मिळाली होती जास्त मते

महापालिका निवडणुकांमधील मनसेची सर्वाधिक प्रभावी कामगिरी नाशिकमध्ये झाली. पक्षाने इथे एकूण १०८ जागांपैकी १२ जागा जिंकल्या आणि १२.९७ टक्के मते मिळवली. त्यानंतर पुण्यात मनसेने १४४ पैकी ८ जागा जिंकल्या आणि ७.७४ टक्के मते मिळवली. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेने १०.४३ टक्के मतांसह २२८ पैकी सात जागा जिंकल्या. नाशिक व मुंबई एकसंध शिवसेना आणि काँग्रेसने मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या होत्या, तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली होती. गमतीशीर बाब म्हणजे, नाशिक व मुंबईत मनसेला मिळालेलं मताधिक्य भाजपाच्या तुलनेत अधिक होतं. नाशिकमध्ये भाजपाला १०.४४% तर मुंबईत ८.६९% मते मिळाली, तर मनसेला अनुक्रमे १२.९७% आणि १०.४३% मते मिळाली. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेल्या मतांची टक्केवारी ११.२९% होती.

शहरी मराठी भाषिक मतदारांवर मनसेचा प्रभाव

२००६ ते २००९ दरम्यान झालेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालांच्या विश्लेषणात असं दिसून आलं की, मनसेने जिंकलेल्या ४५ जागांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते.
त्यापैकी १५ जागांवर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर, तर १३ जागांवर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होती. ही कामगिरी मनसेच्या शहरी मराठी मतदारांमध्ये असलेल्या प्रभावाचे आणि प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणाचे प्रतिबिंब मानली जात होती.

२००९-२०१४ दरम्यान मनसेची मोठी भरारी

२००९ ते २०१४ या काळात मनसेने महापालिका निवडणुकांमध्ये आपली कामगिरी अधिक बळकट केली. पक्षाने २६ पैकी फक्त दोन महापालिकांमध्ये उमेदवार न उभा करता इतर सर्व ठिकाणी निवडणुका लढवल्या आणि एकूण २,५४३ जागांपैकी १६२ जागा जिंकल्या. या निवडणुकांमध्ये मनसेचा एकूण मतवाटा १२.४३% इतका झाला, जो गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अधिक होता. यातही पक्षाची सर्वोत्तम कामगिरी नाशिक, पुणे, बृहन्मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या महापालिकांमध्ये झाली. या निवडणुकीत मनसेला सर्वाधिक यश नाशिकमध्ये मिळालं. नाशिक महापालिकेतील ४० जागा जिंकून मनसे क्रमांक एकचा पक्ष ठरला. तरीही बहुतमाच्या आकड्यापासून त्यांना दूर राहावं लागलं. मात्र, इतर पक्षांचा बाहेरून पाठिंबा घेऊन मनसेने नाशिक महापालिकेत सत्तास्थापन केली होती. त्यावेळी शिवसेनेने १९ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस २० जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेला १५ जागा जिंकण्यात यश मिळालं होतं.

मनसेला १७ महानगरपालिकांमध्ये मिळाले होते यश

या निवडणुकीत मनसेने एकूण १७ महापालिकांमध्ये जागा मिळवण्यास यश मिळवले. ज्यामध्ये पुणे १५२ पैकी २९ जागा, मुंबई २२७ पैकी २८ जागा, कल्याण-डोंबिवली १०७ पैकी २७ जागा, जळगाव ७५ पैकी १२ जागा आणि ठाणे महानगर पालिकेतील १३० पैकी जागांचा समावेश होता. मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) फक्त दोन महापालिकांमध्येच मनसेला जागा मिळवता आल्या नाहीत. विशेष बाब म्हणजे, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असताना मनसे २८ जागा जिंकून दुसरा क्रमांकाचा पक्ष ठरला. पुण्यात भाजपाला २६ जागा आणि शिवसेना केवळ १५ जागांवरच यश मिळविता आलं होतं.

