नागपूर : “ जुन्या कार्यकर्त्यांना विसरू नका, अन्यथा जेवढ्या वेगात वर गेले तेवढ्याच वेगात खाली याल” , अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्ष नेतृत्वाला कानपिचक्या दिल्या. गडकरींच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरात चर्चा आहे. त्यांचे वक्तव्य हे साधे कार्यकर्त्यां प्रेम नाही; ते भाजपमधील सत्तासंतुलन, संघटनातील असंतोष, आणि भावी राजकीय समीकरणांचे संकेत मानले जातात. त्यामुळेच गडकरींना आत्ताच जुन्या कार्यकर्त्यांचा आठव का व्हावा, असा सवालही त्यांच्याच पक्षातून केला जात आहे.

राज्यात भाजपमधील महाजन- मुंडे यांच्यानंतर व २०१४ पूर्वी गडकरी हेच महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा होते.या काळात महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात पक्षाला बहुजन चेहरा देण्यात त्यांचे योगदान कोणीच नाकारू शकत नाही. आजच्या भाजपच्या भरभराटीचे प्रमुख कारणही यातच दडलेले आहे. हे करीत असताना गडकरी यांनीही त्यावेळी विविध पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये आणले. त्यांना मोठी पदे दिली. त्यात अनेक कॉंग्रेस व इतर नेत्यांचा समावेश होता. विदर्भात सध्याच्या भाजपमध्ये अशी अनेक नावे आहेत की ज्यांचे मुळ कॉंग्रेस किंवा अन्य पक्षात आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश गडकरींच्या पुढाकारातून झाला. भाजपमध्ये आल्यावर आमदार खासदार झाले.

ते सर्व गडकरी समर्थक मानले जात असे. ( आत्ता काहींनी भूमिका बदलली आहे.) उदाहरणार्थ- ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघे, त्यांचे पुत्र , समीर मेघे, माजी आमदार सुधाकर देशमुख, वर्षेच माजी खासदार रामदास तडस, काटोलचे विद्यमान आमदार चरणसिंह ठाकूर यांच्यसह अशी अनेक नावे आहेत. दत्ता मेघे कॉंग्रेसचे माजी खासदार. नंतर राष्ट्रवादीत गेले. पुन्हा कॉंग्रेस मध्ये परतले.नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे पुत्र समीर यांना तर हिंगण्यातून तत्कालीन विद्यमान आमदाराला डावलून उमेदवारी देण्यात आली होती. वर्धेचे माजी खासदार रामदास तडस पूर्वी कॉंग्रेसचे विधान परिषद सदस्य होते नंतर भाजपमध्ये आले. खासदार झाले. गडकरी प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच्या काळातही इतर पक्षातून भाजपमध्ये पक्षप्रवेश झाले. तेंव्हाही जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो आहे, अशी ओरड होतच होती. पण पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही, असे सांगून बाहेरच्यांच्या येण्याचे समर्थन केले जात होते.

२०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर राज्यातील भाजपची समीकरणे बदलली. गडकरी केंद्रात मंत्री झाले आणि प्रदेश भाजपवरील त्यांची पकड सैल होण्यास सुरुवात झाली. २०१९,२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तर राज्यात भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांसाठी आपली दारे सताड उघडी ठेवली. जो येइल त्याला पक्ष प्रवेश असेच धोरण अवलंबले. या काळात अनेक कॉंग्रेस जण भाजपमध्ये आले. त्यात सावनेरचे विद्यमान आमदार आशीष देशमुख, उमरेडचे काँग्रेसचे माजी आमदार राजू पारवे यांचा समावेश आहे.पण यासाठी पुढाकार घेणारे नेते गडकरी नव्हते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील इतर पक्षाच्या अनेक माजी जि. प. सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पूर्वी पक्ष सत्तेत यावा म्हणून इतर पक्षाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जात होता. आत्ता आहे ती सत्ता टिकून राहावी, विरोधकच संपुष्टात यावे या भावनेतून पक्षप्रवेश सुरू आहेत. पूर्वी ही सामान्य कार्यकर्त्यांवर अन्यायच झाला आणि आत्ताही होत आहे, कदाचित पुढेही असेच सुरू राहील म्हणून गडकरींना जुन्या कार्यकर्त्यांची आठवण झाली का ? की त्यामागे अन्य काही कारणे आहेत? असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. गडकरींचे विधान सध्याच्या नेतृत्वशैलीवर व सत्ताकेद्रीत राजकारणावर अप्रत्यक्ष टीका असल्याचे मानले जात आहे,