नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात झाला. तब्बल ३९ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. विदर्भात हा सोहळा पार पडला असला तरी या भागातील सात जिल्हे मंत्रिपदापासून वंचित राहिले. विशेष म्हणजे, काही जिल्ह्यांच्या वाट्याला तीन मंत्रिपदे आली तर काही जिल्ह्यांना एकही मिळाले नाही, अनेक ज्येष्ठांना डावलण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांमधली नाराजी आता जाहीरपणे व्यक्त होऊ लागली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातून महायुतीला घवघवीत यश मिळाले, एकूण ६२ जागांपैकी ४९ जागा महायुतीने जिंकल्या. त्यामुळे मंत्रिमंडळात या भागाला घसघशीत प्रतिनिधित्व मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ती फोल ठरली. मुख्यमंत्रीपद विदर्भाला मिळाले असले तरी विदर्भातील ११ पैकी सात जिल्हे मंत्रिपदापासून वंचित राहिले. त्यात पूर्व विदर्भातील सहापैकी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे चार जिल्हे तर पश्चिम विदर्भातील अकोला,अमरावती आणि वाशीम या तीन जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात नाही.

हे ही वाचा… नवनिर्वाचित तिन्ही मंत्री यवतमाळचा मागास शिक्का पुसतील!

पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यातून एक तर नागपूर जिल्ह्याला मुख्यमंत्रीपदासह तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. पश्चिम विदर्भातील यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. यवतमाळ जिल्ह्याला तब्बल तीन मंत्रिपदे मिळाली.

नागपूर जिल्ह्यातून देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री), चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) आणि आशीष जयस्वाल (शिवसेना) यांना मंत्रिपद मिळाले. वर्धा जिल्ह्यातून पंकज भोयर (भाजप) यांना संधी मिळाली. यवतमाळ जिल्ह्यातून अशोक उईके(भाजप), संजय राठोड (शिवसेना) आणि इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी -अजित पवार), बुलढाणा जिल्ह्यातून आकाश फुंडकर (भाजप) यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

दिग्गजांना वगळले, नाराजी

पूर्व विदर्भातील भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम या दोन ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. ते शिंदे मंत्रिमंडळात मंत्री होते. नागपूर शहरातून एकालाही मंत्रिपद मिळाले नाही. सलग चौथ्यांदा विजयी झालेले कृष्णा खोपडे विदर्भातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. ते कट्टर गडकरी समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांना मंत्री न केल्याने भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मुनगंटीवार यांच्याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच खुलासा करावा लागला. यावरून पक्षातील नाराजी लक्षात यावी. भंडारा व गोंदिया जिल्ह्याला अनेक वर्षांपासून मंत्रिपद नाही. बाहेरचे पालकमंत्री नेमले जातात. यावेळी ही समस्या दूर होईल असे वाटत होते. पण सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली.

हे ही वाचा… Hasan Mushrif : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले एकमेव मुस्लिम मंत्री हसन मुश्रीफ कोण आहेत?

अमरावती जिल्ह्यातील आठपैकी सात जागांवर महायुतीचा विजय झाला. पण एकही मंत्रिपद मिळाले नाही. भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष रवी राणा मंत्री होतील, असे बोलले जात होते. त्यांचीही निराशा झाली.

संजय कुटे समर्थक संतप्त

जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे मंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते. देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले कुटे यापूर्वीच्या फडणवीस मंत्रिमंडळात काही काळ मंत्री होते. त्यांना डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले होते. ते नागपूरमध्ये पक्षश्रेष्ठींना भेटून जाब विचारणार होते. पण त्यांची आ. कुटे यांनी समजूत काढली.

मंत्रिपदापासून वंचित जिल्हे

१) भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, वाशीम

या जिल्ह्यांना मंत्रिपद

१) नागपूर (मुख्यमंत्रीपदासह तीन मंत्री)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२) वर्धा, ३) बुलढाणा, ४) यवतमाळ (३ मंत्रिपदे)