मुंबईतही मनसेने केली होती चांगली कामगिरी

मुंबईत मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (१३ जागा) तुलनेत २८ जागा जिंकून चांगली कामगिरी केली होती. भाजपाला त्यावेळी मुंबईत केवळ ३१ जागा जिंकता आल्या होत्या. तर एकसंध शिवसेना ७५ जागा आणि काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या होत्या. जळगावमध्ये, प्रादेशिक पक्षांचा अधिक प्रभाव असतानाही मनसेने प्रमुख पक्षांमध्ये भाजपा (१५ जागा) पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले होते. कल्याण-डोंबिवलीत मनसे केवळ शिवसेनेच्या (३१ जागा) मागे होता. या निवडणुकीत मनसेने कल्याण-डोंबिवली महापालिकेत २८.७२ टक्के मताधिक्यासह सर्वात चांगली कामगिरी केली.

२५५ जागांवर मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते

नाशिकमध्येही मनसेला इतर राजकीय पक्षांपेक्षा सर्वात जास्त २८.२४ टक्के मते मिळाली. तर मुंबई महापालिकेत २०.६७% आणि पुण्यात २०.६% मतं मिळवत मनसे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. ठाणे (१५.४१%) आणि जळगाव (१३.२२%) येथे मतांच्या टक्केवारीत मनसे तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या महापालिका निवडणुकीत मनसेने एकसंध शिवसेनेविरोधात ५६ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस ३३ जागा, भाजपा २८ जागा आणि काँग्रेसच्या विरोधात २५ जागा जिंकल्या होत्या. विशेष बाब म्हणजे, २५५ जागांवर मनसेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती जिथे शिवसेनेने त्यांना मोठ्या प्रमाणात मागे टाकले, त्यांनी मनसेविरोधात सर्वाधिक ९२ जागा जिंकल्या, त्यानंतर राष्ट्रवादीने ५६, भाजपाने ४४ आणि काँग्रेसने ३७ उमेदवारांनी मनसेच्या उमेदवारांना पराभूत केलं. या आकडेवारीतून असे लक्षात येते की, या निवडणुकीत मनसे-शिवसेना युती असती तर ती भाजपापेक्षाही जास्त प्रभावी ठरली असती.

हेही वाचा : Caste Census : २०२७ ची जातीनिहाय जनगणना कशी केली जाणार? २०११ मधील ‘त्या’ चुका सरकार टाळणार?

२०१४ ते २०१९ दरम्यान मनसेची मोठी घसरण

२०१४ ते २०१९ दरम्यान पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला मोठा झटका बसला. एकूण २,७३६ जागांपैकी पक्षाला केवळ २६ जागांवर विजय मिळवता आला. विशेष बाब म्हणजे, या निवडणुकीत मनसेच्या मताधिक्यात मोठी घट पाहायला मिळाला. त्यांना केवळ ३.५६ टक्के इतकीच मते मिळाली. मनसेला सर्वाधिक यश कल्याण-डोंबिवलीत ९ जागांसह मिळालं. तर मुंबईत सात नाशिकमध्ये पाच, चंद्रपूर व पुण्यात प्रत्येकी दोन, आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेला केवळ एकच जागेवर विजय मिळाला. गेल्यावेळी झालेल्या मुंबई व कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेना आणि भाजपात (अनुक्रमे ८४-८२ व ५२-४२ जागा) चांगलीच चुरस रंगली होती. तर नाशिकमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवून ६६ जागा जिंकल्या होत्या. मनसेने जिंकलेल्या जागा या निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकण्यासाठी अपुऱ्या पडल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसेच्या मतांची टक्केवारी कशामुळे घसरली?

मुंबई आणि नाशिकमध्ये मनसेच्या जागा भाजपा किंवा शिवसेनेला बहुमत मिळवून देण्यासाठी पुरेशा नव्हत्या. एकंदरीत गेल्यावेळी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करता आली नाही. नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली आणि मुंबईतही मनसेला मोठं अपयश आलं. मतांची टक्केवारी पाहता, कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेला १०.३१% (सर्वाधिक) मते मिळाली. तर नाशिक महापालिका १०.०१ टक्के, मुंबई महापालिकेत ७.७३ टक्के, पुणे महापालिकेत ६.४४ टक्के आणि ठाणे महापालिकेत मनसेला फक्त ५.५७ टक्के मते मिळवता आली.